ढेमसे (टिंडा) ही शहरी लोकांमध्ये आवडती फळभाजी आहे. मोठ्या शहरांमध्ये या फळभाजीला वर्षभर चांगली मागणी असल्याने अशा शहरांच्या परिसरातच खरीप आणि उन्हाळी हंगामात ह्या भाज्यांची व्यापारी तत्वावर लागवड केली जाते. आहारदृष्ट्या या भाजीत मुबलक प्रमाणात खनिजे, कार्बोहायड्रेटस्, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, लोह, पोटॅशीयम, ‘क’ आणि ‘अ’ जीवणसत्त्व असते.
या भाजीच्या उत्तम वाढीसाठी उष्ण व दमट हवामान लागते. पावसाळी किंवा खरीप हंगामात ढेमसेचे पीक चांगले येते. ज्या भागात हिवाळ्यात साधारण थंडी असते. तेथे हिवाळ्यातही या भाजीपाला पिकांची लागवड केली जाते.
या फळभाजीच्या लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, मध्यम रेताड, जमीन चालते. भारी जमिनीत सेंद्रीय खतांचे प्रमाण जास्त असावे लागते. तसेच जमिनीचा सामू सात ते सात असल्यास याचे उत्पादन चांगले येते.
महाराष्ट्रात अजूनही ढेमसे पिकाच्या स्थानिक जातींची लागवड केली जाते. अळी टिंडा ही जात कोवळी आणि शिजवण्यासाठी चांगल्या फळांचा रंग फिक्कट हिरवा व त्यावर लव असते. फुले उमलल्यापासून पाच दिवसात फळे काढणी योग्य होतात. फळांच्या 10 ते 12 तोडण्या होतात. तर पंजाब टिंडा या जातीची फळे हिरवी, गट पांढरा, वजन 50 ग्रॅम असते. पहिली तोडणी 60 ते 80 दिवसात सुरू होवून आठ ते दहा तोडण्या पीक संपते.
लागवडीपूर्वी जमिनीची पूर्वमशागत करावी. आळे किंवा सरी पद्धतीने लागवड करता येते. उन्हाळी हंगामातील पिकाची लागवड जानेवारी ते मार्चमध्ये आणि खरीप पिकाची लागवड जून ते जुलैमध्ये करावी. फारशी थंडी पडत नसल्यास ऑक्टोबर महीन्यात काही ठिकाणी लागवड केली जाते. त्यामुळे बाजारात पीक लवकर विक्रीस येते. लागवड साधारण ओलसर जमिनीत ‘बी’ टोकावे. दोन ओळीमध्ये 9 इंच ते 2.5 फुट व दोन वेलात 0.6 इंच ते 1.2 फुट अंतर ठेवावे. हेक्टरी 3.5 ते 5 किलो बियाणे लागते. या पिकावर मावा, भुरी या किडींचा प्रादुर्भाव होतो. तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्याचे व्यावस्थापन करावे.