शेतीमध्ये रासायनिक खते आणि औषधांच्या अति वापरामुळे शेती नष्ट होत चालली आहे. रासायनिक औषधांच्या अतिरिक्त वापरामुळे रानभाज्या नष्ट झाल्या. याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात मातीदेखील नष्ट होईल, असा इशारा बीज मात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी येथे दिला.
खूशखबर : आता रोबो करणार पिकाची आरोग्य तपासणी : म्हसवड तालुक्यात प्रात्येक्षीक
नागपूर येथे इंडियन सायन्स काँग्रेसनिमित्त फार्मर सायन्स कॉग्रेसचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राहीबाई बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ. विजयालक्ष्मी सक्सेना होत्या.
शेतीमध्ये भरमसाठ वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांमुळे शेती विषयुक्त होत असल्याचे सांगून राहिबाई म्हणाल्या, आज आपल्या शेतातील काळ्या मातीला वाचवण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी प्रत्येकाने विषमुक्त शेती पिकविण्याची गरज आहे. त्यामुळे आता विषमुक्त शेती पिकवा आणि माती वाचवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
हे नक्की वाचा : गुरुकुंज मोझरी येथे दहावे अखिल भारतीय शेतकरी मराठी साहित्य संमेलन
सुरुवातीच्या काळात माझ्या कामावर टीका व्हायची असे सांगून त्या म्हणाल्या, सुरूवातीला मी बोलायला उभी राहिले की लोक हसायचे. मात्र आज 3,500 महिलांना सोबत घेऊन मी 200 गावांमध्ये काम सुरू केले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे या माझ्या गावात आम्ही गावराण बियाणे बँक सुरू केली आहे. या बँकेत आदिवासी परंपरेने जपलेल्या 53 पिकांचे 114 गावराण वाण आहेत. यामुळे परिसरातील चार तालुक्यात 50 टक्के शेतकरी गावराण बियाणे वापरतात. आपण जे खातो त्यानेच आपले शरीर तयार होते आणि मनही तसेच होते. आपण पैसे देवून विष खरेदी करतो आणि खातो. यामुळे आरोग्याच्या समस्या निर्मिण होतात. आजकालच्या भाज्या आणि पीके हे रासायनिक खतावर येतात. पण देशी बियाणे मात्र नुसत्या हवेवर आणि पाण्यावर येऊ शकते. यासाठी देशी बियाण्यांचा वापर व त्यापासून मिळणारे उत्पादन वाढले पाहिजे. प्रत्येकाच्या शेतात देशी बियाणे वापरले गेले पाहिजे. गावात विषमुक्त भाजीपाला विकला गेला पाहिजे, तरच पुढची युवापिढी सशक्त होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला भारतीय कृषी अनुसंधान संस्थेच्या कोलकाता येथील केंद्रीय मत्स्य संशोधन संस्थेचे संचालक डॉ. बसंत कुमार दास, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी, पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशिष पातुरकर, डॉ. स. रामकृष्णन, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश कडू, संयोजक डॉ. प्रकाश ईटनकर उपस्थित होते. यावेळी इंडियन सायन्स काँग्रेसच्या वतीने डॉ. विजयालक्ष्मी सक्सेना यांच्या हस्ते राहिबाई पोपेरे यांचा सत्कार करण्यात आला.
टिप्स : डाळिंबावरील तेल्या रोगाचे व्यवस्थापन
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1