पेरू guava लागवडीची प्रचलित पद्धत 20 बाय 20 फूट आहे. डॉ. गोरख सिंग यांनी एक बाय दोन मीटर अंतरावर मिडो आरचर्ड लागवड तंत्रज्ञान विकसित केले असून त्याचे रिझर्ट चांगले आहेत. केंद्राच्या ‘एनएचएम’ आणि राज्याच्या ‘रोहयो’ योजनेत प्रचलित अंतरामध्ये बदल करून शेतकर्यांना मिडी आरचर्ड लागवड तंत्रज्ञान वापरण्यासाठी प्रोत्साहित केल्यास पेरू उत्पादक आणि उत्पादनही वाढेल याच शंका नाही.
खरं म्हणजे पेरू हे भारतीय फळ नाही, 17 व्या शतकामध्ये अमेरिकेमधून पेरू भारतात आला. परंतु तेव्हापासून पेरू भारतामध्ये एवढा स्थिरावला की, ते भारतीय फळ म्हणून ओळखले जाऊ लागले. भारतामधील सर्व राज्यांमध्ये पेरू बागा आहेत. पेरू हे गरिबांचे सफरचंद म्हणून ओळखले जाते. पेरूमध्ये जास्त प्रमाणामध्ये ‘क’ जीवनसत्त्व असून, ते पचनासाठी चांगले आहे. टोमॅटोपेक्षा 10 पटीने ‘क’ जीवनसत्त्व पेरूमध्ये अधिक आहे. अन्य फळांशी तुलना करता पेरूमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह अधिक मात्रेमध्ये उपलब्ध होते.

सोपी लागवड पध्दत, जादा पोषणमूल्य आणि प्रसिध्द प्रक्रियामुक्त पदार्थामुळे जागतिक बाजारपेठेत तसेच देशांतर्गत बाजारपेठेही पेरूची मागणी वाढत आहे. त्यामुळे पेरू लागवडही वाढत असून, शेतकर्यांना हे पैसे मिळवून देणारे फळपीक ठरत आहे.
महाराष्ट्रात 33 हजार हेक्टरवर पेरूबागा आहेत. अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, जळगाव, बुलढाणा, बीड, नाशिक, सातारा या जिल्ह्यात पेरूच्या बागा जास्त आहेत. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी 1990-91 मध्ये रोजगार हमी योजनेमध्ये पेरू या फळपिकाचा समावेश केला. तेव्हापासून महाराष्ट्रात पेरू लागवड मोठ्या प्रमाणात वाढली. आता नव्याने केंद्र सरकारच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानात पेरूचा समावेश करण्यात आल्याने देशात पुन्हा पेरूची लागवड वाढत आहे.
कोणत्याही जमिनीमध्ये व कोणत्याही हवामानात पेरू येतो. सरदार (लखनौ 49), अलाहाबाद सफेदा, लखनौ 46, नाशिक, धारवाड, लाल पेरू, ललीत, सी.आय.एस. एच.जी., स्वेता, अर्का मृदूला अर्का अमूल्य, हिस्सार सुरखा ह्या पेरूच्या महत्त्वाच्या जाती आहेत. पेरू लागवडीची प्रचलित पद्धत 20 बाय 20 फूट आहे. सध्या शेतकरी 18 बाय 18 फूट, 20 बाय 10 फूट, 10 बाय 10 फूट अशा अंतरावर लागवड करतात. तसेच हायडेन्सीटी 10 बाय 5 फूट लागवड करीत आहे. डॉ. गोरख सिंग यांनी एक बाय दोन मीटर अंतरावर मिडी आरचडर्र् लागवड तंत्रज्ञान विकसित केले असून त्याचे निष्कर्ष चांगले आहेत. भारत सरकारचे कृषी खाते व महाराष्ट्र शासन यांनी राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि रोजगार हमी फळबाग योजनेत प्रचलित 20 बाय 20 फूट अंतरामध्ये बदल करून शेतकर्यांना हाय डेन्सीटी प्लॅटींग व मिडी आरचर्ड लागवड तंत्रज्ञान वापरण्यासाठी प्रोत्साहित करावे.
पेरूची रोपे लावताना प्रत्येक रोपास दोन ते तीन पाटी शेणखत द्यावे. पहिल्या वर्षी दीड पाटी शेणखत, 260 ग्रॅम युरिया, 375 ग्रॅम सुपर फॉस्फेट व 50 ग्रॅम पोटॅशियम सल्फेट द्यावे. दुसर्या वर्षी तीन पाटी शेणखत, 500 ग्रॅम युरिया, 750 ग्रॅम सुपर फॉस्फेट व 200 ग्रॅम पोटॅशियम सल्फेट द्यावे. तिसर्या वर्षी चार ते पाच पाटी शेणखत, 750 ग्रॅम युरिया, 1125 ग्रॅम सुपर फॉस्फेट व 300 ग्रॅम पोटॅशियम सल्फेट द्यावे. चौथ्या वर्षी सहा पाटी शेणखत, 1050 ग्रॅम युरिया, 1500 ग्रॅम सुपर फॉस्फेट व 400 ग्रॅम पोटॅशियम सल्फेट द्यावे. तर पाचव्या वर्षी साडेसात पाटी शेणखत, 1300 ग्रॅम युरिया, 1875 ग्रॅम सुपर फॉस्फेट व 500 ग्रॅम पोटॅशियम सल्फेट द्यावे. अशा प्रमाणे खत दोन भागामध्ये विभागून द्यावे. खताचा एक भाग जून महिन्यात तर दुसरा भाग ऑक्टोबर महिन्यात द्यावा. खत टाकताना खोडापासून अंतरावर टाकावीत आणि दर दहा दिवसांनी पाणी द्यावे.
पेरूची रोपे लावल्यानंतर दोन वर्षांनी फळे मिळण्यास सुरूवात होते. पेरू बागेची चांगली निगा राखली तर 30 ते 40 वर्षापर्यंत चांगले उत्पन्न मिळते. पाच वर्षानंतर पेरूच्या झाडास 400 ते 600 फळे मिळतात. चांगल्या वाढलेल्या बागेमध्ये एका एकरामध्ये 15 ते 25 टन उत्पन्न मिळते. सध्या पेरूला प्रत्येक किलोस 3 ते 8 रुपये भाव मिळतो. हिवाळ्यामध्ये पेरू दिल्लीला पाठविल्यास 30 रु. किलो भाव मिळू शकतो. थायलंड येथील पेरू दिल्लीला दोनशे रुपये किलो प्रमाणे विकतो. पेरूपासून ज्यूस, पल्प, जॅम, जेली, टॉफी, सरबत, स्लायडर (वाईन), बेबी फुड, स्लायसेस, कॅनिंग करता येतो. पेरूवर प्रक्रिया झालेल्या मालाला जागतिक बाजारामध्ये चांगली किमत मिळते. प्रक्रियायुक्त मालाला चांगली मागणी आहे.
अॅड. विनायक बाबुराव दंडवते, (अध्यक्ष, भारतीय पेरू उत्पादक संघ) (मो. 9422226741)













Users Today : 12
Users Last 30 days : 765
Users This Month : 90
Users This Year : 802
Total Users : 236251