सीताफळ म्हटले की, हलकी जमीन, जिथं काही पिकत नाही. दुर्लक्षित माळरानावर पाणी नसलेल्या ठिकाणी काहीही कष्ट न करता येणारे झाड असा बहुतांश शेतकर्यांचा समज आहे. मात्र द्राक्ष, डाळिंबाच्या बरोबरीने उत्पादन घ्यायचे असल्यास सीताफळासाठी कसदार जमीन, गरजेप्रमाणे पाणी देण्याची सोय आणि सीताफळाकडे पाहण्याचा दृष्टीकोन चांगला हवा. विशेषत: सीताफळाच्या चांगल्या जातीची निवड करणे सर्वांत महत्त्वाचे आहे.
एनएमके 1 म्हणजे काय ? हा प्रश्न अनेकजणांना पडतो. सीताफळ शेतीमधील झाडाच्या बारीक नोंदी, अभ्यास आणि निरिक्षण करताना चांगले गुणधर्म आलेले एक वेगळे झाड 2001 मध्ये माझ्या निदर्शनास आले. त्या झाडाचा सलग 10 वर्षे अभ्यास करून या वाणाची गुणवैशिष्ट्ये शेतकर्यांच्या दृष्टीने अतिशय चांगली असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यामुळे हा वाण वाढविण्यावर भर आम्ही दिला. या वाणांना काय नावे द्यायची हा प्रश्न त्यांना पडला. ज्येष्ठ कृषी अभ्यासक, कृषीभूषण वि. ग. राऊळ यांच्या सल्ल्यावरून त्यांनी नवनाथ मल्हारी कसपटे या माझ्या नावाची अध्यक्षरांचा उपयोग करून एनएमके असे नाव दिले.
आम्ही या निवड पद्धतीने विकसित केलेल्या वाणांना एनएमके-1 गोल्डन, एनएमके-2, एनएमके-3, एनएमके-4 व फिंगरप्रिंट अशी नावे दिली. यापैकी एनएमके-1 गोल्डन हा वाण सर्वगुण संपन्न असल्याने त्या वाणाच्या संशोधन, अभ्यास व वाढविण्यावर मी स्वत: भर दिला आहे. एनएमके-1 या जातीला सध्या बाजारात ‘गोल्डन’ हे नाव प्रचलीत झाले आहे. त्यामुळे सिताफळाच्या बाजारात ही जात गोल्डन म्हणून ओळखली जाते. अॅनोना-2 या जातीबाबतही असेच झाले आहे. अॅनोना-2 या जातीला बाजारात हनुमान फळ म्हणून ओळखले जाते. असे का झाले तर अॅनोना-2 किंवा एनएमके-1 ही नावे मुळात इंग्रजी आहेत. शिवाय ती उच्चारण्यास आणि लक्षात राहण्यासही व्यापारी व सामन्य शेतकर्यांना थोडी अवघड वाटतात. त्यामुळे आकार आणि त्याच्या दिसण्यावरून जसे अॅनोना-2 ला हनुमान फळ नाव पडले तसेच एनएमके-1 या जातीच्या गोल्डन रंगावरून या जातीला ‘गोल्डन’ हे नाव प्रचलीत होत आहे. मात्र तिचे मुळातील नाव हे एनएमके-1 हेच आहे.
गुणवैशिष्ट्ये : एनएमके-1 गोल्डन या वाणात गर भरपूर आहे. यातील बियांची संख्या 15 ते 20 आहे. साखरेचे प्रमाण 22 ते 24 टक्के तर गराचे प्रमाण 70 ते 75 टक्के आहे. फळांचा आकार बाळानगरीच्या तुलनेत मोठा असून, त्याचे वजन 300 ते 1000 ग्रॅमची फळे जास्त प्रमाणात मिळतात. इतर वाणाच्या तुलनेत एनएमके-1 गोल्डन हा वाण दिसायला देखणा, डोळे मोठे, रंग सोनेरी पिवळा आकर्षक असा आहे. टिकवण क्षमता जास्त असल्यामुळे हा वाण निर्यात करण्यासाठी योग्य वाण आहे, या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे या फळाला आजिबात तडे जात नाहीत. बाळानगरी मधील सर्व दोष विरहीत हा वाण आहे.
एनएमके-1 गोल्डन या सीताफळ वाणाचा बहार बाळानगर बरोबर जूनच्या पहिल्या पावसात घ्यावा लागतो. कारण जूनचा पहिला पाऊस झाल्यानंतर निसर्गत: सर्वच सीतफळाला बहार मिळतो. परंतु काढणीसाठी बाळानगर हा वाण चार ते पाच महिन्यामध्ये पूर्णत: तयार होतो. या काळामध्ये एनएमके-1 गोल्डनचे एकही फळ तयार झालेले नसते. स्थानिक (लोकल) सीताफळांना एकाच वेळी बहार मिळतो आणि एकाच वेळी बाजारपेठेत आल्यामुळे अतिशय कमी भाव मिळतो आणि उशिरा बहार घेण्याचे कोणतेही तंत्र अद्याप विकसित झालेले नाही. परंतु एनएमके-1 गोल्डन या वाणाचे वैशिष्ट म्हणजे बाळानगर बरोबर एकाचवेळी बहार मिळून सुध्दा याला तयार होण्यासाठी जास्त कालावधी लागतो. इतर वाणाच्या तुलनेत एनएमके-1 गोल्डन या वाणाला बाजारात नेहमीच चांगला भाव मिळतो. त्याची अनेक कारणे आहेत; त्यापैकी महत्त्वाचे कारण म्हणजे, बाळानगर व स्थानिक (लोकल) सर्व सीताफळे संपल्यानंतर हा वाण बाजारात विक्रीसाठी चालू होतो. त्यामुळे बाजारातील स्पर्धा संपलेली असते आणि हंगामही संपत आलेला असतो; त्यामुळे या वाणाला चांगला भाव मिळतो.
लागवड तंत्रज्ञान : एनएमके-1 गोल्डन या वाणाची लागवड 12 महिन्यात केव्हाही करता येते. लागवडीसाठी खात्रीच्या कलमी रोपांचाच वापर करावा. लागवडीपासून दोन वर्षानंतर फळे मिळण्यास सुरूवात होते. लागवडीनंतर पाचव्या सहाव्या वर्षी पूर्ण क्षमतेने फळधारणा सुरू होते. लागवडीतील अंतर 16 बाय 8 फुट ठेवल्यास एकरी 340 झाडे बसतात. लागवडीनंतर पहिली दोन वर्षे अंतरपीक घेता येते. अंतरपीक म्हणून सोयाबीन, मुग, उडीद, हरभरा व कांदा अशा प्रकारची कमी कालावधीतील आणि कमी उंचीची पिके घ्यावीत. वरील प्रमाणे अंतर ठेवून लागवड केल्यास पूर्ण वाढलेल्या झाडावर 100 ते 125 फळे ठेवावीत. म्हणजेच एक चौरस फुटाला एक फळ ठेवावे.
बहुतेक सीताफळाच्या सर्व जातींना फळे कमी लागण्याची समस्या असते; परंतु एनएमके-1 गोल्डन या वाणस आजपर्यंतच्या अनुभवावरून झाडावर गरजेपेक्षा जास्त फळे लागतात. एनएमके-1 गोल्डन या वाणाला फळे उशिरापर्यत म्हणजे जानेवारीपर्यंत राहत असल्यामुळे पावसानंतर जानेवारीपर्यंत पाणी मिळणे गरजेचे आहे. या वाणाला सर्वसाधारणपणे जानेवारी ते जून असे पाच ते सहा महिने पाणी द्यायचे नसते. या काळात पाणी दिल्यास सुप्ताअवस्था विस्कळीत होऊन झाडावर व फळधारणेवर विपरीत परिणाम होतो. बाळानगर आणि स्थानिक सीताफळाचा उन्हाळी बहार धरता येतो परंतु पाऊस पडला तर उशिरा फळे आणता येत नाहीत. जून-जुलैच्या पावसावरचाच बहार धरावा आणि बाळानगर किंवा इतर स्थानिक वाणाची स्पर्धा टाळावी.
छाटणी तंत्रज्ञान : सीताफळाच्या झाडाची छाटणी पूर्वी कोणीही करत नव्हते. परंतु आजकाल छोटे मोठे अनेक प्रयोग करून छाटणी केल्याचे फायदे लक्षात आले आहेत. छाटणीचा कालावधी झाडावरील पाने निसर्गत: पूर्ण गळाल्यानंतरच छाटणी करावी. बहर धरण्याच्या अगोदर नवीन फूट फुटण्याच्या अगोदर छाटणी करावी. सुरूवातीलाच झाडाला आकार देणे चांगले असते. रोप लावल्याबरोबर झाडाचे खोड सरळ राहील अशा पद्धतीने बांबूच्या काठीचा आधार देऊन खोड बांधून घ्यावे. जमिनीपासून अडीच ते तीन फुटापर्यंत एकच खोड ठेवावे. त्याच्यानंतर शेंडा मारून एकाचे दोन दोनाचे चार चाराचे आठ अशा पद्धतीने दोन दोन फुटावर फुटीचा शेंडा मारून फांद्याची संख्या वाढवून डेरेदार झाड तयार करावे.
छाटणी करताना बारीक फांद्या ठेवल्यास फळांची संख्या वाढते मात्र फळे त्या मानाने लहान रहातात. जाड फांद्या ठेवल्यास फळांची संख्या कमी रहाते मात्र त्या मानाने फळे मोठी होतात. छाटणी केल्यापासूनचा बहर घेण्याचा कालावधी कमी असेल तेवढ्या फांद्या शेंड्याच्या बाजूने जास्त फुटतात व छाटणीनंतर बहर धरण्याचा कालावधी जेवढा जास्त असेल तेवढ्या फांद्या शेंड्यापासून पाठीमागे फुटण्याचे प्रमाण जास्त असते. दरवर्षी छाटणी केलेली बरी त्यामुळे फळे दर्जेदार मिळतात. एखाद्या वर्षी छाटणी केली नाही तर फळांची संख्या जास्त मिळते, परंतु फळांचा दर्जा व आकारमान कमी मिळते. दर तीन ते चार वर्षातून एकदा हेवी छाटणी करावी. त्यामुळे फळांचा दर्जा टिकूण रहातो व झाडांचा आकारही चांगला रहातो. छाटणी केल्यानंतर पाणी देण्याची गरज नसते. पावसानंतर बहर घ्यावा व नंतर गरजेनुसार पाणी द्यावे.
पाणी व्यवस्थापन : बहुतांश फळबागांना उन्हाळ्यात पाणी गरजेचे असते. एनएमके-1 गोल्डन सीताफळाला मात्र रोप अवस्थेत लागवडीनंतर पहिल दोन वर्षेच उन्हाळ्यात पाणी द्यावे. त्यापुढे एकदा रोप मोठे झाले की कधीही उन्हाळ्यात पाणी देवू नये; आणि त्याची गरजही नाही.
खत व्यवस्थापन : नव्याने लावलेल्या एक वर्षे वयाच्या बागेस 19:19:19 व ह्युमिक अॅसीड या खतांचे ड्रीचींग करावे. चार ते पाच वर्षे वयाच्या सीताफळ झाडांना अंदाजे 40 ते 50 किलो शेणखत झाडाच्या दोन्ही बाजूस टाकावे. नव्या बागेला शेणखत कमी टाकावे. बागेत टाकलेले शेणखत मातीने झाकावे; उघडे ठेवू नये. दोन ओळीच्या मधील पट्ट्यात पाळी टाकूण घ्यावी. बागेत फुल किंवा फळधारणा चालू असताना नत्रयुक्त रासायनिक खते देणे टाळावे. 30 ते 40 टक्के सेटींग पूर्ण होऊन फळे हरभर्या एवढी दिसू लागल्यास 12:61:00 या खताची मात्रा बागेस गरजेनुसार द्यावी. फळे लिंबाच्या आकारापेक्षा मोठी होऊ लागल्यास फळे फुगवणीसाठी 00:52:34 किंवा 13:40:13 ही खते सोडावीत. फळांना उठावदार रंग येण्यासाठी 00:00:50 हे खत बागेच्या वयानुसार द्यावे.
कीड-रोग नियंत्रण : एनएमके-1 गोल्डन या वाणाच्या सीताफळावर मुख्यत: मिलीबग, थ्रिप्स आणि फळमाशी या किडी व पानावरील ठिपके आदींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे असते. बहार धरल्यानंतर बोर्डोमिश्रणाचा वापर करावा. वेळप्रसंगी जैविक कीड नियंत्रणाचाही वापर करावा. विशेषत: बागेच्या विश्रांतीच्या काळात पाण्याच्या ताण व्यवस्थित दिल्यास अनेक किडींचे जिवनचक्र थांबून नियंत्रण ठेवणे सोपे जाते.
फळमाशीचे नियंत्रण : फळांमध्ये अळी निघते. त्यालाच फळमाशीचा प्रादुर्भाव असे म्हणतात. या फळमाशीचा (अळीचा) प्रादुर्भाव आपल्या बागेत होवू नये म्हणून आपल्या बागेत पाहिले फळ काढणीस तयार होण्याच्या 15 दिवस अगोदर न्युनॉन व क्लोरोपायरीफॉस 50 टक्के प्रति लि. 2 मिली अलटून-पालटून आठ दिवसाच्या दिवसाच्या अंतराने फळे संपेपर्यंत फवाराणी करून घ्यावी. या उपाय योजनेसाठी वर्षांला दर एकरी केवळ एक हजार रुपये खर्च येतो. आपण फवारणी आज चालू केली तरी पंधरा दिवसानंतर एकही फळामध्ये अळी सापडणार नाही.
फळांची तोडणी : एनएमके – 1 गोल्डन या वाणाच्या फळावर मोठे डोळे असतात. फळे पक्व होताना फळांचा गर्द हिरवा रंग कमी होऊन तो फिक्कट होतो. फळावरील डोळे उंचावून विलग होताना दिसतात. फळावरील हे डोळे उकलू लागले व आतील दुधाळ भाग दिसू लागला की, फळे काढणीस तयार झाली आहेत असे समजावे.
या वाणाची टिकवण क्षमता जास्त आहे. त्यामुळे फळे काढणीस तयार झाल्यानंतरही ती 15 ते 20 दिवस झाडावर तशीच ठेवता येतात. या वाणाची फळे झाडावरून तोडल्यानंतर पाच ते सहा दिवसात पिकतील अशा अवस्थेत असताना तोडली तरी चालतात. तोडणीचा काळ 10 ते 12 दिवस मागे पुढे करता येतो. अर्थात ढगाळ वातावरण नसल्यास दोन तोड्यातील अंतर सहा ते सात दिवसाचे ठेवता येते.
एकंदरीत एनएमके-1 गोल्डन या वाणाची फळे दूरच्या बाजारपेठेला पाठवायाला सोयीचे होते. बाहेरच्या मार्केटमध्ये पाठविण्यासाठी ती सुरुवातीच्या काळात काढावी म्हणजे ती 6 ते 7 दिवसापर्यंत पिकत नाहीत. झाडावर तयार झालेली फळे न काढल्यास पिकून झाडावरून खाली पडले तरी ती फुटत नाहीत. ती तोडलेल्या फळासारखीच ताजी रहातात. इतर वाणाच्या फळाप्रमाणे ते वाया जात नाही.
डॉ. नवनाथ मल्हारी कसपटे, मु. पो. गोरमाळे, ता. बार्शी, जि. सोलापूर. मोबा. 9822669727