महाराष्ट्रात सुरु असलेल्या ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. आतापर्यंत सुमारे 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ॲपवर नोंदणी केली असून 70 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची सात-बारावरील ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण झाली आहे. या ‘ई-पीक-पाहणी प्रकल्पात गेल्या वर्षभरातील विविध हंगामांमध्ये सुमारे 826 पिकांची नोंदणी करण्यात आली आहे.
गेल्या वर्षापर्यंत शेतकऱ्यांच्या पिक पेऱ्याची नोंद ही गावातील तलाठ्यांमार्फत केली जात होती. प्रत्यक्ष शेतीच्या गट क्रमांकात न जाता शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पिकपेरा नोंदविला जात असे. मात्र नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी नुकसानभरपाई देण्याची वेळ उद्भवली तर त्या काळात संबंधित अधिकाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असे. शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकाची अचूक नोंद शासनाच्या अभिलेख्यांमध्ये व्हावी आणि त्याचा शेतकऱ्यांनाही संकटकाळात नुकसानभरपाईसाठी लाभ व्हावा या हेतूने ‘ई-पीक पाहणी’ चा प्रकल्प राज्यात राबविण्यात येत आहे.
महत्त्वाची गोष्ट : बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी
राज्य शासनाच्या महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी राज्यात 15 ऑगस्ट 2021 पासून ई- पीक पाहणी या व्यापक प्रकल्पाची अंमलबजावणी सुरु आहे. या प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी केली ई- पीक नोंदणी तर 70 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची सातबारावरील ई-पीक नोंदणी पूर्ण केली आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामात 380 पिकांची तर रब्बी हंगामात 263 पिकांची आणि उन्हाळी हंगामात 183 अशा एकूण 826 पिकांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षात सोयाबीन पिकाखाली 25 लाख 88 हजार 413 हेक्टर क्षेत्र आहे तर 9 लाख 91 हजार 964 हेक्टरवर हरभरा पिक घेण्यात आले आहे. 1 लाख 91 हजार 338 हेक्टरवर भात पिक घेण्यात आले आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण नवनवीन प्रयोग करुन शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्याबरोबरच त्यांना सोप्या आणि सुलभ पध्दतीने आवश्यक असणारी कागदपत्रे मिळवून देणे, पिकांची माहिती मिळवून देणे यावर भर देण्यात येत आहे. दोन तीन गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही असा शेतकऱ्यांचा कायम आक्षेप होता. मात्र आता महसूल विभागाने आपल्या पिकाची रिअल टाईम नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. महसूल विभागाने ई-पीक पाहणी ॲप हे स्वतंत्र अप्लिकेशनची निर्मिती केली आहे.
फायद्याच्या टिप्स : पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया नक्की करा ! या आहेत टिप्स
ई-पीक पाहणी हा व्यापक प्रकल्प असून हा प्रकल्प राज्यातील प्रत्येक कुटुंबाशी जोडला जाणारा आहे.जमीन महसूल कायद्यानुसार शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पध्दत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठीही याचा फायदा होणार आहे.या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणे देखील सुलभ होणार आहे. ई-पीक पाहणी प्रकल्पामुळे गाव, तालुका आणि जिल्हानिहाय प्रत्येक पिकाचे क्षेत्र समजण्यास मदत होईल. पीक पाहणी नोंदणीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवल्यामुळे पीक विमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल. शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यातही यामुळे सुलभता येईल. विशेष म्हणजे याॲपमध्ये शेतकऱ्यांनी केलेली पिकांची नोंदणी स्वयंप्रमाणित मानण्यात येते. तसेच केवळ 10 टक्के तपासणी तलाठयांमार्फत करण्यात येते.
वाचनीय लेख : असे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे कृषी धोरण
टाटा ट्रस्टच्या सहाय्याने ‘ई-पीक पाहणी’ या ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. या मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये शेतकरी पिकांची माहिती भरतील, तलाठी या पिकांच्या नोंदी तपासून घेतील. यामुळे पीक पेरणीची रियल टाइम माहिती अप्लिकेशन मध्ये संकलित होणार आहे. ई-पीक पाहणी मुळे राज्यातील पिकांचे अचूक क्षेत्र कळणार आहे, त्यामुळे राज्यातील आर्थिक पाहणी आणि कृषी नियोजन करणे शक्य होणार आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि मदत देणे ही शक्य होईल.
ई-पीक पाहणी ॲपचा असा करा वापर…
1. गुगल प्ले स्टोअरवरुन ई-पीक पाहणी (e peek pahani) हे ॲप डाऊनलोड करा, त्यासाठी https://play.google.com/store/apps/details?id=org.mahait.epeek या लिंकवर क्लिक करा
2. आपला अचूक मोबाईल नंबर टाकून त्यावर येणारा संकेतांक/पासवर्ड/ओटीपी भरुन नोंदणी पूर्ण करा.
3. परिचयमध्ये स्वत:चा फोटो अपलोड करुन इतर माहिती साठवा.
4. शेतावर पीक पाहणी करताना इंटरनेट आवश्यक नसते फक्त जीपीएस (GPS) चालू असणे आवश्यक असते.
5. जेथे इंटरनेट नेटवर्क मिळेल तेथून पीक पाहणी ॲप मधील अपलोड पर्याय निवडून माहिती अपलोड करावी.
6. ई-पीक पाहणीच्या अधिक माहितीसाठी आपल्या गावचे तलाठी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करावा. मदतकक्ष क्रमांक – 020-25 7-12 7-12
महत्त्वाची माहिती : पीक संरक्षणात विविध अन्नद्रव्यांचे कार्य
काय आहे ई-पीक पाहणी प्रकल्प ?
1. महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी राज्यात 15 ऑगस्ट 2021 पासून ई- पीक पाहणी या व्यापक प्रकल्पाची अंमलबजावणी
2. आतापर्यंत 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची ॲपवर नोंदणी ;मराठवाडयात सर्वांधिक नोंदणी
3. ई-पीकमध्ये मिश्र पिकातील घटक पिकांसाठी हंगाम, लागवड दिनांक निवडण्याची सुविधा
4. शेतकऱ्यांनी पीकपाहणी नोंदविल्यानंतर 48 तासांच्या आत त्यामध्ये सुधरण करण्याची सुविधा
5. गावामध्ये नोंदविलेल्या पीकपाहणीची माहिती गावातील सर्वांना व्हयू ओन्ली स्वरुपात उपलब्ध
6. तीन वर्षांची ई-पीक पाहणी माहिती नमुना नंबर 12 वर दिसणार,तर पुढील 5 वर्ष संग्रहित ठेवली जाणार
7. काही कायम पड प्रकारासाठी Geo tagged फोटो अनिवार्य
8. जिओ फेन्सिंगची मोबाईल ॲपमध्ये सुविधा
ई-पीक पाहणी आता राजस्थानात ई-गिरदावरी : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
राज्यातील महसूल आणि कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेला महत्वाकांक्षी ई-पीक पाहणी प्रकल्प राजस्थान सरकारने स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल विभागाने टाटा ट्रस्टच्या मदतीने ई-पीक पाहणी प्रकल्प विकसित केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 15 ऑगस्ट 2021 पासून हा प्रकल्प राज्यव्यापी लागू करण्यात आला आहे. हा प्रकल्प महसूल आणि कृषी विभागासाठी महत्वाचा प्रकल्प ठरणार आहे. राजस्थानप्रमाणेच देशातील इतर राज्येही हा प्रकल्प स्वीकारुन लवकरच हा प्रकल्प देशव्यापी स्तरावर राबविला जाईल, असा विश्वास वाटतो. असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात याबाबत म्हणाले.
वर्षा फडके-आंधळे, वरिष्ठ सहायक संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई [email protected]
वाचनीय लेख : कृषी पर्यटन व्यवसायात या आहेत, रोजगाराच्या नव्या संधी
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1