उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचा दोन वर्षांपूर्वीचा रखडलेला पीक विमा द्यावा व ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी उस्मानाबादचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु केलेल्या आमरण उपोषणाचा आज शनिवारी सहावा दिवस आहे. मात्र अद्याप कोणता तोडगा निघाला नसल्यामुळे आता शेतकरी आणि शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. या आंदोलनास शेतकऱ्यांसह विविध राजकीय पक्ष संघटना यांचा मोठा पाठिंबा मिळत असून, काही शिवसैनिकांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन केले. तर, दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी पाण्यात उतरुन पीक विमा नुकसान भरपाईची मागणी केली.
ब्रेकिंग : ऊस दर संघर्ष समितीच्या आंदोलनाला पंढरपुरात हिंसक वळण
जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नाहीत, तोपर्यंत आपण माघार घेणार नाही, असा पवित्रा आमदार कैलास पाटील यांनी घेतला आहे. आमदार पाटील यांनी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले. दररोज त्यांना पाठिंबा वाढत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला त्यांची प्रकृती खालावत चालल्याने सरकारने आता शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये, असा इशारा देखील दिला आहे. त्यामुळे सुरु असलेल्या उपोषणाला कोणत्याही क्षणी हिंसक वळण लागण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

जिल्ह्यात सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शिवाय सततच्या पावसाने उरल्या सुरल्या पिकांनाही विविध रोगाने ग्रासले आहे. या परिस्थितीत शेतकरी अडचणीत आला असून, दोन वर्षापूर्वी शेतकऱ्यांच्या हक्काचा पीकविमा आणि नुकसान भरपाई त्वरित द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 2020 मधील पीकविम्याची 531 कोटी रुपये जिल्ह्यातील तीन लाख 57 हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तीन आठवड्यात जमा करण्याचे बंधन होते, असे असतानाही अद्यापपर्यंत पीकविमा जमा झाला नाही. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश धुडकावत फक्त न्यायालयात जमा केलेल्या 200 कोटीवर प्रशासन बोळवण करत असल्याचे दिसून येत आहे, हा पीक विमा जमा होत नाही, तोपर्यंत माघार नाही, असा पवित्रा आमदार पाटील यांनी घेतला आहे.
मोठी बातमी : गरज पडल्यास शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडे मदत मागू : कृषीमंत्री सत्तार
आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. आमदार पाटील यांची तब्बेत खालावली असून, त्यांना पाठिंबा म्हणून पाडोळी या गावातील जवळपास 25 शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन सुरु केले आहे. शेतकऱ्यांनी तलावात उड्या घेतल्या आहेत. दिवसेंदिवस हे आंदोलन अधिक आक्रमक होताना दिसत आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी उस्मानाबाद येथील शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसैनिकानी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून घोषणाबाजी केली. जो पर्यंत शासन निर्णय घेत नाही तो पर्यंत इमारतीच्या खाली उतरणार नाही असा आक्रमक पवित्रा शिवसैनिकांनी घेतला होता.

दरम्यान, जोपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी धुळे सोलापूर हायवे वर रास्ता रोको आंदोलन केले. तसेच औरंगाबाद-सोलापूर महामार्ग देखील रोखला आहे. टायर जाळून यावेळी निषेध करण्यात आला.
मोठी बातमी : किसान सभेचा ‘ओला दुष्काळ’ प्रश्नी आता निर्णायक संघर्ष
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून जिल्हा प्रशासनाला पीक विमा कंपनीला नोटीस पाठवण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनेनुसार जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी कार्यवाही केली आहे.
खरीप 2020 साठी पीक विमा कंपनी यांना वारंवार सूचना देऊनही कंपनीने 574 कोटी रुपये निधी जमा केलेला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यासाठी पत्र देण्यात आले आहे. खरीप 2021 साठी 374 कोटी रुपये कंपनीला वारंवार सूचना देऊन देखील जमा केलेले नाहीत. त्यासंदर्भात देखील सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार येत्या काही दिवसात जिल्हा प्रशासनाकडे 200 कोटी रुपयाचा निधी जमा होण्याची शक्यता आहे. तो निधी पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या क्षेत्राच्या समप्रमाणात तत्काळ वाटप करण्याची कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांना सूचित केले आहे.

पीकविमा, शेतकरी अनुदान आणि ओल्या दुष्काळाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाचे लोण आता गावोगावी पसरत चालले आहे. कैलास पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उस्मानाबाद शहर शिवसेना शाखेकडून शहर बंदची हाक देण्यात आली आहे. तर, जिल्हाधिकारी यांनी 29 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर पर्यंत जिल्हात जमावबंदी व शस्त्रबंदीचे आदेश दिले आहेत.
महत्त्वाची बातमी : गुलाबी बोंडअळीचा ‘नंदुरबार पॅटर्न’ फायद्याचा ठरणार

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1