हादग्याची फुले आणि शेंगाची भाजी अतिशय चवीने खाणारा मोठा वर्ग आहे. हादगा (अगस्ती) याचे झाड लेगुमिनोसी कुळातील असून याचे शास्त्रीय नाव सेसबानिया ग्रॅन्डीफ्लोरा आहे. हादगा किंवा अगस्ती हे एक लवकर वाढणारे छोटे पण उपयुक्त असे वृक्ष आहे. पूर्ण वाढल्यानंतर झाडाची उंची आठ ते नऊ मीटर होते. तर व्यास 20 ते 25 सें.मी. होतो. हादग्याची लागवड शेताच्या बांधावर पाटाच्या कडेला मळ्याभोवती परसबागेत, माळराने, हलक्या जमिनीत आणि डोंगर उतारावर केली तर निश्चितच फायदेशीर ठरेल. जास्त काळजी न घेताही या पिकांचे उत्पादन चांगले मिळू शकते.
उपयुक्तता : काळी मिरीचा वेल व पानवेलाची लागवड हादग्याच्या आधाराने करता येते. त्याप्रमाणे नारळाच्या झाडाला थोड्या प्रमाणात सावली देण्यासाठी हादग्याची लागवड केली जाते. केळीच्या बागेला वारा प्रतीबंधक म्हणूनही हादगा लागवड केली जाते. या भागामध्ये याच्या लाकडाचा बांबूसारखा उपयोग करतात. पहिले तीन ते चार वर्षापर्यंत लाकडाचा उपयोग स्वस्त कागद तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून करतात. हादगा लागवडीमुळे रोजगार उपलब्ध होऊ शकतो. हादग्याची लागवड मोठ्या प्रमाणात करून यांच्या पानांचा उपयोग जनावरांना खाद्य म्हणून करता येतो. हादग्याच्या झाडाच्या सालीपासून चांगल्या प्रतीचा धागा निधतो त्याचा उपयोग दोरी बनविण्याच्या कामात होतो. त्याचप्रमाणे सालीचा उपयोग चटई रंगविण्यासाठी करतात. मासेमारी आपले जाळ्यांच्या कडा या सालीपासून तयार करतात. त्याचप्रमाणे आयुर्वेदिक औषधामध्ये उपयोगात आणल्या जाते. 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात दोन मिलीग्रॅम आयोडीन असते. कोवळी पाने, फुलांचा व बियांचा भाजीसाठी उपयोग होतो. शेंगाची, पानांची व फुलांची वाढती मागणी लक्षात घेता लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे या पिकाच्या लागवडीचे तंत्रज्ञानाची माहिती असणे आवश्यक आहे.

लागवड तंत्र : पिकाच्या अनुकूल वाढीसाठी 25 ते 30 अंश सेल्सीअस तापमान लागते. तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास फुले गळतात. तसेच धुके आणि कडाक्याची थंडी पडल्यास फुलगळ होते. हदग्याची चांगली वाढ हलक्या, जमिनीत होते, परंतु उत्तम वाढीसाठी व अधिक उत्पादनाचा विचार केल्यास सेंद्रिय पदार्थयुक्त, मध्यम काळी कसदार व उत्तम निचर्याच्या जमिनीत लागवड करणे योग्य ठरते. क्षारयुक्त जमिनीतही याची चांगली वाढ होते.
हादग्याच्या मुख्यत: स्थानिक जातींची लागवड केली जाते. पांढर्या व तांबड्या फुलांच्या रंगाच्या जातींची लागवड करतात. परसबागेसाठी पांढर्या फुलांची लागवड केली जाते. हादग्याची अभिवृद्धी बियापासून रोपे तयार करून किंवा फाटे कलम तयार करून केली जाते. बियांची उगवणक्षमता एक वर्षापर्यंत असते. कलमासाठी उत्कृष्ट दर्जाच्या शेंगा असलेली व भरपूर उत्पादन देणारी झाडे निवडून फाटे कलम तयार करून कायम ठिकाणी लागवड करावी किंवा पॉलीथीनच्या पिशवीत रोपे तयार करून नंतर लागवड करावी. पॉलीथीनच्या पिशवीत रोपे तयार करून लागवड केल्यास वेळ वाया न जाता योग्य वेळेवर लागवड होऊन उत्पादनात वाढ होते.
लागवड : पावसाळ्यापूर्वी निर्जंतुक केलेले तीन भाग गाळाची माती, एक भाग चांगले कुजलेले शेणखत व एक भाग कंम्पोष्ट खत मिश्रण तयार करून पॉलीथीनच्या पिशवीत भरावे. ‘बी’ पेरून रोपे तयार करावेत. स्वयंभू पद्धतीने लावगड करायची असल्यास उन्हाळ्यात 3 X 3 मीटर किंवा 4 X 4 मीटर अंतरावर 45 सें. मी. लांब व 45 सें. मी. रूंद व 45 सें. मी. खोल आकाराचे खड्डे खोदावेत. प्रत्येक खड्ड्यात 10 किलो ग्रॅम शेणखत, 50 ग्रॅम लिंडेन पावडर व 250 ग्रॅम (15:15:15) मिश्रखत खड्ड्यात टाकून खड्डा भरावा व फाटे कलमांची लागवड करावी. हादग्याची लागवड ही जून ते ऑगस्ट महिन्यात मुख्य शेतात करावी. मात्र चार्यासाठी किंवा लाकडासाठी हादग्याची लागवड 90 सें. मी. X 90 सें. मी. अंतरावर करावी.
हादग्याच्या झाडाची वाढ लवकर होते व दुसर्या वर्षापासून शेंगा येण्यास सुरूवात होते म्हणून सुरूवातीस योग्य वळण देणे आवश्यक आहे. वळण देणे जर व्यवस्थित व वेळीच केले नाही तर झाड उंच वाढून फुले व शेंगा काढताना त्रास होतो. त्याकरिता लागवडीनंतर रोपे 75 सें.मी. उंचीची झाल्यानंतर शेंडा छाटून टाकावा, त्यामुळे मुख्य खोडावर भरपूर फांद्या येतील व झाडाची उंची कमी होते, फुले व शेंगा काढण्याचे काम सोपे होऊन उत्पादनही वाढेल. त्याचप्रमाणे 90 ते 120 सें.मी.वर छाटणी केली तर पाने जनावरांना चार्यासाठी उपयोगात येतात.
खत व पाणी व्यवस्थापन : हादगा हे पीक कोरडवाहू व दुर्लक्षित असल्यामुळे खत व्यवस्थापन बर्याच वेळेला केले जात नाही. लागवड झाल्यानंतर तीन महिन्यांनी प्रत्येक झाडास 50 ग्रॅम नत्र, 50 ग्रॅम स्फुरद, व 50 ग्रॅम पालाश द्यावे म्हणजे झाडाची योग्य वाढ होऊन उत्पादनात वाढ होईल. हादग्याच्या झाडास नियमित पाणी देण्याची गरज भासत नाही. मात्र सुरूवातीच्या काळात साधारणत: एक ते दोन वर्ष रोपांना उन्हाळ्यात पाणी द्यावे. त्यामुळे झाडाची चांगली वाढ होते मात्र फुले येण्याचे काळात जमिनीत ओलावा नसल्यास फुले गळण्याचे प्रमाण अधिक वाढते त्यामुळे जमिनीत ओलावा टिकविण्याचे दृष्टीने आळ्यात आच्छादन करावे.

कीड व रोग : हादगा या पिकावर विशेष कीड व रोगाचा प्रादुर्भाव नसतो परंतु किडींना पोषक वातावरण मिळाल्यास काही किडींचा प्रादुर्भाव आढळतो. त्यापैकी खवले कीड ही पानावर लपून अन्नरस शोषण करते. त्यामुळे पाने आणि शेंडे वाळतात. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो. याच्या नियंत्रणासाठी कोणतेही किटकनाशक 15 मिली दहा लिटर पाण्यात मिसळून झाडावर फवारणी करावी. तर भुरी या रोगाचा प्रादुर्भाव दमट वातावरणात मोठ्या प्रमाणात होतो. रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास संपूर्ण झाडावर पांढर्या रंगाची पावडर पसरल्यासारखी दिसते. याच्या नियंत्रणासाठी पाण्यात विरघळणारे गंधक 20 ग्रॅम प्रती दहा लीटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करून झाडावर फवारणी करावी. किंवा कॅराथेन 20 मिली दहा लीटर पाण्यात मिसळून झाडावर फवारणी करावी.
काढणी व उत्पादन : फुले सप्टेंबर ते जानेवारी महिन्यात येतात. पूर्ण वाढलेल्या फुलांच्या पांढर्या कळ्या भाजीसाठी योग्य असतात. मात्र कळ्या काढणीस उशीर झाल्यास फुलांच्या पाकळ्या गळतात. अशी फुले भाजीसाठी योग्य नसतात. एप्रिल मेमध्ये शेंगा काढणीस तयार होतात शेंगा 30 ते 50 सें. मी. लांब असतात त्यामध्ये साधारणत: 35 ते 40 बिया असतात. हादग्याच्या एका झाडापासून चार ते नऊ किलो फुलांचे उत्पादन मिळते. झाडाची व्यवस्थित काळजी व योग्य व्यवस्थापन केल्यास चार ते नऊ ग्रॅम पाने मिळतात.
– डॉ. प्रशांत राऊत कृषी महाविद्यालय, नागपूर.