सध्याच्या वातावरणामुळे सोलापूर जिल्हयासह मराठवाडा आणि विदर्भात काही पिकांवर शंखी गोगलगाईंचा (Snail) प्रादुर्भाव दिसुन येत आहे. बहूतांश ठिकाणी सोयाबीन, केळी, भाजीपाला या पिकांवर शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव (Infestation) दिसून येत आहे. सोयाबीन पिकामध्ये रोप अवस्थेतच गोगलगायीचा प्रादुर्भाव होत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी या गोगलगायींना वेळीच ओळखून खालील प्रमाणे 13 उपाययोजना करणे गरजेचे आहे जेणेकरून पुढील नुकसान (damage) टाळता येईल.
महत्त्वाची माहिती : असे करावे कारल्यावरील कीड-रोगाचे नियंत्रण !
एकात्मिक व्यवस्थापन (Management) :
1. शेताचे बांध स्वच्छ ठेवावे, त्यामुळे गोगलगायींना लपण्यास जागा राहणार नाही.
2. गोगलगाईचा प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रात द्राक्ष बागेमध्ये आच्छादन (मल्चींग) करू नये.
3. सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्यात. किंवा शेतातून मोठ्या शंखी गोगलगायी जमा करून प्लास्टिकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मीठ अथवा चुना टाकून त्या पोत्याचे तोंड उघडे न ठेवता घट्ट बंद करावे, जेणेकरून त्यामधील गोगलगायी पोत्यातून बाहेर न जाता मिठाच्या किंवा चुन्याच्या संपर्कात येऊन आत मध्येच मरून जातील.
महत्त्वाच्या गोष्ट : काकडीचे असे करा पीक संरक्षण
4. शेतामध्ये किंवा बागेमध्ये 7 ते 8 मीटर अंतरावर विविध ठिकाणी वाळलेल्या गवताचे किंवा भाजीपाला पिकाच्या अवशेषाचे ढीग अथवा गोणपाट गुळाच्या पाण्यात ओले करून शेतात ठिक ठिकाणी ठेवावेत. गोगलगायी त्या ठिकाणी आश्रयाला जातात. सूर्योदयानंतर त्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी व त्यांची अंडी गोळा करून मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट करावी.
5. लहान शंखीसाठी मिठाची फवारणी किंवा कॅल्शीयम क्लोराईडचासुद्धा नियंत्रणासाठी बऱ्याच ठिकाणी वापर केला जातो.
6. शेत किंवा बागेच्या सभोवती बांधापासून आत तंबाखू भुकटीचा अथवा चुन्याचा 5 सें.मी. रुंदीचा पट्टा गोगलगायींना शेतात जाण्यास प्रतिबंध म्हणून व नियंत्रणासाठी टाकावा.
फायद्याच्या टिप्स : भेंडीवरील किडींचे असे करा एकात्मिक व्यवस्थापन
7. फळबागेमध्ये झाडाच्या खोडास 10 % बोर्डोंपेस्ट लावल्यास गोगलगायी झाडावर चढत नाही.
8. गोगलगायीच्या नियंत्रणासाठी मेटाल्डिहाईड (स्नेलकिल) दाणेदार या गोगलगाय नाशकाचा वापर करावा. सोयाबीन सारख्या पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड (स्नेलकिल) दोन किलो प्रति एकरी या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. तर फळबागेमध्ये झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड (स्नेलकिल)प्रति झाड 100 ग्रॅम पसरून टाकावे.
9. शंखी गोगलगाय प्रामुख्याने पिकलेली उंबराची फळे, पपईची रोपे व झेंडूच्या रोपांकडे आकर्षित होतात. म्हणून मेटाल्डिहाईडच्या (स्नेलकिल) गोळ्या पपईच्या पिवळ्या पानांजवळ ठेवतात. त्यामुळे त्या लवकर आकर्षित होऊन मोठ्या प्रमाणात मरतात.
फायद्याचा लेख : वांगी पिकाचे असे करा एकात्मिक कीड नियंत्रण
10. जर हे आमिष उपलब्ध न झाल्यास, पुढील प्रकारे आमिष तयार करून बागेमध्ये टाकून घ्यावे. दहा लिटर पाण्यामध्ये दोन किलो गूळ अधिक 25 ग्रॅम यीस्ट यांचे द्रावण तयार करावे. हे द्रावण 50 किलो गव्हाच्या अथवा भाताच्या कोंड्यात टाकून चांगले मिसळावे. 10 ते 12 तास हे मिश्रण आंबवण्यासाठी ठेवावे. त्यानंतर त्यामध्ये थायामिथोक्झाम 50 ग्रॅम चांगल्या प्रकारे मिसळावे. हे आमिष शेतामध्ये ढिगाच्या स्वरुपात किंवा बांधाच्या कडेने पट्टा स्वरुपात टाकावे.
11. सदरील आमिषा पासून पाळीव प्राणी, लहान मुलांना दूर ठेवावे.
12. वरील गोगलगायनाशक अथवा अमिषाचा वापर प्लॅस्टिक हातमोजे घालूनच काळजीपूर्वक करावा.
13. ही कीड थंडी व उन्हाळ्यामध्ये (ऑक्टोबर ते मे) जमिनीमध्ये खोलवर सुप्तावस्थेत जाते. पावसाळा सुरू झाल्यानंतर जमिनीतून बाहेर पडते व जून ते सप्टेंबर दरम्यान सक्रीय राहते. म्हणुन पावसाळ्याच्या सुरूवातीपासूनच या किडीच्या नियंत्रणासाठी सलग 2 ते 3 वर्षे राबविणे आवश्यक आहे.
अशाप्रकारे शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव ज्या भागात मोठ्या प्रमाणात दिसून येत असेल त्या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या वरील प्रमाणे उपाय योजना केल्यास गोगलगायीचे नियंत्रण लवकरात लवकर व अधिक प्रभावीपणे होते.
महत्त्वाची माहिती : वांग्यावरील रोगाचे सोप्या पद्धतीने करा; असे नियंत्रण
प्रा. समाधान जवळगे, विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) कृषि विज्ञान केंद्र, सोलापूर.
डॉ. लालासाहेब तांबडे, प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषि विज्ञान केंद्र, सोलापूर.
E-mail: [email protected]
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1