Crop Insurance राज्य सरकारच्या (State Government) 1 रुपयात पीक विमा योजनेला विक्रमी प्रतिसाद मिळाला असून, खरीप हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांकडून पीकविम्यासाठी ऑनलाइन 1 कोटी 69 लाख अर्ज दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, पंतप्रधान पीक विमा योजनेत देशात सर्वाधीक सहभाग महाराष्ट्रातील (Maharashtra) शेतकऱ्यांनी नोंदवला आहे.
मोठी घोषणा : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांच्या वारसांना मिळणार 25 लाख रूपये
पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची 31 जुलै शेवटची तारीख होती. मात्र शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेत राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी केंद्र सरकारने 3 दिवसाची मुदतवाढ (Term Extension) दिली होती. त्यामुळे 3 ऑगस्टपर्यंत पीक विम्यासाठी ऑनलाइन अर्ज भरणे सुरु होते. आता ऑनलाइन अर्ज नोंदणी बंद करण्यात आली असून प्राप्त अर्जांची छाननी सुरू झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राकडून मिळाली आहे.
गेल्यावर्षी खरिपात विम्यासाठी 96 लाख 62 ऑनलाइन अर्ज आले होते. परंतु यंदा विक्रमी म्हणजेच 1 कोटी 69 लाख 48 हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये बहुतेक अर्ज बिगर कर्जदार गटातील शेतकऱ्यांचे आहेत.
ऑनलाइन पद्धतीने प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये 1 कोटी 63 लाख शेतकरी बिगर कर्जदार गटातील आहेत. कर्जदार गटातून केवळ 5 लाख 76 हजार अर्ज आले आहेत. यंदा 142 लाख हेक्टरच्या पुढे खरिपाच्या पेरण्या होतील असा अंदाज असून, शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत प्रचंड सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे खरिपाच्या एकूण क्षेत्रापैकी किमान 112 लाख 42 हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे.
पीकविमा कंपन्यांकडे आलेल्या या अर्जांमुळे आतापर्यंत विमा संरक्षित रक्कम 54 हजार 438 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. कंपन्यांची यंत्रणा सध्या अर्ज छाननीत व्यस्त आहेत. संशयास्पद माहिती असलेले अर्ज यातून रद्द केले जाणार आहेत.
ब्रेकिंग न्यूज : पीक नुकसानीची माहिती कळविण्याची मुदत वाढवण्याची कृषीमंत्र्यांची घोषणा
यंदा राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या विमाहप्त्याची रक्कम यंदा स्वतः भरण्याचा निर्णय घेतला. केवळ एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना विमा नोंदणीची सुविधा दिली. त्यामुळेच शेतकऱ्यांनी यंदा पीकविमा योजनेत प्रचंड सहभाग नोंदविला आहे.
यंदा पीकविमा योजनेसाठी बीड (Beed) जिल्ह्यातून सर्वाधिक 18.48 लाख ऑनलाइन अर्ज आले असून, नाशिक 5.87, जळगाव 4.52, नगर 11.72, पुणे 2.23, सोलापूर 6.76, जालना 10.15, लातूर 8.62, धाराशिव 7.57, नांदेड 11.97, परभणी 7.61, हिंगोली 5.12, बुलडाणा 7.30, अकोला 4.33, वाशीम 4.25, यवतमाळ 8.42, नागपूर 2.05 लाख ऑनलाइन अर्ज आले आहेत.
यंदा पीकविमा अर्जासोबत शेतकऱ्यांनी 1 रुपया विमा शुल्कातून विमा कंपन्यांकडे एकूण 1 कोटी 69 लाख रुपयांच्या आसपास रक्कम जमा केली आहे. याशिवाय विमा हप्ता अनुदानापोटी 4 हजार 755 कोटी रुपये राज्य शासनाकडून विमा कंपन्यांना मिळतील. तसेच केंद्राकडून 3 हजार 216 कोटी रुपये दिले जातील. एकूण 7 हजार 900 कोटींची उलाढाल पीकविमा व्यवसायात झाली आहे.
मोठी बातमी : माती परिक्षण आणि बीज संशोधनावर भर देणार : कृषी मंत्री धनंजय मुंडे
https://www.facebook.com/shetimitramagazine03