सफेद मुसळी हे एक औषधी पीक असून, बलवर्धक, पुष्टीवर्धक, शुक्र्जंतुवर्धक व कामशक्तीवर्धक आहे. सफेद मुसळी पित्त, कफ व वातनाशक आहे. ती दुग्धवर्धकही आहे. आयुर्वेदात सफेद मुसळीच्या अनेक गुणधर्माचे वर्णन आहे. शतावरी व सफेद मुसळी याचा उपयोग सध्या जवळ जवळ सर्व शक्तिवर्धक औषधांमध्ये करतात म्हणून सफेद मुसळी व शतावरी या औषधी “वियग्रा” प्रमाणे लोकप्रिय होत आहेत. सफेद मुसळीचा उपयोग “जनरल टॉनिक” म्हनून आबाल – वृद्धांनपासून सर्वजण करतात. सफेद मुसळीच्या मुळ्यांची बारीक भुकटी करावी. दिवसातून १ – २ वेळेस दुधातून प्रतेक वेळेस २ – ३ ग्रॅम भुकटी मिसळून घ्यावी.
सफेद मुसळीचे घटक : सफेद मुसळी मध्ये पिष्टमय पदार्थ ३९ .१० % ते ६५.८० %, प्रथिने ८.५० ते १३.००, सॅपोनिन ०.१७ ते ०.१८ % असते. तसेच यामध्ये सोडीयम ,पालाश, चुना, स्फुरद, झिंक, तांबे ही खनिज द्रव्येपण असतात.
हवामान : बर्फाळ व खूपच थंडीचा प्रदेश सोडून भारतामध्ये ह्या पिकांची लागवड सर्व राज्यांमध्ये करतात येईल. या पिकास साधारणत ५० ते ७५ सेमी पाऊस लागतो. पावसाचे प्रमाण खूपच कमी असल्यास त्याप्रमाणे पाणी द्यावे लागते.
जमीन : सफेद मुसळीच्या मुळया जमिनीत वाढत असल्यामुळे जमीन एकदम भुसभुशीत असावी. जमीन जर चिकन मातीची व पाण्याचा व्यवस्थित निचरा न होणारी असेल तर मुळया व्यवस्थित वाढणार नाहीत किवा मुळया सडण्याची भीती असते. म्हणून पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन या पिकासाठी निवडावी. जास्त चुनखडी युक्त किवा जास्त क्षार युक्त जमीन ह्या पिकास अयोग्य समजली जाते. जमिनीचा सामु ६ ते ७ असावा.
जाती : सफेद मुसळीच्या जगामध्ये एकुण ३०० जाती आहेत. त्यामध्ये २४० ते २५० जाती आफ्रिका खंडात आहेत. भारतामध्ये ३० पेक्षा जास्त जाती आहेत. जास्तीत जास्त शेतकरी मोठी व लांब कंद असलेली ,भरपूर उत्पादन देणारी, अधिक सॅपोनींचे प्रमाण असलेली नवीन जात निवड पद्धतीने विकसित करीत आहेत. यांची नवीन जाती बाजारात येत आहेत.
लागवड : खूप खोल नांगरट करावी. कुळव्याच्या पाळया देऊन जमीन भुसभुसित करावी. लागवड १ जुन ते १५ जुलैच्या दरम्यान करावी ज्याच्याजवळ पाण्याची सोय आहे त्यांनी जुन च्या पहिल्या आठवड्यात जमिनीला पाणी देऊन ती थंड झाल्यावर लागवड करावी. ज्यांच्याजवळ पाण्याची सोय नाही त्यांनी १-२ चांगले पाऊस पडल्यावर लागवड करावी. हेक्टरी १००० ते १२५० किलो बेणे (मुसळी कंद) लागते. लागवड करताना एका जुपक्यात कमीत कमी ३ मुसळ्या असाव्यात व त्याचे सरासरी वजन ८ ते १० ग्रॅम असावे. नंतर बावीस्टीन १ लीटर पाण्यात मिसळून केलेल्या द्रावनात हे बेणे बुडवून लावावे. नंतर १ लीटर मध्ये २ मि.लि. हयुमिक अॅसिड मध्ये बेणे बुडवावे. लागवड करण्यासाठी लांब गादिवाफे करावेत. गादी वाफ्याची रुंदी १०५ सेमी (३.५ फुट) असावी दोन गादीवाफ्यामध्ये ४५ से. मि. (१.५ फुट) पाट अंतरावर किवा २० x २० से. मि. अंतरावर लागवड करावी. लागवड केल्यावर रोपाच्या अवती भवति माती घट्ट दाबावी. यालाच स्टापिंग असे म्हणतात. पाऊस पडत असताना लागवड करू नये. कारण बेणे व्यवस्थित जमिनीत गाडले जात नाही. लागवड झाल्यावर लगेच हलके पाणी द्यावे.
खते : लागवडीच्या अगोदर चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी २५ ट्रालि जमिनीत मिसळावे. तसेच जमीन जर हलकी असेल तर १२५ ते २५० ट्राली गाळ प्रती हेक्टरी टाकावा. लागवडीच्या अगोदर जमिनीत धेंचा किवा ताग गाडावा. लागवडीच्या वेळेस हेक्टरी २५० ते ३०० किलो सुपर फॉस्फेट व पोट्याशियम सल्फेट किवा म्युरेट ऑफ पोटॅश १२५ किलो जमिनीत मिसळावे. लागवडीनंतर १ महिन्याने अमोनियम सल्फेट १२५ किलो द्यावे. तसेच सुक्ष्मपोषक द्रव्ये हेक्टरी २० ते २५ किलो द्यावे
पाणी : पावसाळयात पाऊस लांबणीवर त्या प्रमाणात पाणी द्यावे. जमिनीच्या मगरानुसार ८ ते १२ दिवसाने पाणी द्यावे. ऑक्टोबर ते १५ नोव्हेबर पर्यंत सर्व पाने सुकतात. नंतर परत १० ते १२ दिवसांनी पीक निघेपर्यंत हलके पाणी द्यावे झाडाची पाने सुकल्यानंतर जास्त पाणी झाल्यास सडतात. पाणी फवारा पद्धतीने चालते. परंतु फवारा पद्धतीने पाणी मुळया उघड्या पडण्याची भीती असते. मुसळीला पाणी देण्याची सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे “ठिंबक सिंचन” वाफ्यावर ठिंबकाची एक लाइन बसवल्यास काढण्याच्या अगोदर एक दोन दिवस पाणी द्यावे की जमीन ३० सेमी (खोल पर्यंत ) ओली होईल. त्यामुळे मुसळी काढण्यास मदत होते. जास्त क्षार असलेले पाणी मात्र ह्या पिकास चालत नाही.
आंतरपीक : मुसळीचे आंतरपीक वनशेती मध्ये फायदेशीर रित्या घेता येते. तसेच तुरीमध्य सुद्धा चांगल्या प्रकारे येते व हे पीक सावली मध्ये चांगले येते त्यामुळे अंतरपिक घेऊन आपला भरपूर आर्थिक लाभ होतो.
काढणी : सफेद मुसळी चे पीक साधारणत ७ ते ९ महिन्याचे पीक आहे. लागवडीची तारीख, मजुरांची उपलब्धता आणि आपली सवड ह्या सर्व गोष्टी पाहून काढणी १५ फेब्रुवरी ते १५ एप्रिल पर्यंत करावी. कुदळी किवा टिकासिने मुसळ्याचा संपूर्ण झूपका काढावा. खणतान मुसळयांना इजा होऊ नये याची काळजी घ्यावी. पीक काढल्यानंतर मुसळ्याभोवतीची माती हाताने काढून मुसळ्या स्वच्छ पाण्यात धूऊन घ्याव्या व लहान आकाराच्या मुसळ्या पुढील लावडीसाठी वापरव्यात. परिपक्व व मोठ्या आकाराच्या मुसळ्या विक्रीसाठी वापराव्यात. मोठ्या आकाराच्या निवडलेल्या सफेद मुसळ्या जुपक्यातून वेगळ्या कराव्यात. त्यांना धूवून त्यांची वरची साल चाकूने काढवी. नंतर त्या कपड्यावर किवा लाकडी ट्रेमध्ये २-३ दिवस सुकवावे. सुकवितांना पाऊस व ढग नसावे. कारण अश्या वेळी पांढर्या मुसळ्याचा रंग तांबूस होतो व त्याची प्रत खालावते. पावसाळी हवामान असल्यास काढणी काही दिवस लांबवावी.
उत्पन्न : ताज्या ओल्या सफेद मुसळ्यांचे हेक्टरी ५००० ते ६२०० किलो उत्पादन मिळते. ओल्या मुसळयांच्या २० टक्के वाळलेल्या सफेद मुसळया होतात. ह्याचाच अर्थ हेक्टरी १००० ते १२०० किलो वाळलेल्या सफेद मुसळया आपणास मिळतात. चांगल्या जातीच्या व चांगल्या गुणवत्तेच्या सफेद मुसळीचा भाव १२०० ते २००० रुपये प्रती किलो आहे. कमीत कमी १२०० रुपये प्रती किलो भाव धरल्यास आपणास हेक्टरी १२,००,००० रुपये मिळतात. आपल्या घरचे स्वतःचे बेणे असल्यास मशागतीचा खर्च हेक्टरी २,५०,००० येतो. ह्याचाच अर्थ असा होतो की, निव्वळ नफा ९,५०,००० रुपये मिळतो. इतका भरपूर नफा मिळवून देणारे एकमेव पीक आहे. त्यामुळे शेतकर्यांनी या पिकाकडे वळणे गरजेचे आहे. भारतामध्ये दिल्ली, मुंबई, देहरडून, अमृतसर ही शहरे मुख्य बाजारपेठ आहेत. याशिवाय देशातील मोठमोठ्या सर्व शहरातूनही सफेद मुसळीची विक्री केली जाते.
मागणी : सफेद मुसळीची सर्वसाधारणपणे ३५००० हजार टन देशातील विविध बाजारपेठ मध्ये मागणी आहे २४० टन अधिक आयुर्वेदिक, अॅलोपॅथिक, होमोपॅथिक, अॅंटीबायोटिक औषधीमध्ये याचा वापर केला जातो.
बाजारपेठ : जगामध्ये चीन, फ्रांस, जर्मनी, इटली, जपान, स्पेन, यू.के., अमेरिका इ. देशामध्ये तर भारतात दिल्ली, इंदोर, राजस्थान, भोपाल, केरळ, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र ही राज्ये सफेद मुसळीसाठी प्रमुख बाजारपेठ आहेत. महाराष्ट्रात प्रमुख बाजारपेठांमध्ये मुख्यत्वे मुंबई, पुणे, नागपुर (दिगोरी), अकोट या बाजारपेठा महत्वाच्या आहेत.
डॉ. अंबालिका केशव चौधरी, डॉ. पुरुषोत्तम सुधाकरराव देशमुख एम. जी. एम. नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली, औरंगाबाद