मातीतील अन्नाशांचे प्रमाण तपासून त्यानुसार खतांच्या मात्रा देणे नेहमीच फायदेशीर असते. मातीचा सामू म्हणजे आम्ल-विम्ल निर्देशांक, पाण्यात विरघळणारे क्षारांचे प्रमाण, चुन्याचे प्रमाण, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद व पालाश तसेच जिप्सम, गंधक यांची जमिनीतील प्रमाण समजण्यासाठी माती परिक्षण ही अतिशय महत्त्वाची चाचणी आहे. शिवाय पृथकरण अहवालावरून आलेल्या निकालाची योग्य वर्गवारी करणेही आवश्यक असते, तसेच त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी केली तरच आपणास त्याचे महत्त्व समजू शकेल. शिवाय जमिनीतील सुक्ष्म अन्नद्रव्ये, भौतीक गुणधर्म व निचरा म्हणजेच थोडक्यात जमिनीचे आरोग्य कशा प्रकारचे आहे हे समजते.

जमिनीच्या सामूवरून जमिनीची आम्लता व विम्लता मोजता येते. सामू सहा पेक्षा कमी असेल तर आम्लयुक्त, 6.5 ते 7.5 च्या दरम्यान योग्य, 8.5 पेक्षा जास्त असेल तर विम्लयुक्त जमीन असते. जमिनीचा सामू व अन्नद्रव्याची उपलब्धता यांचा परस्पर संबंध असून सामू सहा ते सात दरम्यान असेल तर अन्नद्रव्याची उपलब्धताही अधिक रहाते. तसेच क्षारांच्या बाबतीत देखील क्षरांचे प्रमाण हे 0.4 ते 0.8 डेसिसायमन/चौ. मी. पेक्षा कमी असेल तर जमीन चांगली म्हणता येते पण हिर क्षारता 1.2 किंवा 3.2 पर्यंत वाढली तर ती जमीन जास्त क्षारयुक्त गटात मोडते. अशा जमिनीत क्षारास प्रतिकार करणारी पीकेच वाढू शकतात मात्र क्षारांचे प्रमाण 3.2 पेक्षा जास्त झाल्यास सर्वसाधारण पिकांकरता अशी जमीन अपायकारक ठरू शकते.
माती परिक्षणाचा नमुना घेण्यावर माती परिक्षणाचे यश अवलंबून असते. मातीचा अरोग्य नमुना घेतल्यास मृद चाचणी उपयुक्त ठरत नाही. तसेच मातीचा नमुना कोणत्या कारणाकरता घ्यायचा आहे हेही तेवढेच महत्त्वाचे असते. नमुना हा प्रातिनिधीकपरंतु संयुक्त असावा.

मातीचा नमुना घेण्याकरता हॉपर नळी, नमुन्याची सळई, स्क्रू गिरमीट शिवाय शेतातच उपलब्ध होणारे फावडे, खुरपी किंवा थापी जरूरीप्रमाणे वापरावी. सर्वसाधारण नमुना घेण्याचे क्षेत्र हे दोन ते आठ एकर असावे व क्षेत्र खुप उंचसखल असेल तर आकारमान कमी करावे. जमिनीचा रंग, चढउतार, खोली खडकाळपणा, खोलगटपणा, पाणथळ जागा, क्षारयुक्त, विम्लयुक्त, निारायुक्त, जमिनीचा आणि पिकाचा प्रकार, जमीन व्यवस्थापन पूर्वी घेतलेली पिके यांचा विचार करून त्याचे विभाग पाडावेत व प्रत्येक विभागातून मातीचा स्वतंत्र नमुना घ्यावा. एकसारख्या दिसणार्या जमिनीतील चार ते 16 नमुने 30 सें. मी. खोलीपर्यंत घेवून त्याचा एक प्रातिनिधीक संयुक्त नमुना घ्यावा.

क्षेत्र लहान असल्यास सुधारित शेती पद्धतीचा अवलंब करीत असल्यास आठ जागी नमुने घेवून त्याचा एक संयुक्त नमुना तयार करावा. फळबाग किंवा द्राक्षवेलीसाठी साधारणपणे 40 ते 50 सें. मी. खोलीपर्यंतचा नमुना घ्यावा. विम्लयुक्त जमिनीच्या अभ्यासासाठी 90 सें.मी. खोलीपर्यंत नमुना घ्यावा.
सर्वसाधारणपणे हंगामाचा परिणाम कमीत कमी होत असताना म्हणजेच मध्य उन्हाळा ते पावसाळा सुरू होण्यापूर्वी मातीचा नमुना घ्यावा. हंमामापेक्षही पिकांची फेरपालटही तेवढीच महत्त्वाची असते. पिकाची काढणी झाल्यानंतर परंतु नांगरणीपूर्वी किंवा दुसरे पीक लावण्यापूर्वी माती परिक्षणासाठी नमुना घ्यावा. शेतात पीक उभे असल्यास दोन ओळीमधुन घ्यावा. शेतात रासायनीक खते टाकली असल्यास दोन ते अडीच महिन्यानंतर मातीचा नमुना घ्याव. जमीन हलकी असल्यास प्रत्येक वर्षी तसेच फेरपालटाचे पीक असल्यास प्रत्येक हंगामात माती परिक्षण करून घ्यावे.
शेतातील मोठ्या झाडाखालील, विहिरी जवळील, शेताच्या बांधावरील, वनस्पतीचे अवशेष असलेला, सेंद्रिय पदार्थ जाळलेली, कचरा टाकण्याच्या जागेतील, जनावरे बसण्याच्या जागेतील, रस्ता, कुंपन, इमारतीजवळील मातीचा नमुना घेऊ नये. तसेच रासायनिक खताच्या रिकाम्या पिशव्या नमुना भरण्यासाठी वापरू नयेत. फळबागांसाठी 100 सें. मी., कडधान्य व अन्नधान्य पिकास 20 सें. मी. तर ऊस पिकासाठी 30 सें. मी. खोलीपर्यंतचा नमुना घ्यावा.

नमुना घेताना शेत जमिनीच्या पृष्ठभागावरील काडीकचरा बाजूला सारून एका क्षेत्रातील 10 ते 12 ठिकाणचे नमुने घ्यावेत. टखुरपे किंवा फावडे यांचा उपयोग करून इंग्रजीतील व्ही आकाराचा 15 ते 20 सें. मी. खोल खड्डा खोदावा व तिरक्या छेदावरील साखारणपणे दोन ते तीन सें. मी. थर काढून घ्यावा. असे 10 ते 15 नमुने एकत्र गोणपाटावर पसरावेत नंतर त्याचे समान चार भाग करून विरुद्ध बाजूचे दोन भाग निवडावेत आणि दोन भाग टाकून द्यावेत ही कृती साधारणपणे अर्धा किलो नमुना मिळेपर्यंत करावी.
माती ओली असेल तर सावलीत वाळवून लाकडी खलबत्त्याने बारीक करून दोन मी. मी. चाळणीतून चाळून नंतर आपल्या नजीकच्या कृषी अधिकार्याकडे, भेट योजने मार्फत मृद चाचणी प्रयोगशाळेकडे किंवा खाजगी प्रयोगशाळेकडे पाठवावा.
हेही वाचा
आता केवळ 90 सेकंदात माती परीक्षण
काय आहे माती परिक्षणाचा मुलमंत्र ?
पीक संरक्षणात विविध अन्नद्रव्यांचे कार्य
माती परिक्षणानंतर परिक्षण अहवालानुसार व्यवस्थापन करणे अतिशय महत्त्वाचे असते त्यानुसार शेतजमिनीत अन्नद्रव्यांचे प्रमाण अती कमी असल्यास वनस्पतींना लागणार्या खताच्या नेहमीच्या शिफारशीपेक्षा दीडपट, कमी असल्यास सव्वापट आणि मध्यम असल्यास नेहमी दिल्या जाणाऱ्या खतांच्या शिफारशी इतके खत द्यावे. जमिनीत अन्नद्रव्ये मध्यम जास्त, जास्त व अति जास्त असल्यास खतांच्या मात्रा अनुक्रमे 20, 40 आणि 60 टक्के या प्रमाणात कमी कराव्यात.
संदर्भ : शेतीमित्र मासिक (मातीपरिक्षण विशेषांक)

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा