राज्यातील बदलत्या हवामानाचा रब्बी हंगामातील शेती पिकांवर मोठा विपरीत परिणाम होत असून, बहुतांश भागातील रब्बी पिके धोक्यात आली आहेत. गेल्या काही दिवसात राज्यात सातत्याने तापमानात चढ उतार होत असून, कुठे थंडीचा कडाका तर कुठे ढगाळ वातावरण जाणवत आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरण पारच बिघडून गेले आहे. या हवामानातील बदलामुळे कापूस, तूर, हरभरा तसेच भाजीपाला व फळबाग पिकांचे 20 ते 25 टक्के नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मोठी बातमी : सावधान ! थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव होणार ?
सध्या उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. काही ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहचला आहे. तर काही ठिकाणी दाट धुके पडले आहे. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र देखील चांगलाच गारठला असून, तापमानाचा पारा घसरला आहे. विदर्भात काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काह ठिकाणी थंडीचा जोर कायम आहे. अशा बदलत्या वातावरणामुळे पिकांवर विपरीत परिणाम होत असून, रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. परिणामी पिकाच्या उत्पादनात घट येणार आहे. याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याने राज्यातील शेतकर्यांची शेतकऱ्यांची चिंता वरचेवर वाढत आहे.

सध्याच्या बदलत्या वातावरणामुळं पिकांवर किडींसोबतच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. किडींचा प्रादुर्भाव आणि धुक्यामुळे तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या तर हरभऱ्यावर घाटेअळीचा तसेच गव्हावर तांबेरा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. काही भागात तूर आणि हरभऱ्याचा फुलोरा गळत आहे. गव्हाची पाने पिवळी पडत आहेत. मोसंबीचा अंबिया बहार गळत आहे. तसेच आंब्याच्या बहारावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच आंब्याच्या झाडांना लागलेला मोहर या ढगाळ वातावरणामुळे कमी होत आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ब्रेकिंग : वीज तोडल्याने शेतकऱ्याने विष घेत केला लाईव्ह व्हिडीओ
दरम्यान, अचानक बदललेल्या वातावरणामुळे नाशिक, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष बागांना मोठा धोका निर्माण झाला आहे. आधीच यंदा पाऊस लांबल्याने द्राक्षाच्या ऑक्टोंबर छाटण्या उशीराने झाल्या आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी द्राक्ष बागा या वातारणात रोगांच्या तडाक्यात सापडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. डाऊनी आणि भुरी रोगाचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाल्याने द्राक्ष बागायतदारांचे धाबे दणाणले आहेत.

यंदा कोकणात उशिराने थंडी सुरु झाली. त्यामुळे कोकणातील आंबा आणि काजू बागायतदार चिंतेत आहेत. दरम्यान, सध्याची थंडी किंवा वातावरण पाहता यंदा हापूसचा मोसम उशिरा असणार आहे. कारण वातावरणात झालेल्या बदलामुळे आणि लांबलेल्या थंडीमुळे मोहोर प्रक्रिया पुन्हा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. आंब्याचा हंगाम लांबल्यास मिळणाऱ्या दराबाबत देखील शेतकरी चिंतेत आहेत.
हे नक्की वाचा : शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी सरकारचे काम सुरु : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1