ग्रामीण भागातील प्रगतीमध्ये पशु आणि पक्षांचा मोठा वाटा आहे. गेल्या काही वर्षांत देशातील शेती उत्पादनांच्या बरोबरीने गोवंश आणि इतर पशु-पक्षांच्या संख्येमध्ये चांगली वाढ झालेली आहे. त्यामुळे दुध, मांस, चिकन, अंडी आणि लोकर उत्पादनातही अपेक्षित वाढ आपल्याला साधता आली आहे. मात्र दुसर्या बाजूला संकरीत जातीच्या बरोबरीने देशाचे वैभव असणार्या स्थानिक देशी पशुपक्षांच्या जातीचे संवर्धन आणि सुधारणेकडे तेवढेच लक्ष देणे आवश्यक आहे. आपल्या देशात विभाग निहाय, हवामान निहाय, पशु-पक्षांची विविधता आहे जैवविविधतेमध्ये आपला देश समृद्ध आहे. या जैवविविधतेचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. भारतात मान्यता प्राप्त देशी गोवंशाच्या 37 जातींची नोंद राष्ट्रीय पशु अनुवंशिक संशोधन संस्था, कर्नाल हरियाना येथे झालेली आहे. साधारणपणे गोवंशाचे दुधाळ, शेतीकामासाठी व दुहेरी उपयोगाचा असे तीन गटात वर्गीकरण केले जाते.
त्यापैकी दुहेरी उपयोगाचा गोवंश गटात महाराष्ट्रातील पाच देशी गोवंश जातींचा समावेश आहे. त्यामध्ये देवणी, लाल कंधारी, खिल्लार, डांगी, गवळावू याचा समावेश आहे. महाराष्ट्रातील या पाच गोवंशापैकी मराठवाड्यात देवणी, लाल कंधारी जातीच्या गायींचा समावेश होतो. देवणी प्रजातींच्या गायी ओला, कोरडा, निकृष्ट चारा खावून ऊन वारा, पाऊस आणि थंडी सहन करूनही भरपूर दुध आणि शेतीकामाला मजबूत देखणे बैल देतात. त्यामुळे देवणी गोपालक या जनावरांना पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळतात.
देवणी गोवंशाचा विकास : देवणी गोवंश महाराष्ट्रातील दुहेरी उपयोगाची म्हणजेच दुध आणि शेतीकामासाठी बैल देणारी नावाजलेली जात आहे. 17 व्या शतकापासून गीर जातीच्या जनावरांचे कळप गुजरातमधून मराठवाड्यात चार्याच्या शोधात येत असत. तत्कालीन पशुपालक त्या काळात गीर आणि स्थानिक जनावरांचे संकर घडवून आणत असत. त्यातून जन्मलेली वासरे आकर्षक बाह्य गुणांची असल्यामुळे शेतकर्यांना याबद्दल आवड निर्माण झाली. त्यातूनच देवणी गायींची निर्मिती झाली. त्या काळात या गायींना सुरती असे म्हटले जायचे. त्यानंतर हैद्राबादचे संस्थानिक निजामाच्या राजवटीत 1930 साली देवणी गोवंशाचे सर्वेक्षण आणि संशोधनाचे काम सुरू केले.
याच काळात निकृष्ट वळूंचे खच्चीकरण आणि जातीच्या वर्णनाच्या प्रमाणिकरणाच्या बाबी हाती घेण्यात आल्या. भौगोलिक परिस्थिती आणि स्थानिक उपयोगाच्या दृष्टीकोनातून निजाम राजवटीस या जातीचा विकास झाला. बालाघाटच्या डोंगराळ प्रदेशात लष्करी साहित्य आणि जड वस्तुंची वाहतूक करण्यासाठी मजबूत आणि ताकदवान पशुधनाची म्हणून ही जात विकसित करण्यात आली. निजामाच्या काळात या जातीच्या विकासासाठी चराऊ कुरणाकरीता गायरान आणि शकडो एकर जमिनी देण्यात आल्या. यावर नाममात्र कर आकारून याचा फायदा देवणी पैदासकार, जहागिरदार, देशमुख, मक्तेदार वैयक्तिक शेतकरी आणि लमान तांड्यावरील नायकांच्या देवणी पशुधनास देण्यात आला. यामुळे या जातीची शुद्ध पैदास वाढवून दुर्गम भागासह आंध्र, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेलगतच्या त्रिकोणी भागात या जातीचा विकास झाला.
स्वातंत्र्यानंतर लातूर जिल्ह्याचे सुपुत्र आणि पशुसंवर्धन खात्याचे माजी संचालक डॉ. मुन्सी अब्दुल रहेमान यांनी या जातीला अखिल भारतीय आणि जागतिक पातळीवर 1976 मध्ये नोंदणीकृत मान्यता मिळाविली. गुजरात मधील गीर, खानदेशातील डांगी आणि स्थानिक देशी गायींच्या संकरातून ही जात विकसित झालेली आहे. म्हणून या जातीचे शरीर सारखे आणि रंग डांगीशी मिळता जुळता आहे.
देवणी जातीचा अधिवास बालाघाटच्या पर्वत रांगा म्हणजेच औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यापासून नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यापर्यंत आहे. त्याचबरोबर या भागातील बालाघाटच्या पठारावरील मुख्य मांजरा नदी व उपनद्या यांच्या खोर्यात या जातीची जनावरे आढळतात. देवणी गोवंशाचे मुळ उगमस्थान लातूर जिल्ह्यातील देवणी हा तालुका आहे. यामुळेच या जातीच्या गोवंशाचे नाव देवणी पडलेले आहे. या जातीची जनावरे संपूर्ण लातूर जिल्हा, नांदेड जिल्ह्यातील देगलूर, मुखेड, लोहा आणि कंधार तालुक्यात, परभणी जिल्हा, उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर आणि उमरगा तालुक्यात आढळतात. तसेच कर्नाटक राज्यातील बिदर, बसवकल्याण, भालकी या भागात आढळतात. त्याचबरोबर आंध्रप्रदेश आणि कर्नाटक सिमेलगतच्या त्रिकोणी भागात देवणी जातीची जनावरे आढळतात. 18 व्या पशुगणनेनुसार देवणी जातीच्या जनावरांची एकूण संख्या 73.098 आहे.
मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याचे जास्तीजास्त तापमान 43 सेल्सिअसच्यावर आणि कमीत कमी तापमान 13 सेल्सिअस च्या खाली येते. तसेच सरासरी पर्जन्यमान 750 ते 850 मिमी आहे. या भागातील मांजरा नदीच्या खोर्यातील जमीन खोल, काळी आणि भारी आहे. त्यामुळे डोंगराळ आणि काळ्या जमिनीत काम करण्यासाठी देवणी बैल अत्यंत उपयुक्त आहेत, त्यामुळे डोंगराळ आणि काळ्या जमिनीत निकृष्ट खाद्यावर गुजरान करण्याची क्षमता, परोपजीवी विरूद्ध उत्कृष्ट प्रतिकार शक्ती अशा अनेक गुण वैशिष्ट्यांमुळे या जातीची जनावरे शेतकर्यांमध्ये लोकप्रिय आहेत.
देवणी गोवंशाची गुणवैशिष्ट्ये : देवणी गोवंश महाराष्ट्राची भुषण, मराठवाड्याची शान, लातूर जिल्ह्याचा मान आणि सर्वांचा अभिमान असलेली देशी जात आहे. देवणी जात गुजरातमधील गीर, खानदेशातील डांगी आणि स्थानिक देशी गायींच्या संकरातून विकसित झालेली आहे. म्हणून या जातीचे शरीर गीर सारखे व रंग डांगी जातीशी मिळता जुळता दिसतो. देवणी गोवंशामध्ये तीन प्रकारच्या उपजाती आहेत.
1) वानेरा : चेहर्याचे गाल हे काळ्या रंगाचे आणि संपूर्ण शरीर पांढर्या रंगाचे, यांची संख्या एकूण देवणीच्या संस्थेमध्ये 44 टक्के आहे.
2) शेवरा : काळ्या-पांढरा (काळा बांडा) यांची संख्या एकूण संख्येच्या 46 टक्के आहे.
3) बाळंक्या : शुभ्र पांढरा यांची संख्या एकूण संख्येच्या 10 टक्के आहे. देवणी जातीची जनावरे मध्यम आकाराची आहेत. देवणी भरदार शरीराची डौलदार जात आहे. शरीराचा रंग पांढरा, ठिपकेदार काळा असतो. डोळे पाणीदार, धारदार नजर, डोळ्यांच्या पापण्या काळ्या असतात.
कपाळ बहिंगोलाकार आणि भरीव असते. शिंगे आखुड बोथट, बाजूस मागे आणिपुढे झुकलेले असतात. कान मोठे, लांब आणि समोर उघडे असलेले, आतुन काळे आणि वक्रकार टोक असलेले असतात. त्वचा ढिली, मध्यम जाडीची पोळी लोंबती मोठी असते. त्वचेवरील केस आखुड आणि मुलायम असतात. वशिंड मोठी, भरीव आणि मान उंच असते. पाय मुख्यत: लांब सरळ, मजबुत आणि प्रमाणबद्ध अंतर असलेले असतात. पायाचे सांधे भक्कम, मजुबत असतात. पायांची खुरं मजबुत सारख्या आकाराची आणि एकमेकांजवळ असतात. बोंबुट लहान मध्यम लांबते शेपुट लांब, गुडघ्याखाली सरळ लांबणारे आणि शेपुट गोंडा काळा, पांढरा किंवा काळा पांढरा मिक्स असतो. शरीराची उंची सरासरी 54 ते 55 इंच असते.
उत्पादन क्षमता : देवणी गायीमध्ये धष्ट-पुष्ट विकसित मोठी कास, काळ्या रंगाचे सारख्या अंतरावर चार सड असतात. सरासरी पहिल्या माजाचे वय 36 महिने आहे. पहिल्या विण्याचे सरासरी वय 46 महिने असते. (परंतु शास्त्रोक्त पद्धतीने संगोपन केलेल्या कालवडीचे माजाचे वय 24 महिने आणि पहिल्या विण्याचे वय 34 महिने) या जातीच्या शुद्ध गायी एका वेतात सरासरी 1000 ते 1200 लिटर दूध देतात म्हणजेच एका दिवसाला चार ते सहा लिटर दुध उत्पादन मिळते. दुधामध्ये फॅटचे प्रमाण सरासरी 4.4 टक्के असते. देवणी गायी त्यांच्या आयुष्यात सरासरी आठ ते 10 वासरे देतात. गायीचे सरासरी वजन 430 किलो ग्रॅम आहे. देवणी गायींच्या दुधाला आणि त्यापासून तयार होणार्या दही, ताक, तुप व इतर दुग्धजन्य पदार्थांना मोठी मागणी आहे. देशी गायींच्या दुधातील आरोग्य उपयुक्त असणार्या ए-2 घटकाबद्दल जनमानसामध्ये जागरूकता निर्माण झाल्यामुळे जास्त किंमत मोजून लोक दूध विकत घेतात.
देवणी बैल : जड शेतीकाम, आणि ओढकामात अत्यंत आकर्षक मजबूत भक्कम पायांचे सांधे या गुणांमुळे देवणी बैल लोकप्रिय आहेत. या जातीची बार बैल, सहा बैले नांगर काळ्या रानात सहज ओढतात. एक बैल जोडी जास्तीत जास्त 28 ते 30 क्विंटल माल 10 ते 15 किलो अंतर सहज वाहून नेतात. बैल वयाच्या 24 ते 30 महिन्यापासून कामाला जुंपतात. बैल त्याच्या वयाच्या 12 वर्षांपर्यंत चांगले कार्यक्षम असतात. शुद्ध देवणी बैलाचे सरासरी वजन 560 किलो ग्रॅम असते.
बैल शक्ती आणि ट्रॅक्टर याची तुलना केल्यास फरक एवढाच की ट्रॅक्टर इंधनाचा 100 टक्के वापर करते. तर बैल त्यांना दिलेला चारा इंधन म्हणून 50 टक्के वापरतात आणि उरलेले 50 टक्के शेण आणि मूत्र स्वरूपात परत करतात. याउलट ट्रॅक्टर निर्माण करण्यासाठी वापरलेली ऊर्जा कधी परत करता येत नाही. तसेच भंगार ट्रॅक्टरचे अवशेष पुन्हा वापरण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा खर्च करावी लागते. ट्रॅक्टरने वापरलेल्या इंधनामुळे हवा आणि ध्वनीचे प्रदुषण होते. तर बैलाच्या मुत्र आणि शेणामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते.
आज इंधनाच्या किंमती वाढत आहेत, येणार्या काळात सुद्धा वाढण्याचीच जास्त शक्यता आहे. त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि जमिनीच्या पोत सुधारण्यासाठी बैल जोडी शिवाय शेतकर्यांना पर्याय नाही. आज देवणी बैल जोडीला बाजारात चांगली किंमत मिळते. साधारणपणे शेतकरी दोन ते तीन बैलांचा शेती कामासाठी उपयोग करतात. त्यानंतरही त्यांना बाजारात तेवढीच किंवा त्यापेक्षा जास्त किंमत मिळते. शेणखत आणि गोमुत्राचा वापर जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी होतो. देवणी गोवंशामध्ये स्थानिक वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता, तसेच उत्तम रोग प्रतिकारक शक्ती आहे. यामुळे अल्पभुधारक आणि भुमीहिन शेतकर्यांसाठी देवणी गोवंश शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत आहे.
देवणी गोवंशातील अनुवंशीक दोष आणि अवगुण याविषयी पशुवैद्यक आणि कृषी महाविद्यालय परभणी, लातूर आणि उदगीर येथे भरपूर संशोधन झाले आहे. याआधी सांगितलेल्याप्रमाणे देवणी गोवंशात एकूण संख्येमध्ये 44 टक्के वानेरा 46 टक्के शेवरा आणि 10 टक्के बालक्या प्रकारातील जनावरे आढळतात. आजपर्यंत पशुपालकांनी केवळ वानेरा जातीला प्राधान्य दिल्याने आंतर पैदाशिची समस्या निर्माण झाली आहे. आंतर पैदाशीमुळेच बालंक्या आणि वानेरा या उपजातीत वाकळेपणा वाढत आहे. त्यासाठी या दोन्ही जातींचा संकर हा शेवरा या जातीशी करणे आवश्यक आहे. या संकरातून वाकळेपणा हा अनुवंशीक दोष कमी होण्यास मदत होईल.
जनावरातील अवगुण (दोष) हे अनुवंशीक कारण आहे. सिद्ध वळूमध्ये जर अवगुण असतील तर ते पुढील पिढीमध्ये संक्रमित होतात. बालंक्या या देवणीतील उपजातीच्या जनावरात पुढच्या पायाच्या तुुलनेने मागचे पाय उंच असण्याचा अवगुण जास्त आढळतो. ज्यामुळे कृत्रिम रेतनासाठी बालंक्याचा वापर कमी करून शेवरा या उपजातीला प्रधान्य द्यावे.
अवगुणाबाबत झालेल्या सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले आहे की, बालंक्यामध्ये जास्त 84 टक्के अवगुण आहेत. ज्या खोलाखाल वानेरामध्ये 65 टक्के आणि शेवरामध्ये 15 टक्के अवगुण आढळतात. याच बरोबर एकाच जनावरामध्ये एकापेक्षा जास्त अवगुण दिसून आलेले आहेत. देवणीमध्ये गाजरे खुर, पांढर्या पापण्या, कमालीचा वाकडेपणा या अवगुणांची संगती आढळून येते.
येत्या काळात या अवगुणाची कारणे शोधून हे अवगुण कमी करण्यासाठी जनुकिय संशोधनाची अत्यंत गरज आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये या अवगुणांवर मात करण्यासाठी निरोगी शुद्ध शेवरा वळू रेतनासाठी निवडावा. देवणी गोवंश सुधारण्यासाठी आणि त्यातील अवगुण घालवण्यासाठी शेवरा उपजातीचा वापर कृत्रिम रेतनासाठी किंवा नैसर्गिक संयोगासाठी करणे आवश्यक आहे.
कृत्रिम रेतन सेवा : देवणी मुळ स्थान आणि वास्तव्य असलेल्या प्रदेशात त्यांचे संवर्धन, संगोपन आणि अनुवंशिक देवणी जातीच्या शुद्ध वळूच्या गोठविलेल्या रेतमात्रेचा पुरवठा करणे, शेतकर्यांच्या गोठ्यातील देवणी गाय माजावर आल्यावर शुद्ध देवणी जातीच्या विर्यमात्रा वापरून कृत्रिम रेतन करणे किंवा त्याच जातीच्या शुद्ध देवणी वळूद्वारे नैसर्गिक संयोग घडवून आणणे. जर त्याच जातीचा शुद्ध वळू जवळपासच्या परिसरात उपलब्ध झाला नाही तर गायीस भरवू नये. तो मात्र सोडून द्यावा. त्यानंतर आपल्याला सिद्ध वळूची रेत मात्रा मिळविण्यासाठी तीन आठवड्याच्या कालावधी मिळतो. पुढील माजाच्या वेळी कृत्रिम रेतनाद्वारे गाय भरून घ्यावी. देवणी गोवंशाची गाय शुद्ध पैदाशित सांभाळणे आवश्यक आहे.
उदा : देवणी गायीसाठी सिद्ध देवणी वळूचाच वापर, लाल कंधारी गायीसाठी लाल कंधारी वळूचाच वापर करावा. अशीच पद्धत सर्व देशी गोवंशासाठी वापरणे आवश्यक आहे. गावातील पैदासक्षम मोकाट, निकृष्ट वळूचे खच्चीकरण करणे. स्थानिक देवणी वळूचे विर्यपरीक्षण करूनच त्याचा पैदासिकरीता वापर करावा. देवणी गोवंशाचे शास्त्रशुद्ध पैदास आणि संगोपन करण्यासाठी पशुतज्ञांच्या मार्गदर्शनानुसार मराठा देवणी कॅटल ब्रिडर्स असोसिएशन ची स्थापना केलेली आहे. या संघटने अंतर्गत सर्व देवणी पशुपालकांनी एकत्र येऊन व्यवस्थापनातील समस्यांवर योग्य वेळी मार्गदर्शन घ्यावे. जातीवंत देवणी वळू आणि गायीची संघाकडे नोंदणी करावी. शास्त्रशुद्ध गोवंशाचे संगोपन आणि सुधारणा करण्यासाठी वानेराच्या बरोबरीने शेवरा (काळा बांडा) जातीचेही संगोपन करावे.
अनुवंशीक सुधारणा कार्यक्रम : केंद्र शासन, विविध राज्यातील पशुसंवर्धन विभाग आणि राष्ट्रीय डेअरी विकास मंडळ यांचा अनुभव लक्षात घेऊन महाराष्ट्रातील गायींची उत्पादकता आणि अनुवंशीक सुधारणा करण्यासाठी सर्व समावेशक अनुवंशीक कार्यक्रम सुरू झालेला आहे. याचा पशुपालकांनी लाभ घेतला पाहिजे. या कार्यक्रमांतर्गत उच्च उत्पादन क्षमतेच्या शेतकर्यांकडील देवणी गायींची निवड करून त्यांना पैदास सुविधेसाठी प्राधान्य दिले जाते. त्यातून पशुपालकांना आर्थिक प्रोत्साहन देणे. या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक शेतकर्यांनी त्यांचे अर्ज नजिकच्या पशुवैद्यकीय संस्थेकडे विहीत मुदतीत सादर करावेत. या अर्जापैकी ज्या पशुपालकांच्या गायी शुद्ध देवणी जातीच्या आणि जास्त दुध उत्पादन देणार्या असतील त्यांची निवड केली जाते. या निवडलेल्या गायींना मायरा तर्फे ओळख क्रमांकाचे कानातील टॅक दिले जातात. त्या गायींना माजावर रेतामात्रा वापरून कृत्रिम रेतन केले जाते. या योजनेत प्रत्येक पिढीतील उच्च वंशावळ आणि दूध देण्याची क्षमता असणार्या कालवडीची निवड केली जाते. गाईची उत्कृष्ट निगा राखण्यासाठी पशुपालकांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येते. गाईचे दैनंदिन दूध उत्पादन फॅट आरोग्य विषयक नोंदी, लसीकरण, औषधोपचार इत्यादी नोंदी ठेवल्या जातात. या गायीपासून तयार होणार्या कालवडींची पशुपालकांनी उत्कृष्ट निगा राखली आणि दिलेल्या निर्देशानुसार कालवडींची वाढ झाली तर पशुपालकांना रूपये 5000/ चे मर्यादित अनुदान म्हणून प्रोत्साहन देण्यात येते. उच्च क्षमता असणार्या गायींच्या पोटी जन्माला आलेल्या 2 टक्के नर (दुसर्या पिढीतील) वासरांची निवड करण्यात येते आणि त्यांना जास्तीत जास्त रूपये 25000/ देवून महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ विकत घेते.
भारतीय गोवंशातील देशी गायी दुष्काळी आणि टंचाईच्या परिस्थितीत तग धरून राहतात. उष्णता आणि सूर्यप्रकाश याला सहनशील असतात. निकृष्ट प्रतिचा चारा खावून उत्तम प्रतीचे उत्पादन देतात. विदेशी गायींच्या तुलनेत टंचाईच्या काळात लवकर गर्भधारणा होते. विविध प्रकारचे वातावरण, चारा, यांना जुळवून घेण्याची क्षमता चांगली असते. दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण देशी गायींमध्ये जास्त असते. शिवाय दुधातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण देशी गायीमध्ये जास्त असते. शिवाय स्निग्धांशाचे प्रमाण जास्त असते. अलिकडील (1993) संशोधनात असे दिसून आले आहे की, देशी गायीच्या दुधात आरोग्यादायी A2 घटक असतो. विदेशी गायीच्या दुधात आरोग्यास घातक A1 घटक असतो. विदेशी गायीच्या दुधात A1 बिटा केसीन असते. त्याचे मानवाच्या आतड्यात पचन होऊन बिटा केसोमॉर्फीन-7 (बी.सी.एम-7) हे पेप्टाईड तयार होते. बिटा केसोमॉर्फीन-7 रक्तात शोषले गेल्यास पहिल्या प्रकारचा मधुमेह, स्वमग्रता आणि स्क्रिझोफ्रेजिनया सारखे रोग माणसांना होतात. विदेशी गायींच्या दुधापासून तयार होणार्या बिटा केसोमॉर्फीन-7 ला डॉ. कीथ वुडफोर्ड यांनी डेव्हिल( राक्षस) म्हटले आहे. त्यांनी सन 2007 मध्ये डेव्हिल इन मिल्क हे पुस्तक प्रकाशित करून जगभर खळबख उडवून दिली.
डॉ. बॉब इलीयट या बालरोग तत्ज्ञाला 1993 मध्ये न्युझीलंड सरकारने बालवयातील मधुमेहाचे वाढते प्रमाण पाहून कारणे शोधून उपाय सुचविण्याचे काम दिले होते. बालवयातील मधुमेहीना रोज महागड्या इन्सुलीनची इंजेक्शन घ्यावी लागत होती. डॉ. बॉब इलियट यांनी संशोधन करून युरोपीय गोवंशाच्या दुधाला मधुमेहासाठी जबाबदार धरले. न्युझीलंड मधील गोपालक आता या सिंद्धांताने जागे झाले आहेत. त्यांनी आता भारतीय वळूचे वीर्य वापरून A1 गोवंशाचे A2 वंशात रूपांतर करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. आज चीन, अमेरिका, युरोप, ऑस्ट्रोलिया, न्युझीलंड या देशात A2 दुधाची विक्रीकेद्र उघडली आहेत. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपल्याला मात्र भारतीय गोवंश म्हणजे घरकी मुर्गी दाल बराबर वाटतो. यावर आता अधिक संशोधनाची गरज आहे.
देशी गोवंशाचे बैल शेती कामासाठी काटक असतात. जास्त तापमान ते सहन करू शकतात. त्वचा मध्यम जाड, हालचाल होणारी असल्यामुळे माशा, डास व इतर किटकांपासून संरक्षण होते. घामाच्या ग्रंथीमुळे तापमान संतुलीत राखले जाते आणि घामाच्या विशिष्ट वासामुळे किटक दूर राहतात.
देवणी जनावरांची रोग प्रतिकारक क्षमता विदेशी गायींच्या तुलनेत जास्त आहे. विशेषत: गोचीडजन्य आजारास देवणी जनावरे प्रतिकारक्षम आहेत.
देवणी गायीमध्ये मातृत्वाची भावना जास्त असल्यामुळे वासरांचे उत्तम संगोपन होते. त्यामुळे वासरे जिवंत राहण्याचे प्रमाण जास्त असते. देवणी गायींचे खुर मजबूत रंगाने काळे आणि एकमेकांजवळ असतात. त्यामुळे खुरांचे आजार होत नाहीत. अशा प्रकारच्या अनेक सरस गुणवैशिष्ट्यामुळे देशी गायीचा वापर करून ब्राझील ऑस्ट्रोलीया, अमेरिका, अफ्रिका, इत्यादी देशांमध्ये सुधारीत जाती तयार केल्या आहेत.
देवणी गोवंशाचे जतन, संगोपन, आणि विकास होण्यासाठी : देवणी ही महाराष्ट्रातील देशी गोवंशातील दुहेरी उपयोगाची अत्यंत लोकप्रिय जात असल्यामुळे या जातीचे संवर्धन आणि अनुवंशीकरण सुधारणा होते अत्यंत आवश्यक आहे. या जातीचे संवर्धन आणि सुधारणा होण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबींची माहिती पशुपालकांना असणे अत्यंत आवश्यक आहे.
पशुपालकांना जनावरांच्या आहार शास्त्राविषयी माहिती असणे आवश्यक आहे. आज शेतकरी आणि पशुपालकांनी ऊस, सोयाबीन या नगदी पिकांबरोबरच देवणी पशुच्या पोषणासाठी अफ्रिकन टॉल मका, कडवळ, यशवंत, जयवंत किंवा संपूर्ण घास गवताची लागवड करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रथिनयुक्त घटकांसाठी मेथी घास, पाण्यावर वाढणारी कमी खर्चाची अझोला वनस्पतीची लागवड आणि नोव्हेंबर महिन्यात मुबलक उत्पादन होणार्या एकदल हिरव्या चार्यापासून मुरघास तयार करून उन्हाळ्यात त्यांचा वापर करावा. उपलब्ध वैरणीचा योग्य वापर होण्यासाठी कडबा कुट्टी यंत्राचा वापर केल्यास चाळीस ते पन्नास टक्के वैरणीची बचत होते. त्याचबरोबर पशु आहारात दररोज मीठ आणि खजिन मिश्रणाचा वापर करावा. जनावरांना दररोज पिण्यासाठी चाळीस ते साठ लिटर शुद्ध पाणी देणे आवश्यक आहे. दिवसातून तीन ते चार वेळा पाणी दिल्यास उत्पादनामध्ये पंधरा ते वीस टक्के वाढ मिळते.
व्यवस्थापन : देवणी जनावरांचे ऊन, वारा, थंडी आणि पाऊस यांपासून संरक्षण होण्यासाठी साधा कमी खर्चांत गोठा बांधावा. त्यामुळे गाय, बैल आणि वासरे यांचे आरोग्य चांगले राहील.
रेकॉर्ड किंपींग : जनावर माजावर आलेली तारीख गर्भ तापासणीची आणि हिशेब ठेवणे आवश्यक आहे.
आरोग्य : जंत आणि गोचीड निर्मुलन, रोग प्रतिबंध लसीकरण घटसर्प, फर्या लाळ्या खुरकुत कालवडीमध्ये ब्रुसेलॉुसस इत्यादी लसी वेळेत द्याव्यात.
डॉ. श्रीधर जी. शिंदे सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन, तालुका लघु पशुचिकित्सालय, औसा, जि. लातूर. मोबा. 9422968151