जेव्हा जगात शेती करण्यास सुरुवात झाली, अगदी तेव्हापासूनच शेतकरी बांधव पशुपालन करत आला आहे. देशात तसेच राज्यातही अनेक शेतकरी बांधव शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन करतात. गेल्या एका दशकापासून पशुपालनाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे, आता मोठ्या स्तरावर पशुपालन केले जाऊ लागले आहे. पशुपालनातून पशुपालक शेतकरी चांगली मोठी कमाई देखील करीत आहेत.
देशात तसेच राज्यात गाईचे पालन मोठ्या प्रमाणात होते. गाई पालन हे इतर पशुपालनाच्या तुलनेने सोपे असल्याने अनेक शेतकरी गाई पालनास पसंती दर्शवतात. भारतात जवळपास 26 गाईंच्या जातींचे पालन केले जाते, आज आपण यातील काही प्रमुख टॉप 5 गाईच्या जाती विषयी जाणून घेणार आहोत. पशुपालन व्यवसायात आणि दुग्ध व्यवसायात यशस्वी होण्यासाठी पशूची योग्य जात निवडणे महत्वाचे ठरते. पशुपालन जर केवळ दुग्धोत्पादनासाठी केले जात असेल तर दुग्ध क्षमता उत्तम असलेल्या पशूंच्या पालन केले जाते. देशात गाय पालन अनेक शेतकरी दुग्धोत्पादनासाठी करतात. आज आपण दुग्धोत्पादनासाठी उत्तम असलेल्या गाईंची देखील माहिती जाणून घेऊया.
भारतात पाळल्या जाणाऱ्या गाईंच्या जाती
देवणी : देऊनी गाय महाराष्ट्रातील एक गावरान गाय आहे, देवणी गाय ही पाळीव जनावराची जात मुख्यतः कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यात पाळले जाते. या गाईचे पालन सर्वात जास्त मराठवाड्यात केले जाते. अलीकडे राज्यातील इतर भागात देखील या गाईचे पालन मोठ्या प्रमाणात होत आहे. मराठवाड्यातील लातूर, नांदेड, बीड, परभणी तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात देवणी गाय प्रकर्षाने दिसून येते. या गाईला स्थानिक शेतकरी मराठवाड्याची कामधेनु असे देखील म्हणतात. देवणी गाय एका दिवसाला सात लिटरपर्यंत दूध देण्यास सक्षम असल्याचे सांगितले जाते. ही गाय एका वेतात जवळपास बाराशे लिटर दूध देण्यास सक्षम असते.
उत्तम दूध उत्पादन आणि शेताची नांगरणी यासाठी प्रसिद्ध असलेल्या देवणी जातीला सध्या अस्तित्त्वात असलेल्या गुरांची दुहेरी हेतू असलेली जात मानली जाते. तेलंगणा, कर्नाटक व महाराष्ट्रातील शेजारचे जिल्हयामध्ये देखील ह्या गाईची मागणी आणि पोहोच वाढत आहे. देवणी ची सामान्य वैशिष्ट्ये म्हणजे, व्यापक आणि रुंद कान, गुळगुळीत आणि मऊ त्वचा. या देवणी जातीच्या गायी अतिशय संवेदनशील असतात. सामान्यतः देवणी गाई कमी दूध देतात पण कधीकधी दिवसाला दहा लिटर देखील देऊ शकतात. एवढी क्षमता ह्या जातीच्या गायीमध्ये दिसून येते. देवणी आज भारतीय जातींमध्ये सर्वात वेगाने विकसित होणार्या जातींपैकी एक आहे.
खिल्लार : राज्यातील पश्चिम भागात या गाईचे पालन मोठ्या प्रमाणात केले जाते, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सोलापूर कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांत ही गाय प्रामुख्याने आढळते. खिल्लार गाय एका वेतात सुमारे 1000 लिटर दूध देण्यात सक्षम असल्याचे कृषी वैज्ञानिक नमूद करतात. या वंशाची गाय दिवसाला ३ ते ६ लिटर दूध देते. तसेच जर मुक्तगोठा असेल आणि वासरू सोबत असेल तर यांना दिवसातून ५ – ६ वेळा पान्हा फुटतो. पण इतर गोवंशापेक्षा या खिल्लार गोवंशाचे दूध हे आरोग्यास उत्तम आहे. आज महाराष्ट्रामध्ये दिवसाला १० लिटर दूध देणाऱ्या देखील जातिवंत खिल्लार गाई पाहायला मिळतात.
या गोवंशाचा रंग सहसा पांढरा असतो. काही प्रमाणात किंचीत मळकट रंग सुद्धा आढळतो. कातडी घट्ट चितकलेली व चमकदार असते. कातडीवरील केस चमकदार व बारीक असतात. यांची उंची जवळपास १४०-१५० सें मी पर्यंत असते. शिंगे गुलाबी, काळसर, लांब आणि पाठीमागे निमुळते असतात. कर्नाटक खिल्लार मध्ये शिंगे लहान निमुळती व मुळाशी जवळ असतात. तर माणदेशी खिल्लार मध्ये जाडजूड व मुळाशी थोडे दूर अशी शिंगे असतात. काटक शरीर व तापट स्वभाव यामुळे हे बैल अनेकदा मारके असतात. डोळे काळे व लांबट आकाराचे असतात. चेहऱ्याच्या तुलनेत कान लहान व शेवटला टोक असते. मान लांब व रुंद असते. गळ्याची पोळी म्हणजे गलकंबल मोठे नसते. वशिंड म्हणजे खांदे मध्यम असतात. माणदेशी खिल्लार चे वशिंड मध्यम असते. उत्तम आरोग्य असणाऱ्या या प्रजातीचे खूर गच्च व काळे असतात. शेपूट लांबलचक सापासारखे व शेपूटगोंडा काळा व झुपकेदार असतो. बैल मजबूत व तापट असल्याने हा गोवंश शर्यती व शेतीच्या कामासाठी सर्वोत्कृष्ट मानला जातो. दुष्काळी परिस्थितीत टिकून राहणारी ही प्रजाती आहे.
गौळावू (गवळाऊ) : गौळावू गाय हा देशी गोवंश आहे. या गायीची प्रजाती महाराष्ट्रातील विदर्भ भाग आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये आढळते. विदर्भातील नागपूर व वर्धा या दोन जिल्ह्यात ही गाय मोठ्या प्रमाणात आढळत असते.हा गोवंश नंद गवळी या लोकांकडून पाळला जातो आणि इतर शेतकऱ्यांना ते बैल आणि गाय विकतात. तो त्यांचा व्यवसाय आहे. या गायीच्या दुधामध्ये फॅटचे प्रमाण 5.5 इतके असते. गवळाऊ गायी कृष्णाच्या काळातील असल्याचे सांगितले जाते. देशी गायीचे गोमूत्र आणि शेण जमीन, पिकांसाठी-शेती साठी खुप उपयुक्त असते. त्यामुळे देशी गोवंश वाचविणे आज गरजेचे झाले आहे. गवळाऊ गाय एका वेतात 800 लिटरपर्यंत दूध देण्यास सक्षम असते.
राठी : दूध उत्पादन साठी या गाईचे पालन करण्याची शिफारस केली जाते. राठी गाय हा राजस्थानातील देशी गोवंश आहे. राजस्थानमधील उत्तर-पश्चिम भागातील गंगानगर, बीकानेर आणि जैसलमेर या भागात पशुपालक या गायीचे पालन मोठ्या प्रमाणात करतात. जास्त दूध उत्पादनामुळे ही गाय प्रसिद्ध आहे. या शिवाय गुजरात राज्यातही राठी गायीचे मोठ्या प्रमाणात पालन केले जाते. वयस्क राठी गायीचे वजन 280 ते 300 किलो तर राठी बैलाचे वजन 300 ते 350 किलोपर्यंत होते. राठी जातीच्या गायीचा रंग भूरकट पांढरा किंवा काळा पांढरा असा मिश्र असतो. राठी गायीची जात अधिक दूध देणारी म्हणून प्रसिद्ध आहे. ही गाय दिवसाला 8 ते 12 लिटर दूध देते. काही ठिकाणी तर 18 लिटरपर्यंत दूध देणार्या राठी गायी पहाण्यात आल्या आहेत. राठी जातीचे बैल मेहनतीला फारच चांगले असतात. उन्हाळ्याच्या दिवसातही या जातीचे बैल सलग 10 तास काम करू शकतात. राजस्थानच्या वाळूमय प्रदेशातही हे बैल भरपूर वजणाच्या सामानाची ने-आण करण्यासाठी उपयुक्त ठरतात. विशेषत: ही राठी गाय भारतातील कोणत्याही प्रदेशातील वातावरणात चांगली राहू शकते. या गायीला राजस्थानची कामधेनू असे म्हणतात. राठी गाय एका वेतात जवळपास अकराशे ते बाराशे लिटरपर्यंत दूध देण्यास सक्षम असते.
साहिवाल : देशातील सर्व सर्वोत्कृष्ट गायीच्या जातींत साहिवाल ही गाय मोडते. सहिवाल गाय हा पंजाब राज्यातील देशी गोवंश आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील संयुक्त पंजाब राज्यातील मांटगुमरी जिल्हा आणि रावी नदीकाठचे लायलगूर, लोधरान, गंजीवार आदी परिसरात सहवाल गाय दिसून येत असे. जास्त करून उत्तर पंजाब राज्यात ही गाय जास्त प्रमाणात पाळली जाते. मुख्यत: पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार व मध्य प्रदेशातही या गायीचे पालन केले जाते. एक वेळ वेल्यानंतर ही दहा महिन्यापर्यंत दूध देते. विशेष म्हणजे एका वेळी 10 ते 16 लिटर दूध देण्याची क्षमता या गायीमध्ये आहे.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
जागतीक स्थरावर का चर्चेत आहे, भारतीय गीर गाय ?
खिल्लार या गोवंशाला का म्हणतात पांढरे सोने ?
शाश्वत शेतीसाठी गोमाता एक वरदान
मराठवाडा भूषण म्हणणारी ‘देवणी’ गाय आहे तरी कशी ?
मोठे शरीर, लूज काताडी, लहान मुंडके व लहान शिंगे ही या गायीचे विशेष ओळख आहे. या गायीचे शरीर लांब आणि मांसल असते तर पाय लहान असतात. सहिवाल बैलाचे वजन 450 ते 500 किलो तर गायीचे वजन 300 ते 400 किलोपर्यंत असते. बैलाच्या पाठीवर उंच कुबड असते तर त्याची उंची 138 सेंमीपर्यंत असते. तर गायीची उंची 120 सेंमीपर्यंत असते. सहिवाल गायीचा रंग लाल किंवा गडद भुरकट असतो. कधी कधी यांच्या शरीराव पांढरे चमकदार ठिपकेही असतात. ही गाय एका दिवसात 10 ते 16 लिटर दूध देते. सहिवाल गाय आपल्या वेताच्या काळात सर्वसाधार 2270 लिटर दूध देते. सहिवाल गाय पालनामध्ये अतिशय कमी खर्च येतो. सहिवाल जातीच्या वंश कमी होऊ लागला असून, त्यावर काम करून पशू वैद्यक शास्त्रज्ञांनी सहवाल जातीची अस्सल सहिवाल देशी गायीच्या पाचवी पिढी निर्मितीमध्ये यश मिळवले आहे. सहिवाल या देशी गोवंशाचे पालन करून पशुपालक शेतकरी चांगली कमाई करू शकतात.
संदर्भ : शेतीमित्र मासिक (देशी गोवंश विशेषांक)
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा