वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे दैनंदिन व मासिक बजेट कोलमडल्याची बाब एका अहवालातून अधोरेखित झाली आहे. अन्नधान्य, किराणा सामानातील नेहमीच्या वस्तू तसेच, अन्य दैनंदिन वस्तूंच्या (एफएमसीजी) मागणीत मार्चअखेरच्या तिमाहीत (गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत) घट झाल्याचे दिसून आले.
महत्त्वाची घोषणा : रासायनिक खतांच्या नव्या किमती जाहीर
जागतिक स्तरावर ग्राहकसंबंधी संशोधन करणाऱ्या कँटर वर्ल्डपॅनलने दिलेल्या अहवालानुसार मार्चअखेरच्या तिमाहीत सर्व वस्तूंच्या मागणीत सरासरी 0.8 टक्क्यांची घट नोंदवली गेली. ग्रामीण भागात वस्तूंच्या मागणीत 1.7 टक्के वाढ नोंदवली गेली असताना शहरी भागात मात्र या वस्तूंच्या मागणीत 3.4 टक्क्यांची घट झाली. दैनंदिन गरजेच्या वस्तू विकणाऱ्या कंपन्यांची भिस्त ही शहरी भागावरच असून त्यांच्या एकूण विक्रीपैकी दोन तृतीयांश विक्री ही शहरी भागांत होते.
हे नक्की वाचा : रिझर्व्ह बँक म्हणते, लवकरच महागाईचा भडका उडणार
अन्य धान्य व दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या मागणीत घट होण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. यापूर्वीच्या दोन तिमाहींतही याप्रकारे घट नोंदवली गेली होती. इंधनदरातील वाढ, महागाई व ओमायक्रॉनमुळे यंदा जानेवारी ते मार्च या तिमाहीत सर्वसामान्य नागरिकांनी खरेदी करताना हात आखडता घेतला. बहुतांश भारतीयांचे मासिक उत्पन्न हे मर्यादित असते. एफएमसीजीसह इंधनदरातील वाढ, खाद्यतेलातील दरवाढ आणि महागलेली अन्नधान्ये यामुळे मार्चच्या तिमाहीत मागणीत घट झाली, असे हिंदुस्थान युनिलिव्हरचे व्यवस्थापकीय संचालक संजीव मेहता यांनी इकॉनॉमिक टाइम्सला सांगितले.
प्रमुख आहारघटकांना सर्वाधिक झळ : महागाईमुळे दैनंदिन प्रमुख आहारास (डाळी, कडधान्ये, खाद्यतेल वगैरे) सर्वाधिक झळ बसल्याचे दिसून आले. मार्चअखेरच्या तिमाहीत प्रमुख आहारातील घटकांची मागणी 7.6 टक्क्यांनी घटली. तर, खाद्यान्न व पेये यांची मागणी 2.2 टक्क्यांनी कमी नोंदवली गेली.
लक्षवेधी बातमी : राज्यपालांच्या हस्ते कृषीरत्न पुरस्कार स्वीकारण्यास राजेंद्र पवारांचा नकार !
गव्हाच्या अनुमानित उद्दिष्टात कपात : केंद्र सरकारने गव्हाच्या अनुमानित उत्पादन उद्दिष्टात तब्बल 5.7 टक्क्यांनी कपात केली आहे. ही कपात चालू शेती हंगामासाठी असून पुढील महिन्यात, जूनमध्ये हे कृषी वर्ष संपत आहे. 2021-22 च्या कृषीवर्षात 111.32 दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन होईल, असे अनुमान सरकारने यापूर्वी केले होते. परंतु सुधारित अनुमानानुसार 105 दशलक्ष टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. केंद्रीय अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यंदा नेहमीपेक्षा आधीपासून उष्मा जाणवू लागल्याने गव्हाच्या पिकात घट होण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. गेल्या कृषीवर्षात (2020-21) देशात एकूण 109.59 दशलक्ष टन गव्हाचे पीक घेण्यात आले होते.
हे नक्की वाचा : भारतीय शेतकरी शेतीतून कमावतो तरी किती ? NSSO चा रिपोर्ट
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1