पाळीव पशुपक्षांना रोग झाल्यावर शेतकऱ्यांना होणारा मन:स्ताप आणि औषधोपचारांवर होणारा खर्च तसेच खर्च दृश्य व अदृश्य स्वरूपात होणारे आर्थिक नुकसान यांचा सारासार विचार करता जर रोगराईच नष्ट झाली तर ! हा विचार मनात आला तरी शेतकरी सुखावून जाईल. खरंच जर काही प्रमाणात घातक रोगराई नष्ट करता आली तर ! परंतु हा विचार फक्त विचार न राहता चळवळीच्या स्वरूपात त्याला कृतीत उतरविणे देखील शक्य आहे. परंतु त्यासाठी आवश्यकता आहे ती सर्व शेतकऱ्यांची, शास्त्रज्ञांच्या तसेच पशुवैद्यकांच्या एकत्रित सांघिक प्रयत्नांची.
महत्त्वाच्या टिप्स : जनावरांमधील घातक लम्पी स्कीन रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजना
अशाच स्वरूपाची यशस्वी प्रयत्नांनी देवीचा रोग, बुळकांड्या आजार निर्मूलन करून शेतकऱ्यांनी आपली इच्छाशक्ती दाखवून दिली आहे. हाच परिपाठ आपण इतर दुर्धर आजार निर्मूलन करण्यासाठी का गिरवू नये ? जर आजारच झाला नाही किंवा आजाराचेच समूळ उच्चाटन झाले तर ते शेतकऱ्यांना वरदानच ठरणार आहे आणि पशुपक्षांना होणारे तसेच त्यांच्यापासून मानवाला होणार्या बहुसंख्य आजारांना देखील तिलांजली मिळणार आहे आणि ही चळवळ यशस्वी होऊ शकते ती व्यवस्थापनातील काही आवश्यक बाबींचा अवलंब केल्याने.
पशुपक्षांना होणाऱ्या आजारांमध्ये सर्वात जास्त प्रमाण संसर्गजन्य आजाराचे आहे. हे आजार प्रामुख्याने जीवाणू, विषाणू, बुरशी, कृमी, जंत इत्यादीमुळे होत असतात आणि अशा आजारांवर बर्याच प्रमाणात रामबाण औषधे जरी उपलब्ध असली तरी औषधोपचार मात्र फार महागडा असतो. बर्याच आजांरावर उदा. विषाणूजन्य आजार जसे लाळ्या खुरकुत, बुळकांडी, मानमोडी इत्यादीवर तर कोणताही उपचार उपलब्ध नाहीत किंवा जीवाणूजन्य आजार जसे ब्रुसेल्लेसीस, फऱ्या, अॅन्थ्रॅक्स, यांच्यावर देखील उपाययोजना फारशी यशस्वी होत नाही म्हणूनच हे आजारच न झालेले बरे.
परिणामकारकपणे या जीवजंतुंचे उच्चाटन करावयाचे असते तर लसीकरण हाच एकमेव उपाय असून तो सांघिकपणे अवलंबिला तर बरेच घातक रोग नष्ट होऊ शकतात. अशाच प्रकारच्या विविध आजारांमुळे भारतीय दुग्धजन्य तसेच इतर प्राणीजन्य पदार्थांना परकीय बाजारपेठ उपलब्ध होत नाही. जर हे आजार नष्ट करता आले तर शेतकऱ्यांच्या मालाला परकीय बाजारपेठेचे दालन उपलब्ध होणार आहे.
महत्त्वाची गोष्ट : पावसाळ्यात जनावरांची अशी घ्या काळजी
लसीकरण म्हणजे काय ? : आपल्याला माहितीच आहे की, काही आजार जर आपल्याला एकदा झाला. उदा. देवीचा रोग तर तोच आजार आपल्याला आयुष्यात परत होत नाही. म्हणजेच एकदा शरीरात जंतु संसर्ग झाला तर त्याच्या विरोधात शरीरामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि परत तो जंतु आपल्या शरीराला इजा पोहचवत नाही. म्हणजेच जर संसर्गजन्य आजाराचे जंतु शरीरात गेले तर शरीर जंतुंविरूध्द रोगप्रतिकारक फळी कमी करते. जर हेच आजाराचे जंतु शरीरामध्ये कृत्रिमरित्या शिरकाव केल्यावर तर ते आजार निर्माण करतात परंतु त्यांची आजार निर्माण करण्याची क्षमताच बोथट केली तर मात्र ते शरीराला इजा करत नाहीत, पण शरीर मात्र त्या आजाराविरोधात प्रतिकारकशक्ती निर्माण करते.
अशा प्रकारे शास्त्रशुध्द पध्दतीने जैवरासायनिक प्रक्रिया करून अशा जंतूपासून काही द्रव्ये बनविली जातात जी शरीरात टोचल्यास शरीराला इजा होत नाही, उलट त्या रोगासाठी शरीरात प्रतिकार शक्ती निर्माण होते. अशा प्रकारे डोस म्हणजेच लस हा डोस शास्त्रशुध्द पध्दतीने तंज्ज्ञामार्फत देणे म्हणजेच लसीकरण करणे. अशा प्रकारच्या लसी बनविण्याच्या विविध शास्त्रीय पध्दती आहेत. हे लसीमध्ये ठराविक प्रमाणात त्याच्या रोगाचे जीवजंतू किंवा त्यांची प्रथिने असतात. हे जीवजंतू जिवंत अथवा मृत अथवा सुप्त अवस्थेत असतात व त्यांची रोग निर्माण करण्याची क्षमता बोथट करून प्रतिकार शक्ती जागृत करण्याची क्षमता मात्र जशीच्या तशी राबविण्यात आलेली असते. जिवंत लसीची मात्रा कमी लागते व तिची परिणामकारकता अधिक असते. मात्र ही लस अत्यंत थंड वातावरणात ठेवावी लागते (चार अंश सेल्सिअस) व ती त्वरित त्वचेखाली किंवा मांसात टोचता येते उदा. मानमोडी (लासोटा), आय.बी.डी. (गम्बोरो), अॅन्थ्रॅक्स, बु्रसेला, देवी वगैरे. परंतु जिवंत लस आजारी किंवा गर्भपणातील शेवटच्या कालखंडात देणे काही अंशी घातक ठरू शकते, मात्र मृत लस त्यामानाने फारच कमी घातक असते. परंतु तिची मात्रा अधिक द्यावी लागते व ती कोणत्याही विशिष्ट मार्गाने देता येते आणि हाताळण्यास सोपी असते.
लस टोचण्याची पध्दत : लसीमध्ये काही रासायनिक पदार्थ द्रव्य स्वरूपात असतात. लस रक्तामध्ये लवकर मिसळू नये हा त्या मागचा उद्देश असतो. त्यामुळे जीवाणू, विषाणू शरीरात अधिक काळ राहतात व मलमूत्राद्वारे लवकर बाहेर टाकले जात नाहीत तसेच लसीकरणाचा मार्ग देखील असतो की जेणेकरून दिलेला डोस त्या जागी जास्त काळ व रक्तात लवकर मिसळू नये, यामुळे शरीराला या रोगजंतूची ओळख पटून त्याच्याविरूध्द प्रतिकारशक्ती जागृत करण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध होतो. याच कारणामुळे लस देण्याच्या ठिकाणी /जागी महत्त्वाची असते. बहुतांशी आजारात ही जागा/मार्ग त्वचेमध्ये किंवा त्वचेखाली (सबक्युटेनियस) असतो. काही आजारात मात्र पक्षांना नाकावाटे किंवा डोळ्यावाटे, तोंडावाटे डोस दिला जातो. याचबरोबर डोसाची मात्रा देखील अत्यंत महत्त्वाची असते व निर्दिष्ट मात्रेतच लसीकरण योग्य पध्दतीने करणे महत्त्वाचे असते. बुस्टर डोस (दुसरी मात्रा ) बर्याच आजारात लसीकरण फक्त एकदाच करून भागत नाही व साधारण 15 ते 21 दिवसांनी तीच लस परत देणे फायद्याचे असते. प्रामुख्याने मृतलसीचे एक महिन्यात दोनदा लसीकरण करायला हवे म्हणजे शरीरात पुरेशी प्रतिकारकशक्ती जागृत होते. यालाच ‘बुस्टर डोस’ असे म्हणतात. त्यानंतर मात्र काही आजारांमध्ये प्रत्येक वर्षी/ दुसरी मात्रा देणे हितकारक असते जेणेकरून प्रतिकारशक्ती कायम जागृत अवस्थेत राहते.
डॉ. डी. पी. कदम, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परेल, मुंबई-12.