आपल्या देशात शेतीला पूरक असे पशुपालनाचे जोडव्यवसाय उभे राहिल्यास ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था निश्चितपणे बदलेल. बेरोजगार, अल्पभूधारक, शेतमजूर, भुमिहीन मजूर आणि ग्रामीण महिलांनी शेळीपालनाचे काम हाती घेतल्यास दुधाची स्थानिक गरज या शेळ्यांपासून भागेल आणि त्यांना वर्षभर रोजगार मिळेल. त्याचप्रमाणे बोकड, शेळ्या विकून आर्थिक गरजा पूर्ण करता येतील.
अगदी प्राचीन काळापासून कमी उत्पन्न गटातील लोक घरगुती पद्धतीने एक दोन शेळ्या पाळत आले आहेत. आतापर्यंत या व्यवसायाला पाहिजे तितके महत्त्व दिले गेले नाही, परंतु गेल्या ८ -१० वर्षांपासून हा कमी भांडवलामध्ये खात्रीने आर्थिक उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय असल्यामुळे लहान शेतकऱ्यांनपासून मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत तसेच शेतमजूर, दारिद्रय रेषेखालील कुटूंब व सुशिक्षित बेरोजगार हे सुध्दा शेळीपालन व्यवसायाकडे आकर्षित झालेले असून मोठ्या प्रमाणात शेळीपालन करित आहेत.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय फक्त जोडधंदा म्हणून न राहता स्वतंत्र व्यवसाय बनला आहे. शेळी पालन कमी जोखमीचा व फायदेशीर व्यवसाय आहे. शेतीला पुरक असणाऱ्या अनेक व्यवसायात शेळीपालनाचे एक मुख्य स्थान आहे. शेळीपालनापासून मुख्यत: मांस व दुधाचे उत्पादन तर मिळतेच, परंतू याबरोबरच शिंगे व खुरे यांपासून डिंकासारखे पदार्थ, लहान आतड्यापासून शस्तक्रियेत टाके घालण्यासाठी दोरा (कॅट गट), हाडांपासून खत, खनिज मिश्रण, शेणखत, कातडीपासून उच्च प्रतीचे चामडे मिळते. तसेच काश्मिरी जातीच्या शेळयांकडुन ‘पश्मिना’ व अँगोरा जातीच्या शेळयांकडून ‘मोहेर’ नावाची लोकर मिळते.
१९ व्या पशुगणनेनुसार भारतातील शेळ्यांची संख्या सुमारे १३५ दशलक्ष इतकी असून महाराष्ट्रातील शेळ्यांची संख्या ८४ लाख आहे. भारतात शेळ्यांच्या एकूण ३४ जाती असून महाराष्ट्रात ४ जाती आढळून येतात व त्यांची नोंदणी राष्ट्रीय पशु अनुवांशिक संसाधन संस्थान, कर्नाल येथे करण्यात आलेली आहे. या चार जातीत उस्मानाबादी, संगमनेरी, बेरारी आणि कोंकण कन्याळ या शेळयांचा समावेश आहे .
उस्मानाबादी शेळी : सर्व शेळयांमध्ये सर्वात जास्त प्राधान्य असणारी उस्मानाबादी शेळी राज्याच्या सर्वच भागात आढळते. प्रामुख्याने मराठवाड्यातील बालाघाट डोंगराळ पट्ट्यात, काटकपणा आणि चविष्ट मांसासाठी तयार झालेली संपूर्ण काळी शेळी म्हणजे उस्मानाबादी शेळी होय. या शेळीच्या जातीचे नावच तिच्या मूळ उगमस्थान असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यावरून ठेवण्यात आलेले आहे. उस्मनाबादी शेळया हया महाराष्ट्रातील अहमदनगर, लातूर, परभणी, सोलापूर, जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यांमध्ये सुध्दा आढळुन येतात. उस्मानाबादी शेळी तिच्या उपयुक्ततेमुळे आंध्रप्रदेश, कर्नाटक व तेलंगणा राज्यात आढळून येते. मांस व दुग्धउत्पादन दोन्हीसाठी योग्य असल्या तरी मांस हे उत्कृष्ट गुणवत्तेचे असल्यामुळे मुख्यत्वे करुन मांसउत्पादनासाठी शेळीपालन केले जाते. या शेळीच्या मांसासोबतच कातडीला सुध्दा बाजारात चांगली मागणी आहे.
शारीरिक वैशिष्ट्ये : उस्मानाबादी शेळीची वैशिष्ट्ये असे की, ही शेळी आकाराने मध्यम ते मोठी असून रंग प्रामुख्याने काळा असतो. तर काही शेळ्यांच्या कानावर, मानेवर तर कधी कधी शरीराच्या काही भागावर पांढरे ठिपके असतात. शरीरावरील केस छोटे व चमकदार असून शेळ्यांच्या मांड्यांवर मागे मोठे केस असतात. कान मध्यम आकाराचे व लोंबकळणारे असतात तर कधीकधी कानावर, मानेवर पांढऱ्या रंगाचे ठिपके दिसतात. ९० टक्के नरांमध्ये शिंगाचे प्रमाण जास्त आहे. शिंगे चपटी व मागे वळलेली आढळतात. कपाळ पुढे आलेले दिसते. कास ही छोट्या आकाराची असते. माद्यांमध्ये बहुदा शिंगे आढळून येत नाही. उस्मानाबादीचे प्रजननक्षम वय आठ ते नऊ महिने असून नऊ ते अकरा महिन्यात शरीर वजन १८-२२ किलो पूर्ण करत प्रजननक्षम बनतात. पहिल्या गर्भधारणेस वय ८-९ महिने आहे.
जन्मापासून माजावर येण्याचे वय ७ ते ८ महिने असून, गाभण काळ १४५-१५० दिवसाचा असतो. प्रथम विण्याचे वय १३ ते १४ महिने असते. उस्मानाबादी शेळी एक करडे जन्म घेण्याचे प्रमाण ३९ टक्के, जुळे पिल्ले ५१ टक्के, तिळे १० टक्के तर तीन पेक्षा जास्तचे प्रमाण ५ टक्के एवढे असते. करडांचे जन्मता सरासरी वजन २ ते २.५ किलो एवढे असते. मोठ्या उस्मानाबादी शेळीचे वजन ३० ते ३५ किलो व बोकडाचे वजन ४५ ते ५० किलो असते. उस्मानाबादी शेळ्यात दोन सलग वेतातील अंतर २१० ते २४५ दिवस असते. शेळी विल्यानंतर साधारणपणे ३ आठवड्याने माज दाखवतात. बोकड एक वर्षाचा झाल्यावर पैदासक्षम होतो. या शेळ्यामध्ये नर व मादी जन्माचे प्रमाण १:१ आहे. या शेळीचे आयुष्यमान सरासरी १० वर्षाचे असून प्रजनन काळ ८ वर्षाचा आहे. मरतुकीचे प्रमाण ५ टक्के आढळते.
हेही वाचा :
आता शेंळ्यांमध्येही कृत्रिम रेतन !
शेळ्यांच्या उत्पादन वाढीसाठी… !
दूध व मांस उत्पादन : उस्मानाबादी शेळीमध्ये दररोजचे सरासरी दूध उत्पादन ०.५ ते १.५ किलोग्रॅम एवढे असून, दूध देण्याचा कालावधी ३ ते ५ महिन्यांचा असतो. मांसासाठी तयार झालेल्या शेळ्यांमध्ये शरीर वजनाच्या ४५ ते ५० टक्के मांस मिळते. रोगप्रतिकारक शक्ती व हवामानात समन्वय साधण्याची क्षमता उस्मानाबादी शेळीत चांगली दिसून येते असल्या कारणाने उस्मानाबादी शेळी संपूर्ण महाराष्ट्रात आढळून येते.
डॉ. क्रांती प्र. खारकर, डॉ. डी. एस. काळे, श्री डी. व्ही. पाटील आणि डॉ. वाय. बी. साठे
पशुअनुवांशिंकी व पैदासशास्त्र विभाग, नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय ,नागपूर.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा