अमूल डेअरी आणि मदर्स डेअरी पाठोपाठ आता गोकुळनेही दूधाच्या दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता दूधाचे दर वाढणार आहेत. गोकुळच्या दर वाढीच्या निर्णयानंतर राज्यातील इतर दुग्ध उत्पादक संघही दरवाढ करण्याची शक्यता आहे.
अल्पावधीतच पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने वाहतुकीचा खर्च अचानक वाढला आहे. तसेच विजेचे दरही वाढल्यामुळे दूध उत्पादक संघाचा देखभाल खर्च भरमसाठ वाढला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील नागरिकांना दूधासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून नुकताच गोकुळ दूधाच्या दरवाढीचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार गायीच्या आणि म्हशीच्या दूधासाठी आता प्रतिलीटरमागे दोन रुपये जास्त द्यावे लागणार आहे. तुर्तास ही दरवाढ कोल्हापूर, सांगली आणि कोकणात लागू होणार नसली तरी राज्यात सर्वत्र लागू होणार आहे.
सध्या गोकुळच्या गायीच्या एक लीटर दुधासाठी 47 रुपये मोजावे लागत होते. ही किंमत आता 49 रुपये इतकी होणार आहे. तर म्हशीच्या दूधाची किंमती प्रतिलीटर 58 रुपयांवरुन 60 रुपये इतकी होणार आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने दरवाढीचा निर्णय घेतल्याचे गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी सांगितले. गोकुळ दूध संघाकडून राज्यभरात दररोज 12 लाख लीटर दूधाची खरेदी केली जाते.
इंधन दर आणि विजेचे दर वाढल्यामुळे दूध उत्पादक संघाचा देखील खर्च वाढला आहे. हे कारण देत अमूल पाठोपाठ मदर डेअरीने दूध दरांमध्ये वाढ केली आहे. एक जुलै रोजी अमूलने दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. आता दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरात येथे एक जुलैपासून अमूलचे दूध उत्पादन महागले आहे. अमूलने तब्बल दीड वर्षानंतर दूध विक्रीचे दर वाढवले आहेत. त्या पाठोपाठ आता मदर डेअरीने देखील दूध विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संकटाच्या काळात महागाईला तोंड देणाऱ्या ग्राहकांना एकामागून एक धक्के बसत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढीबरोबरच बँकिंगचे चार्ज देखील वाढले आहेत. आता दूध दरवाढ सहन करावी लागणार आहे. दरम्यान, या दरवाढीचा फायदा दूध उत्पाद्क शेतकर्यांना कितपत होणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा