महाराष्ट्रात चवळी या पिकाची लागवड बहुतेक करून खरीप हंगामात केली जाते. एक जुलैला पेरणी कल्यास जास्त उत्पादन मिळते तर उशिरा पेरणी केल्याने उत्पादनात घट येते. चवळी पिकाच्या उत्पादनात होणार्या घटीची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने त्यावर पडणारे रोग आणि किडी हे महत्त्वाचे कारण आहे.
चवळी पिकावर प्रामुख्याने मर, करपा, भुरी, तांबेरा व विषाणूजन्य हळद्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. मावा, तुडतुडे, देठ कुरतडणारी अळी व शेंगा पोखरणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. याचे वेळीच नियंत्रण केल्यास उत्पादनात होणारी घट थांबवता येते.
चवळी पिकावरील प्रमुख रोग
मर : हा बुरशीजन्य रोग आहे. रोगाची बुरशी सुप्तावस्थेत असते. बियाण्यांची उगवण झाल्यानंतर क्वचित प्रसंगी बुरशीची लागण झाल्यास रूजलेले बियाणे कुजले आणि त्याची मर होते. बुरशीची लागण उशिरा झाल्यास वाढलेल्या झाडांची जमिनीलगतच्या खोडावर आणि त्या भोवतालच्या जमिनीवर पांढरी सुताकार बुरशीची वाढ दिसून येते. कालांतराने रोगग्रस्त झाडांची पाने निस्तेज होऊन शेंड्यापासून खाली सुकतात आणि मलूल होऊन लोंबतात. वाढलेल्या सुताकार बुरशीवर मोहरीच्या आकाराची लालसर तपकिरी रंगाची दुसरी बीजाणू दिसतात.
नियंत्रण : रोग नियंत्रणासाठी दर एक किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन ते पाच ग्रॅम थायरम हे बुरशीनाशक चोळावे.
करपा (अँथ्रकनोज) : हा बुरशीजन्य रोग आहे. रोगाची लक्षणे पानांवर, खोडावर, फांद्यावर आणि शेंगावर आढळतात. रोगग्रस्त भागावर अनियमित मोठ्या आकाराचे तपकिरी खोलगट डाग दिसतात. पानावर आढळणार्या डागांच्या कडेभोवती पिवळसर वलये असतात.
नियंत्रण : रोग नियंत्रणासाठी खालील उपायोजना अमलात आणावी. शेतातील रोगग्रस्त झाडांची वाढलेली पाने, धसकटे इत्यादी गोळा करून जाळावीत. पेरणीसाठी रोगग्रस्त बियाणे वापरावे. रोगग्रस्त शेंगामधील बियाणे पेरणीसाठी वापरू नये. झाडावर बुरशीनाशक पाच लिटर पाण्यात मिसळून फवारावे. (दर हेक्टर 1,250 ग्रॅम/500 लिटर पाणी) रोगाची तीव्रता बघून नंतरच्या फवारण्या दर 15 दिवसांच्या अंतराने कराव्यात.
भुरी : हा बुरशीजन्य रोग आहे. रोगाची लक्षणे पानावर, देठावर आणि शेंगावर आढळतात. रोगग्रस्त पानावर राखट तपकिरी रंगाचे धब्बे दिसतात. आणि या धब्ब्यावर राखट पांढ्यार्या रंगाची पीठ भुरकटल्याप्रमाणे बुरशीची वाढ दिसून येते.
नियंत्रण : रोग नियंत्रणाच्या दृष्टिने पाण्यात मिसळणारे गंधक दर एक गुंठा क्षेत्रास 12.50 ग्रॅम याप्रमाणे पाच लिटर पाण्यात मिसळून फवारावे (दर हेक्टर 500 लिटर पाण्यात 1,250 ग्रॅमप्रमाणे) किंवा 300 मेश गंधकाची भुकटी दर गुंठ्यास 250 ग्रॅम याप्रमाणे धुरळावी. रोगाची तीव्रता बघून नंतरची फवारणी/धुरळणी दर 10 दिवसांच्या अंतराने करावी.
तांबेरा : रोगाची लक्षणे प्रामुख्याने पानावर आढळतात. क्वचित प्रसंगी देठावर आणि खोडावर रोगाची लक्षणे दिसतात. पानावर लांबट गोलाकार, फुगीर, नारंगी किंवा लालसर तपकिरी रंगाचे असंख्य धब्बे दिसून येतात. या धब्ब्यांवर बुरशी बिजाणूंची भुकटी साचलेली आढळते. त्यामुळे रोगग्रस्त पाने किंवा झाडे ही गंजल्यासारखी दिसतात.
नियंत्रण : शेतातील वाळलेली रोगग्रस्त पाने, धसकटे इत्यादी एकत्र करून जाळावीत. रोगाची लक्षणे दिसताच मॅन्कोझेब किंवा झायनेब हे बुरशीनाशक दर एक गुंठा क्षेत्रास 20 ते 25 ग्रॅम या प्रमाणात पाच लिटर पाण्यात मिसळून फवारावे. (दर हेक्टर क्षेत्रात दोन ते 2.50 किलो 500 लिटर पाण्यातून ) रोगाची तीव्रता बघून नंतरच्या फवारण्या दर 10 दिवसांचे अंतराने कराव्यात.
विषाणूजन्य हळद्या रोग : हा विषाणूजन्य रोग आहे. रोगाची लक्षणे पानांवर, शेंडा आणि शेंड्यावरील पानांवर आढळतात. रोगग्रस्त पाने चुरघळलेली दिसतात. पानांवर हिरव्या आणि पिवळसर पांढरट रंगाची नक्षी दिसून येते क्वचित प्रसंगी संपूर्ण पाने पिवळी दिसतात. विशिष्ट प्रकारच्या लक्षणांमुळे शेतात रोगग्रस्त झाडे लांबूनच ओळखता येतात. रोगग्रस्त झाडांवर शेंगाचा बाज अत्यल्प असतो.
नियंत्रण : विषाणूजन्य रोगांवर अद्याप प्रभावी औषधोपचार उपलब्ध नाही. परंतु या रोगांचा प्रसार रस शोषणार्या किडीमार्फत होत असल्यामुळे किडींचा बंदोबस्त केल्यास काही प्रमाणात रोगाचा दुय्यम प्रसार कमी करता येतो. रोगामुळे विशेषआर्थिक नुकसान न होण्यासाठी खालील उपाययोजना अमलात आणावी. रोगप्रतिकारक किंवा रोगासकमी प्रमाणात बळी पडणार्या सुधारित जातींचा लागवडीसाठी वापर करावा. शेतातील रोगग्रस्त झाडे समूळ उपटून जाळावीत. रोगप्रसारक किडींच्या बंदोबस्तासाठी दर एक गुंठा क्षेत्रास पाच लिटर पाण्यातून 0.02 टक्के फॉस्फोमिडॉन पाच टक्के प्रवाही (एक मिली) किंवा 0.03 टक्के डायमेंथोएट 30 टक्के प्रवाह (पाच मिली) किंवा 0.02 टक्के मिथिल डिमेटॉन (पाच मिली) या प्रमाणात फवारावे.
चवळीवर महत्त्वाच्या किडी
मावा : मावा हे लहान गोलाकार, पिवळसर रंगाचे, मऊ किटक झाडांच्या पानातून व खोडामधून अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे झाडांची मुळे वाढ खुंटते.
तुडतुडे : तुडतुडे हे लहान, हिरवट किंवा पिवळसर रंगाचे असून ते चालताना तिरके चालतात आणि सोंडेचा सहाय्याने झाडांच्या पानामधून व खोडातून अन्नरस शोषून घेतात.
नियंत्रण : मावा आणि तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी फॉस्फोमिडॉन 85 टक्के प्रवाही हे कीटकनाशक 1.5 मिली पाच लिटर पाण्यात मिसळून एकगुंठ्यावर हातपंपाने फवारणी करावी. (म्हणजे 500 लिटर द्रावण एक हेक्टर क्षेत्रावर फवारावे) किंवा डायमेथोएट 30 टक्के प्रवाही हे कीटकनाशक पाच मिली पाच लिटर पाण्यात मिसळून हात पंपाने फवारणी करावी. किंवा मॅलेथिऑन 50 टक्के प्रवाही पाच मिली पाच लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा तीन मिली मोनोक्रोटोफॉस 36 टक्के प्रवाही पाच लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
देठ कुरतडणारी अळी (कटवर्म) : देठ कुरतडणारी अळी (कटवर्म) काळसर रंगाची असून स्पर्श केल्यास ती शरीराची गुंडाळी करते. ही अळी दिवसा जमिनीत झाडांच्या बुंध्याजवळ रहाते आणि रात्रीच्यावेळी जमिनीलगत झाड कुरतडते. तसेच कोवळी पाने आणि खोड खाते. ही अळी स्वत:ला खाण्यासाठी लागणार्या विशिष्ठ झाडांव्यतिरिक्त जास्त झाडे कुरतडते परिणामी नुकसान जास्त होते.
नियंत्रण : या किडीच्या नियंत्रणासाठी क्लोरोडेन पाच टक्के भुकटी किंवा हेप्टयॉक्लोर पाच टक्के भुकटी किंवा दहा टक्के बी. एच. सी. भुकटी अर्धा किलो एक गुंठ्यासाठी वापरावी. औषध झाडाच्या बुंध्याजवळ टाकावे.
शेंगा पोखरणारी अळी : या किडीची अळी हिरवट रंगाची असते. अंड्यातून बाहेर पडलेली अळी प्रथम शेंगेची साल पोखरून छिद्र पाडते. आणि अळी आतील दाण्यावर उपजीविका करते.
नियंत्रण : या किडीच्या बंदोबस्तासाठी किडींचा प्रादुर्भाव दिसेल त्या वेळी सात मिली एंडोसल्फान 35 टक्के प्रवाही किंवा सात मिली मोनोक्रोटोफॅास 36 टक्के प्रवाही हे कीटकनाशक पाच लिटर पाण्यात मिसळून गुंठा क्षेत्रावर हात पंपाने फवारणी करावी.
काढणी : या पिकाची कापणी शेंगा परिपक्व झाल्यानंतर तोडून घ्याव्यात व दोन तीन दिवस उन्हात वाळत ठेवून मळणी यंत्राच्या सहाय्याने मळणी करावी. किंवा शेंगा परिपक्व झाल्यानंतर पूर्ण झाडाची कापणी करावी व नंतर उन्हात वाळविल्यानंतर मळणी करावी.
उत्पादन : सी-152 व व्ही-16 या वाणांची महाराष्ट्रासाठी शिफारस करण्यात आली. असून या दोन्ही जातींची सुधारित पद्धतीने लागवड केल्यास हेक्टरी सरासरी 15 क्विंटल उत्पादन येवू शकते.
डॉ. डी. एन. गोखले वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा