अळिंबी (मशरूम) ही एक बुरशीजन्य हरितद्रव्यरहित वनस्पती असून, निसर्गामध्ये आळंबीच्या अनेक जाती आढळतात. आळंबीच्या अनेक जातींपैकी काही निवडक जाती खाण्यायोग्य आहेत. त्यामुळे व्यापारी तत्त्वार लागवड करण्यासाठी अशा खाण्यायोग्य जातीचाच उपयोग करता येतो. शिवाय त्याची लागवड सुधारित पद्धतीने केल्यास फायद्याचे ठरते.
अळिंबीमधील औषधी गुणधर्म लक्षात घेता आता बाजारातील आळंबीची मागणी वरचेवर वाढत आहे. अळिंबीच्या अनेक जाती आहेत. त्यापैकी खाण्यायोग्य जातीची व्यापारी लागवड करणे शक्य असून, आजकाल मशरूमचा उपयोग भाजी म्हणून फारथोड्या प्रमाणात होत असला तरीही वापर व लागवड यांत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसून येते. आळंबीमध्ये लोहाचे प्रमाण चांगले असल्याने मधुमेहाची व्याधी असलेल्या रूग्णांना मशरूम हे उत्तम पर्याय आहे. तसेच कमी उष्मांक असल्याने याचा उपयोग वजन कमी करू इच्छिणार्या व्यक्ती आपल्या आहारात करू शकतात.
मशरूमच्या खाण्यायोग्य अनेक जाती आजकाल निसर्गात वाढत असल्या तरी फारच थोड्या जातींची व्यापारी तत्त्वावर लागवड केली जाते त्यापैकी काही महत्त्वाच्या जातींचा विचार करता येतो.
आळंबीच्या जाती : युरोपीयन किंवा बटन मशरूम, आइस्टर किंवा धिंगरी मशरूम व भाताच्या काडावर वाढणारी अळिंबी या आपल्याकडे येणार्या आणि खाण्यायोग्य जाती आहेत. यापैकी सर्वच प्रकारच्या मशरूमची लागवड महाराष्ट्रात करता येते. यामध्ये धिंगरी अळिंबी आणि भाताच्या काडावर येणार्या आळंबीची लागवड व्यापारी तत्त्वावर करण्यात येते आणि विशेषत: त्यांचे बीजही सहज उपलब्ध होते.
धिंगरी अळिंबी : या मशरूमची लागवड अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने करता येते. ऊन आणि पावसापासून निवार्याची जागा असली म्हणजे साध्या झोपडीतदेखील या अळिंबीची लागवड आपल्याला करता येते. शिवाय 20 ते 25 दिवसात या आळंबीच्या उत्पानाची सुरवात होते. आणि फारसा खर्च देखील नसल्याने याची लागवड सर्वसामान्य शेतकर्यांना देखील करता येते.
लागवड : या आळंबीच्या लागवडीसाठी दीड ते दोन किलो भाताचे किंवा गव्हाचे काड घ्यावे. त्याचे तीन ते पाच सें.मी. लांबीचे तुकडे करावेत. ते तुकडे कापडी पिशवी किंवा पोत्यामध्ये भरून आठ ते दहा तास थंड पाण्यात भिजवून ठेवावे. त्यानंतर त्या काडातील पाणी चांगले निथळू द्यावे. नंतर तेच काड 80 ते 90 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात 20 मिटर बुडवावे. नंतर दोन ते तीन तास पाणी निथळण्यासाठी पाण्याच्या बाहेर काढून ठेवावे. जरूरीप्रमाणेे प्लास्टिकची पिशवी घेऊन तिचा पातळ भाग लहान घड्या करून दोर्याने घट्ट बांधावा. ही पिशवी निर्जंतुक करण्यासाठी दोन टक्के फॉर्मेलीनमध्ये (जंतुनाशक) बुडवून घ्यावी. त्याचप्रमाणे आपल्याला अळिंबी ज्याखोलीत फॉर्मेलीनच्या द्रावणाने निर्जुंतुक करून घ्यावी. त्यानंतर पिशवी भरण्यासाठी शक्यतो बंदिस्त जागेचीच निवड करावी.
पिशवीच्या तळासी डाळीचे पीठ व स्पॉन (आळंबीचे बीज) मिसळलेल्या काडाचे एकावर एक असे चार इंच जाडीचे चार ते पाच थर द्यावेत. पिशवीत काड भरत असतांना ते तळहाताने हलकेसे दाबावे. स्पॉनचे प्रमाण ओल्या काडाच्या वजनाच्या दोन टक्के म्हणजे 200 ग्रॅम स्पॉन 10 किलो काडास व डाळीचे पीठ एक टक्के ठेवावे. उच्च दर्जाचे स्पॉन कोणत्याही मान्यवर संस्थेकडून घ्यावे.
पिशवी भरल्यानंतर तिचे तोंड घट्ट बांधावे. मशरूमच्या वाढीस साधारणपणे अनुकूल तापमान 20 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान व हवेतील आर्द्रता 70 ते 80 टक्के लागते. अशा वातावरणात बुरशी वाढ 12 ते 15 दिवसात पूर्ण होते. त्यानंतर त्यापिशव्या लांबीच्या बाजूने ब्लेडने सरळ रेषेत कापून अलग कराव्यात. या बेडवर त्यापुढे दिवसातून एक ते दोन वेळा जरूरीप्रमाणे दररोज स्प्रेने पाणी फवारावे. लागवडीच्या जागेत 80 टक्के आर्द्रता कायम राहील याची काळजी घ्यावी.
प्लास्टीकची पिशवी काढल्यापासून साधारणपणे तीन दिवसांत बेडच्या सर्व बाजूंनी मशरूमचे कोंब निघू लागतात. याच कोंबांची पुढे दोन ते तीन दिवसांत संपूर्ण वाढ होते व सर्व बाजूंनी बेडवर अळिंबी फळे दिसू लागतात.
संपूर्ण वाढलेली धिंगरी मशरूम शिंपल्याच्या आकाराची पिवळसर पांढर्या अथवा करड्या रंगाची असते. तिचा देठ इतर आळंबीच्या मानाने कमी लांबीचा असतो. या मशरूमच्या वरील पृष्ठभाग मऊ व सपाट असतो तर पाठीमागील भागावर दाट शिरा असतात. पूर्ण वाढलेली धिंगरी अळिंबीही तळहाताएवढी मोठी असू शकते. मशरूम काढण्यापूर्वी चार ते सहा तास बेडवर पाणी शिंपडू नये. पूर्ण वाढ झालेला मशरूम कात्रीने देठ कापून काढणी करावी.
मशरूमची निगा आणि उत्पन्न : मशरूमचे एक पीक घेण्यास जवळपास 40 ते 45 दिवस लागतात. बेड पिशवीतून बाहेर काढल्यानंतर मशरूम पीक सुमारे 30 ते 40 दिवसांत चार वेळा बहरते. पहिला तोडा बेड भरल्यानंतर 20 ते 22 दिवसानंतर मिळतो. त्यानंतर दुसरे पीक आठ ते दहा दिवसांनी व नंतरची पिके आठ ते दहा दिवसांच्या अंतराने येतात.
एका महिन्यात चार पिकांपासून मिळणार्या मशरूमचे वजन हे कोरड्या काडाच्या वजनाच्या 40 ते 80 टक्के इतके असू शकते. आपल्याला पहिल्या दोन तोड्यांपासून जवळपास 80 टक्के उत्पन्न मिळते व नंतर ते घटत जाते. काढलेली ताजी मशरूम प्लास्टिकच्या छिद्रे पाडलेल्या पिशवीत 200 ग्रॅम याप्रमाणे भरून ताबडतोब विक्रीसाठी पाठवतात. या मशरूम पासून आपल्याला वेगवेगळे पदार्थ बनविता येतात. वाळविलेल्या मशरूमला देखील महाराष्ट्रात चांगली मागणी आहे.
संदीप गंगाधर ठाकरे, संजूला भावर उद्यानविद्या विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला. (मोबा.9404578108)