यंदा निसर्गाच्या दृष्ट चक्रातून शेतकर्यांची सुटका होणार की नाही ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण यंदा सततचा पाऊस, अतिवृष्टी यानंतर आता फळबागांवर बुरशीजन्य किटकांचा मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पावसामुळे बदलेल्या वातावरणाचा परिणाम केवळ सोयाबीन, कापूस या खरीप पिकांवरच नव्हे तर संत्रा, पपई या फळबागांवर दिसून येत आहे.
अशा प्रकारे बुरशीजन्य किटकांचा मोठा प्रादुर्भाव अमरावती जिल्ह्यात दिसून येत असून, अचलपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बुरशीजन्य किटक संत्रा फळबागांमध्ये दिसून येत आहेत. त्याच प्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातही पपई पिकावर बुरशीजन्य किटकांचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. एकंदरीत यंदा सततच्या पावसामुळे खरीपाची कोणतीही पिके शेतकर्यांच्या पदरात पडलेली नाहीत. त्यामुळे त्याची भिस्त फळबागांवर होती. मात्र सततच्या पावसामुळे बदलेल्या वातारणाचा परिणाम म्हणून बुरशीजन्य किटकांचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या तो काही जिल्ह्यात दिसत असला तरी त्याचा प्रसार इतर जिल्ह्यातही होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात हजारो हेक्टरवर संत्र्याच्या फळबागा आहेत. तेथील संत्रा फळबागांवर अशा प्रकारच्या बुरशीजन्य किटकांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून, मोठ्या प्रमाणात फळगळ होत आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणचे सौदे रद्द करण्याची वेळ आली आहे. गेल्या काही दिवसात याचे प्रमाण वाढत असून झाडावरील सुमारे 80 टक्के संत्र्यांचा सडा झाडाखाली दिसून येत आहे. शिवाय उर्वरीत 20 टक्के फळांचा दर्जाही घसरला असून, संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
हेही वाचा :
पपई बागेतील रोगांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना
यशस्वी लिंबू उत्पादक व्हायचेय ? समजून घ्या त्याचे तंत्रज्ञान
देशाचा विचार करता महाराष्ट्रात 80 टक्के संत्र्यांचे उत्पादन घेतले जाते. विदर्भातील केशरी संत्री जगप्रसिद्ध असून, नागपूरला त्यामुळेच ऑरेंज सिटी म्हटले जाते. शिवाय चांगले उत्पादन देणार्या संत्र्यांच्या विविध प्रगत जातींही विकसित करण्यात आल्या आहेत. असे असले तरी बुरशीजन्य रोगाच्या नैसर्गिक संटकामुळे संत्रा उत्पादक शेतकरीही हवालदिल झाला आहे. त्याच बरोबर जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील पपई पिकांवर याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पुढे डाळिंबावरही याचा प्रादुर्भाव होण्याची शक्याता वर्तविण्यात येत आहे.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा