थ्रिप्स ही द्राक्षवेलीवर येणार्या महत्त्वाच्या किडीपैकी एक कीड आहे. प्रौढ कीड ही काळ्या पंखाची लहान आकाराची असते. या किडींची मादी गडद तपकिरी रंगाची तर नर हा पिवळसर रंगाचा असतो. ही कीड आंबा, डाळिंब, गुलाब, पेरू, फणस, काजू इत्यादी वनस्पतीवर उपजीविका करते. पिल्ले तसेच प्रौढ कीडे ओरखडे ओढून पानांतून तसेच मण्यातून रसाचे शोषण करतात. त्यामुळे कोवळ्या पानांच्या कडा करपतात, पानांची तसेच शेंड्याची वाढ खुंटते. पानांना खोलगट आकार येतो, मण्यांवर तपकिरी रंगाचे डाग पडतात.
जीवनक्रम : या किडीची उत्पत्ती नर मादीचे समागस होऊन आणि समागस होता दुसर्या: प्रकारानेही होते. प्रौढ कीड पानाच्या खालच्या बाजूला अंडी घालते. बाल्यावस्था 11 ते 12 दिवसांची असते. त्यानंतर ही कीड दोन ते पाच दिवस कोषावस्थेत मातीमध्येच राहते. या किडीचा पूर्ण जीवनक्रम हा 14 ते 33 दिवसात संपुष्टात येतो. पूर्ण वर्षभरात पाच ते आठ पिढ्या थ्रिप्स ही कीड पूर्ण मातीमध्ये पूर्ण करतात. प्रौढ किडी उन्हाळ्यात पानातून रस शोषण्यासाठी तयार होते.
व्यवस्थापन व स्वच्छता : स्वच्छतेचा प्रमुख उद्देश हा कीड प्रतिबंध करण्यासाठीचा आहे. बागेत किंवा बांधावर जर ताण असेल तर कीड त्या तणावर येते आणि त्यानंतर आपल्या द्राक्षवेलीवर ती येत असते म्हणून बागेतील तण, बागेभोवतालचे तण चांगल्या प्रकारे काढून स्वच्छता ठेवली पाहिजे, त्यामुळे कीड नियंत्रण करण्यास खूप मदत होते.
व्यवस्थापनीय नियंत्रण (मशागतीने नियंत्रण) : उन्हाळ्यामध्ये खोलवर नांगरट करावी. त्यामुळे बागेतील जमीन व माती उघडी होऊन कोषावस्थेतील कीड नियंत्रित करून पुढील नुकसान टाळता येते. नत्रयुक्त खतांचा मर्यादित व समतोल वापर तसेच पुरेसे पाणी यांची शिफारस केली जाते.
जैविक नियंत्रण : थ्रिप्सची संख्या कमी करण्यासाठी चांगल्या दर्जाच्या जैविक किटकनाशकांची फवारणी जसे व्हर्टीसिलीयम लेकॅनी पाच मिली प्रति लिटर या प्रमाणात करावी.
जैविक किडनाशकांचा वापर : वेगवेगळे निमयुक्त किटकनाशक जसे-0.2 टक्के पाच मिली प्रति लिटर एक टक्के 2.5 मिली/लिटर पाच टक्के एक मिली प्रति लिटर फवारण्या कराव्यात.
रासायनिक किटनाशकांचा वापर : थ्रिप्स वर नियंत्रण करण्यासाठी बाजारात मिळणार्याक रासायनिक किटकनाशकांचा जसे थायोमेक्झान 0.25 ग्रॅम/ लिटर किंवा स्पायनोसॅड 45 एस.सी. 0.25 मिली/लिटर किंवा इमिडाक्लोपराईड 200 एस.एल. 0.3 मिली/लिटर फवारणीसाठी वापर करावा.

द्राक्षावरील तुडतुडे : तुडतुडे हे आकाराने पाचरीसारखे असतात. हे रंगाने हिरवे असून चालताना ते तिरकस चालतात. तुडतुडे ही कीड उत्तर भारतात जास्त प्रमाणात आढळते. प्रौढ कीड ही आकाराने लहान तीन एम.एम. लांबीची आणि पिवळसर हिरव्या रंगाची असते.
जीवनक्रम : ही कीड पानाच्या खालच्या भागात शिराजवळ अंडी घालते. एका वर्षात ही कीड अनेक जीवनक्रम पूर्ण करते. या किडीचा रस शोषणाचा काळ मात्र पूर्ण वर्षभर असतो. ही कीड पानातील रस शोषून आपली उपजीविका करत असते. त्यामुळे पाने वरच्या बाजूस वाळतात व त्याच्या कडा लालसर पिवळ्या होतात. कालांतराने अशी पाने पिवळी पडून गळून पडतात व झाडाची वाढ खुंटते.
व्यवस्थापन : तुडतुडे या किडीचे नियंत्रण हे थ्रिप्स प्रमाणेच केेले जाते.
डॉ. एन. एस. कुलकर्णी शास्त्रज्ञ, रा. द्रा. सं. केंद्र, पुणे.