कंदभाजीपाला पिकात कांदा या पिकाचा प्रामुख्याने उल्लेख होतो. महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे कांदा पिकवणारे राज्य असून नाशिक, पुणे, सातारा, नगर, सोलापूर, धुळे या जिल्ह्यात कांदा पीक प्रामुख्याने घेतले जाते. आपल्या देशाची उत्पादकता कमी असण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या देशात जवळजवळ 70 टक्के क्षेत्रावर स्थानिक वांणाचीच लागवड होते तसेच सुधारीत लागवड तंत्रज्ञान वापरण्याबाबत असलेली उदासिनता हे आहे.
देशाच्या एकूण उत्पादनाच्या 25 टक्के उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. देशामध्ये दहा टक्के कांदा आखाती आणि आशियायी देशात निर्यात होवून देशाला 300 ते 400 कोटी रूपयाचे परकीय चलन मिळते. भारतात कांद्याच्या लागवडीखाली चार लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असून, उत्पादन 50 ते 55 लाख टन इतके आहे; तर महाराष्ट्रात कांद्याखाली 72 हजार हेक्टर क्षेत्र आहे. वार्षिक उत्पादन 13 लाख 55 हजार टन एवढे आहे. एकूण क्षेत्रापैकी 20 टक्के क्षेत्र खरीप हंगामात 20 टक्के क्षेत्र रांगडा हंगामात व 60 टक्के क्षेत्र हे रब्बी हंगामात येते. भारतात खरीप हंगामातील उत्पादकता हेक्टरी आठ टन आहे. तर रब्बी हंगामातील उत्पादकता हेक्टरी 12 टन आहे. इतर प्रगत देशाचा विचार व अमेरीकेची उत्पादकता ही 42.9 टन तर नेदरलॅन्डची 39.1 टन प्रति हेक्टर एवढी आहे. आपल्या देशाची उत्पादकता कमी असण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या देशात जवळजवळ 70 टक्के क्षेत्रावर स्थानिक वांणाचीच लागवड होते तसेच सुधारीत लागवड तंत्रज्ञान वापरण्याबाबत असलेली उदासिनता हे आहे.
हवामान आणि जमीन : कांदा हे मुख्यत: थंड हवामानातील हिवाळी पीक आहे. कांदा पिकास 11 ते 12 तास स्वच्छ सुर्यप्रकाश व 70 ते 75 आर्द्रता आवश्यक असते. कांदा वाढीच्या सुरवातीच्या काळात 10 ते 15 सें. ग्रे., कांदा पोसण्याच्या काळात 20 ते 30 सें. ग्रे. आणि काढणीच्या काळात 30 ते 5 सें.ग्रे. तापमान राहिले आणि सुर्यप्रकाश 11 ते 12 तास मिळाला तर कांद्याची वाढ चांगली होते. कांदा पिकासाठी सुपीक, हलकी ते मध्यम भारी रेतीमिश्रीत व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामु 6.5 ते 7.0 च्या दरम्यान असावा. खारवट व चोपण जमिनीत कांदा चांगला पोसत नाही.
रोपे तयार करणे : रोपे तयार करण्यासाठी बियाणे खात्रीचे व सहा ते 12 महिन्याच्या आत तयार झालेले असावे. एक हेक्टर कांदा लागवडीसाठी रोपवाटिका तयार करायची झाल्यास 10 ते 12 गुंठे क्षेत्र विहीरीजवळ निवडून उभे आडवे नांगरूट तणविरहीत करावे. नंतर तीन बाय एक मीटर आकाराचे गादीवाफे तयार करावेत. गादीवाफे तयार करताना एका वाफ्यात दोन घमेले चांगले कुजलेले कंपोस्ट खत व 25 ग्रॅम मिश्रखत टाकावे. बी उगवणीनंतर 15 दिवसांनी हलकी खुरपणी करून 50 ग्रॅम युरिया व पाच ग्रॅम थिमेट टाकावे.
30 दिवसांनी 10 लीटर पाण्यात 15 मिली मोनोक्रोटोफॉस अधिक 25 ग्रॅम डायथेन एम 45 ते 10 मिली सँडोव्हीट मिसळून फवारणी करावी. रोपे लागवडीस काढण्यापूर्वी सात ते आठ दिवस अगोदर रोपांचे पाणी हळूहळू बंद करून रोपे काटक बनवावीत. खरीप हंगामात सात ते आठ आठवडे तर रब्बी हंगामात आठ ते नऊ आठवड्यात रोपे पुनर्लागवडीस तयार होतात.
पूर्वमशागत : जमीन उभी आडवी नांगरून त्यात 40 ते 50 टन कंपोस्ट खत चांगले मिसळून घ्यावे. जमिनीचा प्रकार, शेतीची उतार व हंगाम पाहून दोन मीटर रूंद व तीन ते पाच मीटर लांब सपाट वाफे बनवावेत. खरीप हंगामात पाऊसमान पाहून सरी वरंबा पद्धतीनेही लागवड करता येते. खरीप हंगामात 15 सें.मी. आणि रब्बी व उन्हाळी हंगामात 12.5 सें.मी. बाय 7.5 सें.मी. अंतरावर लागवड करावी.
लागवड : खरीप हंगामात मे-जून महिन्यात बी पेरावे, रोपांची पुनर्लागण जुलै-ऑगस्ट महिन्यात करावी तर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कांदा काढणी करावी. रांगडा हंगामात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात बी पेरणी करावी. ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात रोपांची पुनर्लागण करावी तर जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात कांद्याची काढणी करावी. रब्बी हंगामात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात बी पेरणी करावी. रोपांची पुनर्लागण डिसेंबर-जानेवारी महिन्यात करावे तर एप्रिल- मे महिन्यात कांद्याची काढणी करावी.
खत व्यवस्थापन : जमिनीचा प्रकार लागवडीचा हंगाम आणि जात यानुसार कांदा पिकास भरखते द्यावीत. खरीप हंगामात हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश व 50 किलो गंधक युक्त खत द्यावे. रांगडा हंगामात हेक्टरी 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश व 50 किलो गंधक युक्त खत द्यावे. तर रब्बी हंगामात हेक्टरी 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 80 किलो पालाश व 50 किलो गंधक युक्त खत द्यावे.
खतांच्या शिफारसीनुसार 50 टक्के नत्र, 100 टक्के स्फुरद, पालाश आणि 100 टक्के गंधकयुक्त खत लागवडीपूर्वी द्यावे. राहिलेले 50 टक्के नत्र दोन ते तीन हप्त्यात युरीया किंवा अमोनियम सल्फेरद्वारे पाण्याअगोदर विभागून द्यावे. नत्राची सर्व मात्रा रोपाच्या लागवडीनंतर 45 दिवसाच्या आतच द्यावी. गरज भासल्यास अथवा कमतरता आढळल्यास सुक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा करावा.
पाणी व्यवस्थापन : कांद्याचीमुळे जमिनीच्या वरच्या थरातच म्हणजे 8 ते 15 सें.मी. खोलीपर्यंतच वाढत असल्यामुळे कांदा पिकास फक्त पोच पाणीच द्यावे. जमिनीचा प्रकार व कांदा वाढीची अवस्था पाहूनच पाणी द्यावे खरीप हंगामात पाणी द्यावे. रब्बी हंगामात 10 ते 12 दिवसांच्या अंतराने व उन्हाळी हंगामात सात ते आठ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. व काढणीपूर्वी 15 ते 20 दिवस आधी पाणी बंद करावे. त्यामुळे कांदा पक्व होण्यास मदत होते. स्प्रिंकलर किंवा ठिबक सिंचन पद्धतीनेही कांदा पिकाला पाणी देत येते.
आंतरमशागत : तणांचा वेळीच बंदोबंस्त करण्यासाठी पहिली खुरपणी एका महिन्याच्या आत करावी. दुसरी खुरपणी त्यानंतर एक महिन्याने करावी. कांद्याची रोपे लावण्यापूर्वी कोरड्या वाफ्यामध्ये गोल किंवा स्ट्रॉम्प किंवा बासालीन 1.5 ते दोन लिटर 500 लीटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास 45 दिवसांपर्यंत तणांचा बंदोबंस्त करता येतो. ओली लागवड करायची झाल्यास लागवडीनंतर ओल्या वाफ्यात वरील तणनाशक मारले तरी चालते.
काढणी व उत्पादन : कांद्याच्या लागवडीनंतर जात आणि हंगामानुसार तीन ते पाच महिन्यात कांदा काढणीस तयार होतो. कांदा पक्व झाल्यावर नवीन पाने येण्याचे थांबते पानातील अन्नरस कांद्यामध्ये उतरून कांदा घट्ट होऊ लागतो. पात पिवळसर होऊ लागते. आणि गड्ड्याच्या वर आपोआप वाकून खाली पडते. साधारणपणे 50 टक्के माना पडल्यानंतर कांदा काढणीस तयार असे समजावे. कांद्यामध्ये जातिपरत्वे आणि हंगामानुसार उत्पादनामध्ये फरक पडतो. खरीप हंगामात कांद्याचे उत्पादन हेक्टरी 20 ते 25 टन इतके मिळते तर रब्बी हंगामात उत्पादन 30 ते 35 टन इतके मिळते. कांद्याची योग्य वेळी काढणी करून तो चांगला सुकविल्यावरच कांद्याची प्रत आकर्षकपणा आणि साठवणीत टिकून राहण्याची क्षमता अवलंबून असते.
डॉ. लालासाहेब तांबडे केंद्र समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर. (मोबा. 9422648395)