आपल्या समृद्ध हिंदूस्थानाचा आधार होता; समृद्ध शेती आणि समृद्ध शेतीचा पाया होता गाय, आपली देशी गाय ! एक गोमाता आणि शाश्वत कृषी उत्पानासाठी एक वरदान ! खरे पाहता, आपल्या प्राचीन सुजलाम् सुफलाम् समृद्ध भारताची कृषी संस्कृती ही गोसंस्कृती होती. जमीन ही अन्नपूर्णा होती कारण सेंद्रीय शेती पद्धतीमुळे तिची सुपीकता जोपासली जात होती आणि सेंद्रिय शेतीचा मुळ पाया भारतीय देशी गोवंश घालत होता आणि म्हणूनच प्रत्येक शेतकर्यांकडे मुबलक पशुधन असायचे.
काळाच्या ओघात रासायनिक शेतीचा प्रचार व प्रसार करता करता त्यांचा अतिरेकी वापर होत गेला आणि आमच्या बळीराजाचे पशुही गेले आणि पशुंबरोबर त्याचे धन ही गेले. आपणास गतवैभव पुन्हा प्राप्त करावयाचे असेल तर सेंद्रिय शेतीस पर्याय नाही आणि भारतीय वंशाच्या देशी गाईशिवाय यशस्वीपणे सेंद्रिय शेती करणे शक्य नाही. आपल्या पूर्वापार चालत आलेल्या शेती पद्धतीला पूर्णपणे शास्त्रीय आधार गाय होता. या एका मूलभूत सिंद्धांतावर आपल्या शेतीचा डामडौल उभा होता. हीच आमची श्रीमंती होती. याचे एकमेव कारण म्हणजे सजीव जमीन ! सजीव जमीन अनेकविध जीवाणूंनी समृद्ध असते आणि अशी जमीन आपल्या जीवनाला संपन्नता बहाल करते. जमीन सजीव ठेवण्याचे एकमेव साधन होते ती म्हणजे गाय.
भारतीय गोवंश व प्रजाती : आपल्या देशी गाईचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांना वशिंड व शिंगे असतात. शेपटी लांब असते. पुढचा भाग रूंद, मागचा भाग अरूंद म्हणनेच सिंहकटी असते. दूधाबरोबरच तिचे गोमय म्हणजे शेण व गोमूत्रास शेतीपद्धतीेत अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतात अनेकविध प्रजाती आहेत. त्यात प्रामुख्याने पुढील प्रकार आढळतात.
दूधप्रधान : या गाई जास्त दूध देतात मात्र गोर्हे शेतीत फारसे उपयोगी पडत नाहीत. उदा. लालसिंधी, मॉन्टगोमेरी ,
वत्सप्रधान : दुधास कमी मात्र गोर्हे अत्यंत उपयोगी पडतात. उदा. खिल्लारी डांगी, निमारी व अमृतमहाल,
सर्वांगी दूध व जोतशक्तीधारक : दूधास चांगल्या व गोर्हे सुद्धा अत्यंत उपयुक्त उदा. हरियाना, थारपारकर, काकरेज, देवनी, गौळावू आणि गीर, काठीयावाडचा लांब कानांचा गीर गोवंश हा दक्षिण भागातील गीर नावाच्या जंगलात मिळतो. या वंशाचे कपाळ जास्त उभार व रूंद असते. कान लांब व लागलेले असतात व शिंगे लहान असतात. गायीचा मुळ रंग तांबूस असून त्यावर वेगवेगळ्या रंगाच्या छटा असतात. या जातीच्या गुरांची पाठ मजबूत, सरळ व समचौरसाकृति असते. रोपटी लांब असते. शुद्ध गीर जातीच्या गायी बहुदा एकाच रंगाच्या नसतात. या गायी भरपूर दुध देतात. बैल मजबूत असतात. जड कामासाठी चांगले असतात.
शाश्वत शेतीत देशी गायच का ? : देशी गाय इक्सनावाटे जेवढा ऑक्सिजन घेते त्यापैकी काही ऑक्सिजन मुक्त स्वरूपात बाहेर सोडते. म्हणून पूर्वी टी. बी. च्या रोग्याला गाईच्या गोठ्यात ठेवले जात असे. प्रयोगांती सिद्ध झाले आहे की, शेतीला उपयोगी पडणार्या जीवाणूंची संख्या जर्सी, होल्स्टेन इत्यादी विदेशी गाईच्या रोगापेक्षा देशी गाईच्या शेणात कित्येक पटीने जास्त असते. म्हणूनच सेंद्रिय शेतीत बिजामृत आणि जिवामृत तयार करण्यासाठी देशी गाईच्या शेणाचा वापर करण्याची शिफारस केली जाते. गायीच्या खाण्यात चुकून जरी विषारी पदार्थ आला तर त्याचा अंश, दूध, मूत्र व शेणामध्ये येत नाही. देशी गाईचे शिंग, पाठीचा कणा व वशिंड याचे खास वैशिष्ट्य म्हणजे सूर्यकिरणांचे दूधामध्ये स्वर्णक्षार करण्याचे असते म्हणून गायीच्या दूधा-तूपाचा रंग पिवळसर असतो.
देशी गायीचे शेण, गोमूत्र व तेहतीस कोटी देव : गोमये वसते लक्ष्मी ! असे म्हणतात. याचा अर्थ गायीच्या शेणात लक्ष्मीचा वास असतो. लक्ष्मी म्हणजे गोमयात (गायीच्या शेणात) असणारे अब्जावधी, अनंत कोटी व अनंतप्रकारे जीवाणू या जीवाणूंची पेरणी जिवामृताच्या रूपातून जमिनीत विरजण म्हणून टाकायचे असते. आणि म्हणूनच एकच देशी गाय पाळून आपणास 10 ते 15 एकर शेती सहज सेंद्रिय शेती पद्धतीने करता येते. वेदपूर्व प्राचीन साहित्यात देखील अनेक दाखले मिळतात. जेथे वस्तू आहे तेथे गती आहेत. शक्तीची अनेक रूपे आहेत. प्रत्येक शक्तीला आपण देवरूप मानतो. शक्ती अदृश्य मग देव तरी दृश्य स्वरूपात दिसेल कसा? आपण फक्त शक्तीचे प्रतिक म्हणून देवांच्या प्रतिमा मानतो. अशा तेहतीस प्रकारच्या शक्तीचे प्रतिक/वसतीस्थान गायीमध्ये असते. थोडक्यात गोमय आणि असा गोमूत्रात तेहतीस प्रकारचा वस्तू असतात. कोटीचा सरळ अर्थ प्रकार आहे. म्हणून गाय पवित्र व तिच्यात तेहतीस कोटी देवांची वसती थोडक्यात गाय अति पवित्र आणि सेंद्रिय शेतीच्या दृष्टीने गाय ही खरी कामधेनूच आहे.
गोमूत्राच्या वापराने रोग व कीड नियंत्रण : देशी गाईचे गोमूत्र औषध म्हणून वापरावयाचे असते. गोमूत्र काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवले तरी चालते. जितके गोमूत्र जुने तितके जास्त औषधी असते. देशी गाईचे मूत्र वर्षांनुवर्षे ठेवले तरी चालते. त्यात म्हशीच्या मूत्रामध्ये चार सहा दिवसांमध्ये बुरशी व जीवजंतू तयार होतात. दूध देणारी गाय असली तर त्या गोमूत्रात लॅक्टोज असल्याने अधिक फायदा होतो. देशी गाईचे गोमूत्र मिळवत असतांना सुद्धा ती गाय 24 तास गोठ्यात बांधलेली नसावी. ती मोकळ्या वातावरणामध्ये कुरणामध्ये-वनामध्ये चरणारी असावी. गाय गाभण असेल तर तिच्या गोमूत्रामध्ये हार्मोन्स् असतात. त्याच्यामुळे वनस्पती निरोगी राहण्यास मदत होते. पिकांना कीड व जीवाणूजन्य रोग होण्याची शक्यता असते. त्यावर गोमूत्राचा वापर हा रामबाण उपाय आहे. गोमूत्रातील तेहतीस प्रकारचे घटक कार्यरत होतात. त्याचा परिणाम म्हणून किडी, बुरशीजन्य व विषाणूजन्य रोग पळून जातात. सर्व अन्नाचे योग्यरित्या ज्वलन करून शक्ती निर्माण करण्याची क्षमता गोमूत्रामध्ये आहे.
गोमूत्रात गंधक असते ते आधुनिक भाषेत इंडोसल्फानचे काम करते. नत्र, स्फुरद, पालाश, लोह, कॅल्शियम, सोडियम इत्यादी पदार्थ असतात ते वनस्पतीला निरोगी आणि सशक्त ठेवण्यास मदत करतात. मँगनीज व कॉबॅलिक अॅसिड गोमूत्रामध्ये असते. त्यामुळे ते किटकनाशकाचे काम करते व किडानिर्मिती ही थांबते. गोमूत्रामध्ये तांबे असते. हे तांबे तीन प्रकारचे काम करते. सजीवाचे चयापचयामध्ये निर्माण झालेले तांबे वैशिष्यपूर्ण असते. ताम्रयुक्त गोमूत्र मोरचूदासारखे किटकनाशकाचे काम करते. सर्व विश्वामध्ये विद्युत चुंबकीय लहरी असतात. तांब्याच्या गुणधर्मामुळे त्या लहरींचा स्विकार वनस्पतीकडून मोठ्याप्रमाणात होतो. त्यामुळे वनस्पतींना शक्ती मिळते, वनस्पती सशक्त व निरोगी राहते. वनस्पतीमध्येच त्या तांब्याचे रूपांतर स्वर्णक्षारामध्ये केले जाते, त्या स्वर्णक्षारांमुळे वनस्पती तजेलदार निरोगी राहते.
गोमूत्राचा वापर कसा करावा ? : गोमूत्र देशी गाईचेच हवे, 15 लिटर पाण्याचा पंपामध्ये 100 ते 150 मिली गोमूत्र मिसळून औषध फवारतात त्याप्रमाणे पंपाने फवारावे. एक एकर क्षेत्रासाठी चार ते पाच पंप लागतात. गोमूत्र फवारण्याची वेळ सकाळी 10 पूर्वी व सायंकाळी 4 नंतरची असावी. देशी बैलाचे मूत्र असेल तर 70 ते 100 मिली प्रत्येक 15 लिटर पाण्यामध्ये मिसळावे. दर आठ दिवसांनी फवारण्याचे सातत्य राखेल तर केळीचा कॅन्सर समजला जाणारा पर्णगुच्छ नाहिसा होतो. फळझाडांमध्ये फुलोरा येण्यापूर्वी आणि आल्यानंतर ही वापरल्याने फलधारणा विपुल प्रमाणात होते फक्त वापरण्यात सातत्य हवे.
मानव कल्याणासाठी गोधन : अपवित्र किंवा अशुद्ध परिसर व वातावरण शुद्धीसाठी घरात गाईच्या शेणाचा वापर करून तसेच गोमूत्र शिंपडण्याची प्रथा अद्यापही ग्रामीण भागात अस्तित्वात आहे. गोमूत्रासहीत तयार केलेल पंचगव्य प्राशन करून देहशुद्धी करण्याचा शास्त्रशुद्ध प्रधान आहे. गाईच्या गोमूत्राचा विविध रोगांवर उपयोग केला जातो. यकृत व प्लिहेच्या विकारावर त्यांचा उपयोग होतो. जलोदरावर त्याचा उपयोग करण्याचा प्रधात पूर्वीपासून आहे. गोमूत्र प्याल्याने किंवा हुंगल्याने बिदालहरी बलवान होतात. त्यामुळे मेंदूला रक्त पुरवठा भरपूर व पुरेसा होतो.
देशी गाईच्या दुधामध्ये 21 प्रकारची अॅमिनो अॅसिडस असतात. ही सर्व अॅसिडस मानवी चयापचयामध्ये अत्यंत आवश्यक असतात. मानवी शरीरमध्ये यापैकी 8 अॅमिनो अॅसिडस् सरळ सरळ तयार होत नाहीत. देशी गाईचे दूध स्वादिष्ट थंड, कोमल, स्निग्ध, सौम्य, जाड, लज्जतदार, पौष्टीक, बाह्यपरिणामापासून अधिक काळ सुरक्षित मन प्रसन्न करणारे असते. गाईच्या दूधातील क्युरोसीन नावाच्या प्रोटिनमुळे दूधास पिवळसर झाक आलेली असते. त्याच्यामुळे आरोग्य दृष्टी सुधारते.
देशी गाईचे एक लिटर दूध घेऊन त्याचे रासानिक पृथ:करण केले असता असे आढळून आले आहे की, आठ अंडी किंवा अर्धा किलो मटण किंवा पाऊण किलो मासळी यापासून जेवढी जीवनसत्त्वे मिळतात तेवढी जीवनसत्वे एक लिटर दुधातून मिळतात. शिवाय पोषणतत्वे अधिक चांगली असतात. सहज पचणारी व सात्विक असतात. आपले शरीर ती सहजपणे ग्रहण करू शकते.
गाईच्या कच्च्या दुधामध्ये (गाय व्याल्यानंतरचे पहिले दूध) ऑक्साईड रिडक्टस सारखी पाचकद्रव्ये असतात. शिवाय 90 पेक्षा ही जास्त रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे घटक असतात. त्यामुळे शेतकरी गाय व्यालानंतर तिच्या वासरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्यासाठी हे पहिले कच्चे दूध भरपूर पाजतात.
सध्या सर्व जगात हाहाकार माजविणार्या स्वाईन प्ल्युवर परम संगणक, जनक डॉ. विजय भटकर, पुणे यांनी गाईच्या कच्च्या दुधाचा वापर करून रामबाण औषध तयार केले आहे. सारांश गायीस भारतीय संस्कृती माता असे म्हणते गायीच्या देहाचा श्रमाचा व कर्माचा प्रत्येक कण मानवाच्या व एकूणच संपूर्ण जीवसृष्टीच्या जगण्याकरिता झिजत आलेला असतो. अशी गोमाता आता गावोगावी प्रत्येक शेतकर्यांच्या घरासमोर/शेतात हवीच.
डॉ. साहेबराव मा. क्षीरसागर 30, साही, श्रीराम चौक, राजीवनगर, नाशिक मोबा. 9623187679