कोरडवाहू फळशेतीत वरदान ठरणार्‍या बोराची कशी करावी व्यापारी लागवड

0
1307

सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, पुणे, सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागात बोर हे फळपीक प्रामुख्याने घेतले जाते. अत्यंत दुष्काळी भागात कोरडवाहू फळशेतीत बोर हे वरदान ठरले आहे. बोर हे कमी खर्चात, कमी मेहनतीचे फळझाड असून, अतिशय महत्त्वाचे कोरडवाहू फळझाड म्हणून बोर लागवडीखालील क्षेत्र दिवसें-दिवस वाढत आहे.

कोरडवाहू क्षेत्रातील अत्यंत हलक्या, मुरमाड, डोंगरउताराच्या जमिनीत उत्पादन देणारे पीक म्हणजे बोर आहे. कारण बोरीचे झाड कणखर, काटक, चिवट व दुष्काळी परिस्थितीत देखील चांगल्या तर्‍हेने मात करून जगते. बोराच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात 50-150 मि. ग्रॅम जीवनसत्त्व ‘क’ असते. बोरीचे फळात भरपूर प्रथिने, कर्बोदके आणि खनिजद्रव्ययुक्त असल्याने आहारदृष्ट्या ते अत्यंत पौष्टिक फळ आहे. बोरापासून जॅम, कॅन्डी, सुकविलेली बोरे, सरबत, पावडर, बिस्किट इत्यादी प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात. बोरांच्या काटेरी फांद्यांची कुंपणासाठी तर लाकडांचा बांधकामासाठी उपयोग होतो. बोरीचे साल आणि पानातील टॅनीनचा कातडी बनविण्याच्या उद्योगात उपयोग केला जातो. बोराचे फळ खाल्याने रक्तशुद्धी होते. तसेच पचनक्रियेला मदत होते. बोरीचे पीक सर्वदूर घेण्यात येत असले तरी महाराष्ट्रात शास्त्रोक्त लागवडीखाली उभे असलेल्या बोरीच्या बागा काही निवडक ठिकाणीच पाहावयास मिळतात.

सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, पुणे, सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागात बोर हे फळपीक प्रामुख्याने घेतले जाते. अत्यंत दुष्काळी भागात कोरडवाहू फळशेतीत बोर हे वरदान ठरले आहे. बोर हे कमी खर्चात, कमी मेहनतीचे फळझाड असून महाराष्ट्रात नऊ हजार 636 हेक्टर क्षेत्रावर बोराची लागवड झाली आहे. अतिशय महत्त्वाचे कोरडवाहू फळझाड म्हणून बोर लागवडीखालील क्षेत्र दिवसें-दिवस वाढत आहे.

ber/shetimitra.co.in

हवामान व जमीन : बोरीचे झाड फार काटक असून हवामान व जमिनीविषयी विशेष चोखंदळ नाही. उष्ण व कोरड्या हवामानात बोरीची वाढ चांगली होते. हवेमध्ये जास्त आर्द्रता असल्यास बोरीची वाढ, फळधारणा बरोबर होत नाही. हलक्या, मुरमाड, डोंगर उताराच्या जमिनीवर तसेच वाळुमय, रेताड किंवा क्षारयुक्त जमिनीत तसेच दलदलीच्या जमिनीतही बोर लागवड करता येते. अति आर्द्रतेच्या परिस्थितीत रोग व किडींचा प्रामुख्याने भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. अति उष्ण हवामानात झाडांची फळगळ होते व झाड सुप्तावस्थेत जाते. फळे तयार होण्याच्या सुमारास उष्ण व कोरडी हवा असल्यास फळे चांगली येतात. बोरीच्या झाडाला भरपूर सोटमुळे असल्याने जमिनीत त्यांची वाढ खोलपर्यंत होते. म्हणून कोणत्याही प्रकारच्या जमिनीत बोरीचे झाड चांगले वाढू शकते.

सुधारित जाती : गोला, सफेदा, सेब, कैथाली, सन्नुर नं. 5, छुहारा, कडाका, उमराण, मेहरुन या बोराच्या विविध जाती आहेत. मात्र महाराष्ट्रात उमराण, कडाका, छुहारा, व इलायची या सुधारित जाती उत्तम ठरल्या आहेत. उमराण जातीची फळे मोठी, गोल विटकरी रंगाची असतात. 15 वर्षानंतर प्रत्येक झाडापासून सुमारे 250 किलोपर्यंत उत्पन्न मिळते. शिवाय ही फळे साठवणुकीस चांगली टिकतात. त्यामुळे लांबच्या बाजारपेठेसाठी ही उपयुक्त आहेत. कडाका जातीची फळे मोठी, फुगीर, शंकुच्या आकारासारखी असतात. प्रतिफळाचे वजन 18 ते 20 ग्रॅम भरते. गरात साखरेचे प्रमाण 13 टक्के असते. प्रतिझाडापासून साधारणपणे 100 किलो उत्पन्न मिळते. छुहारा जातीची फळे अत्यंत मधूर आणि उमराण जातीपेक्षा चविष्ट असतात. आकाराने मोठी विटकरी रंगाची असतात. फळाचे वजन 15 ते 20 ग्रॅम भरते. प्रतिझाडापासून 75 ते 80 किलो उत्पन्न मिळते. इलायची फळे कडाकापेक्षा लहान असतात टोकाकडे विटकरी रंगाची असतात. मेहरुन जातीची फळे गोड व लांब वर्तुळाकार आकाराची असतात. फळे पिवळसर तांबूस रंगाची असतात. यामध्ये साखरेचे प्रमाण 15 टक्के असते. याचे उत्पादनही चांगले होते.

पूर्व मशागत : जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाच बाय पाच व सात बाय सात मीटर अंतरावर याची लागवड करावी. त्यासाठी या अंतरावर 60 सें. मी. लांबी, रुंदी व खोलीचे खड्डे घ्यावेत. खड्डे उन्हाळ्यात तयार करून हे खड्डे पालापाचोळा, एक किलो सिंगल फॉस्फेट, शेणखत आणि चांगल्या मातीने भरून घ्यावेत. त्यामध्ये थोड्या प्रमाणात थायमेट टाकावे.

लागवड : बोरीची लागवड बी लावून किंवा रोपावर डोळे भरून करतात. बियाद्वारे लागवड केल्यास फळांची प्रत व उत्पादन याचा भरवसा देता येत नाही. म्हणून रोपांवर सुधारित जातीचे डोळे भरून लागवड करावी. रोपांपासून लागवड केल्यास दुसर्‍या वर्षी रोपे छाटून नवीन येणार्‍या फुटीवर डोळे भरून कलमीकरण करावे.

खत : पहिल्या वर्षी प्रति झाड 10 किलो शेणखत, 100 ग्रॅम नत्र, 100 ग्रॅम स्फूरद व 100 ग्रॅम पालाश द्यावे. पुढील पाच वर्षापर्यंत हे प्रमाण प्रतिवर्षी 10 किलो शेणखत आणि 100 ग्रॅम नत्राची अधिक मात्रा वाढवून द्यावे दुसर्‍या व तिसर्‍या वर्षी 150 ग्रॅम स्फूरद व पालाश तर चौथ्या, पाचव्या व त्यापुढील प्रति झाड 200 ग्रॅम स्फूरद व पालाश याप्रमाणे द्यावे. शेणखत देताना पावसाच्या अगोदार द्यावे.

छाटणी : बोरीचे कलम झाडांचे डोळे फुटून आल्यावर नवीन फुटीवर 60 सें. मी. पर्यंत येणार्‍या फांद्या 15 ते 20 सें. मी. अंतरावर वाढू द्याव्यात अशा प्रकारे झाडाचा मजबूत सांगाडा तयार करावा. बोरीचे बहार नवीन फुटीवर येत असल्याने प्रतिवर्षी झाडाची छाटणी करणे आवश्यक असते. एप्रिल-मे महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात झाडावरील वाळलेल्या फांद्या, रोगट, कीडग्रस्त आणि अनावश्यक जुन्या फांद्या काढून टाकाव्यात. छाटणीनंतर नत्र, स्फूरदचा डोस द्यावा. जुलै मध्ये नत्र, स्फूरद व पालाशचा संपूर्ण डोस द्यावा. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये स्फुरद, पालाश व पोटॉश द्यावे. भुरी आणि किडीपासून संरक्षण करण्यासाठी कॉन्टॉफ (टाटा) आणि किडीसाठी नुवॉन या औषधाची फवारणी करावी.

फूलगळ व फळगळ : बोरीत जून-जुलै महिन्यात फुलधारणा होऊन नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात फळे तयार होतात. या फळात परागीकरण मधमाशांकडून घडून येते. तेव्हा फुलोर्‍याच्या वेळेस कीटकनाशकाची फवारणी करू नये. बोरीच्या झाडावर जिब्रेलीक अ‍ॅसिड 20 पीपीएम किंवा एनएए 40 पीपीएम द्रावण फवारल्यास उत्पादनात वाढ होते.

काढणी आणि उत्पादन : फुलधारणेपासून साधारण 120 ते 125 दिवसात फळे पक्व होतात तर ओलिताखालील उशिरा तोडणीस तयार होतात. पूर्ण वाढ झालेल्या फळांचा रंग बदलण्याच्या स्थितीत असताना चार ते पाच वेळा तोडणी करावी, 10 व्या वर्षाच्या झाडापासून 80 ते 100 किलोपर्यंत उत्पादन मिळते.

सूर्यकांत वि. आगलावे, मंडल कृषी अधिकारी, बार्शी (मो. 9422645618)

Click to rate this post!
[Total: 1 Average: 3]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here