छाटणीद्वारे करा जुन्या आंबा बागांचे पुनरुज्जीवन

1
690

आंबा बागा फार जुन्या झाल्यानंतर त्याची उत्पादकता घटते. त्याचप्रमाणे फळांचा आकारदेखील लहान होतो. अशा परिस्थितीत त्याच बागांचे उत्पन्न वाढविण्यासाठी छाटणी तंत्राचा योग्य प्रकारे वापर करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी प्रादेशिकफळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले येथे संशोधन करण्यात आले. विशेषतः कोकण विभागामध्ये, तसेच महाराष्ट्रात इतरही ठिकाणी अशा जुन्या बागा मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांची उत्पादकता उत्तरोत्तर कमी होत जाते. तसेच फळांचाआकारही कमी होतो. त्यामुळे बागेपासून मिळणारे उत्पन्न कमी होत जाते. उत्पादकता कमी होण्यामागील कारणांचा अभ्यास वेंगुर्ले येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रामध्ये करण्यात आला.

जुन्या आंबा बागांची उत्पादकता का घटते ? : जुन्या बागामध्ये आंबा झाडांचा घेर मोठा झाल्याने सूर्यप्रकाश आतपर्यंत व्यवस्थित पोचत नाही. परिणामी नवीन पालवी फारच कमी येते. या जुन्या आंबा बागेमध्ये कीडनाशके व संजीवके यांची फवारणी करणेही कठीण जाते. परिणामी रोग व किडीचे नियंत्रण योग्य प्रकारे न झाल्याने मोहोर, तसेच फळ गळतात. या बागांमधील झाडे फार उंच वाढलेली असल्याने फळे काढणे व तत्सम कामे करणे जिकिरीचे होते. जुन्या आंबा झाडांवर बांडगुळे मोठ्या प्रमाणावर वाढतात. फांद्यांना अन्नपुरवठा न झाल्याने फांद्या सुकतात.

छाटणी का करावी ? : सर्वसाधारणपणे 35 ते 40 वर्षांनंतर आंबा झाडे अतिउंच व घन झालेली असतात. त्यांच्या फांद्यांची छाटणी केल्याने झाडाला चांगला आकार येऊ शकतो. तसेच सर्व झाडांना सूर्यप्रकाश मिळतो. नवीन जोमदार पालवी येते. छाटणी करून आपण एकमेकांत घुसलेल्या, एकमेकांवर घासणाऱ्या फांद्या काढल्या जातात. तसेच बांडगुळे काढली जातात. छाटणी केल्याने झाडांवर फवारणीची कामे व आंबा काढणी व्यवस्थितपणे करता येते. झाडाचे रोगापासून संरक्षण होते.

छाटणी करण्याची पद्धत : साधारणपणे 6 ते 7 मीटर झाडांची उंची ठेवून आंबा झाडांच्या वरील भागाची छाटणी करावी. छाटणी कमी उंचीवर केल्यास झाडांवरील फांद्या फारच कमी राहतात. परिणामी उत्पादनात घट येते. छाटणी जास्त उंचीवर केल्यास अनुत्पादित फांद्या या झाडांवर राहतात. पुढील छाटणी लवकर करावी लागते. फांद्या तोडताना झाडांना छत्रीसारखा (डोम) आकार द्यावा. फांद्या तोडताना झाडांची साल निघणार नाही, फांदी पिचणार नाही, याची काळजी घ्यावी. यासाठी छाटणी धारदार हत्याराने करावी.

आंबा बागांच्या छाटणी करण्याचा कालावधी : झाडांची छाटणी दोन हंगामामध्ये करता येते. छाटणी फेब्रुवारी-मार्च महिन्यात करावी. म्हणजे नवीन आलेली पालवी पावसात सापडत नाही. किंवा छाटणी सप्टेंबर-ऑक्‍टोबर महिन्यात केल्यास त्यानंतर पडणाऱ्या थंडीचा कोणताही वाईट परिणाम नवीन पालवीवर झाडांना होत नाही. छाटणी केल्यानंतर पालवी लवकर व भरपूर येण्यासाठी शक्‍य झाल्यास झाडांना युरिया खताची मात्रा, तसेच पाणी द्यावे. यामुळे जोमदार पालवी येते.

छाटणी केलेल्या बागांचे व्यवस्थापन : छाटणी केलेल्या फांद्यांना बुरशीजन्य रोगांचा त्रास होऊ नये यासाठी बोर्डोपेस्ट लावावी. तसेच आंबा झाडावर येणाऱ्या खोडकिडीच्या बंदोबस्तासाठी कार्बारील 40 ग्रॅम प्रति 10 लिटर याप्रमाणे झाडाच्या फांद्या भिजवाव्यात. गरजेनुसार पुढील फवारणी दर 10 ते 15 दिवसांच्या अंतराने तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावी. नवीन पालवी फुटू लागल्यानंतर अशा पालवीवर पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव होतो. तेव्हा या पालवीचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी पालवी जून होईपर्यंत दर 15 दिवसांच्या अंतराने शिफारशीत कीटकनाशकांच्या फवारण्या द्याव्या. त्यानंतर दोन ते तीन महिन्यांनी नवीन पालवीतील जोमदार धांद्या (पालवी) ठेवून (साधारणपणे 50 टक्के) इतर पालवीची विरळणी करावी. पालवी दीड वर्षांची झाल्यावर झाडाच्या आकारमानानुसार (3 मि.लि. प्रतिमीटर व्यास विस्ताराप्रमाणे) पॅक्‍लोब्युट्राझोल द्यावे. म्हणजे मोहोर येण्यास सुरवात होते. छाटणी केलेल्या झाडांना पॅक्‍लोब्युट्राझोल न दिल्यास पहिली 3 ते 4 वर्षे पालवीची/ फांद्यांची फक्त वाढच होत राहते. मोहोर व फळधारणा होत नाही. त्यानंतर पुढे वर्षाआड फळधारणा होते. यासाठी छाटणी करून दीड वर्षे झाल्यावर झाडांना 1 जुलै ते15 ऑगस्ट या कालावधीत पॅक्‍लोब्युट्राझोल द्यावे. पॅक्‍लोब्युट्राझोल दिल्याने मोहोर 2 ते 3 आठवडे लवकर येतो. मोहोराची टक्केवारी वाढते. मोहोरातील संयुक्त फुलांचे प्रमाण वाढते. प्रतिझाड फळांचे प्रमाण वाढते. फळांचे हेक्‍टरी उत्पादन साधारणपणे 8 ते 10 टन इतके मिळते.

प्रा.  दर्शना भिमराव मोरे, प्रा. पल्लवी सुभाष घुले सहाय्यक प्राध्यापिका के. के. वाघ. उद्यानविद्या महाविद्यालय नाशिक. मोबा.9689217790

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here