सांगली, सोलापूर व नाशिक या जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतीम टप्प्यात आला आहे. द्राक्षबागातील काढणी सर्वसाधारण ६५ ते ७५ टक्के पूर्ण झाली आहे. मात्र दरात सारखी घसरण सुरू असून, सध्या द्राक्षाचे दर ३० ते ३५ रुपयांवर आले आहेत. ऐन हंगामात द्राक्षाचे दर घरल्याने द्राक्ष बागायतदार आडचणीत आले आहेत.
प्रामुख्याने कोरोनामुळे लॉकडाऊनच्या अफवा तसेच अवकाळी पाऊस, इंधन दर वाढ आणि निर्यातीवर आलेल्या मर्यांदा याचा जोरदार फटका द्राक्ष दर कमी होण्याला बसला आहे. चार किलो द्राक्षाचा दर १५० ते २२५ रुपये किलो होता तो आता १३० ते १४० रुपयांवर आला आहे. तर निर्यातक्षम द्राक्षाचे दर २२० ते २६० रुपयांवरून थेट १८० ते २२० रुपयांवर आले आहेत. दर घसरणीची चिंता द्राक्ष उत्पादकांना कायमची आहे. चालू हंगामात द्राक्ष उत्पादनासाठी घेतलेल्या औषध, खतांचे पैसे कसे फेडायचे ? असा प्रश्न त्यांच्या समोर आहे. द्राक्षासाठी प्रत्येकवर्षी द्राक्ष उत्पादकांच्या मागे लागणार्या व्यापाऱ्यांना यावेळी शोधण्याची वेळ आली असून, यांदा काही शेतकऱ्यांनी दर न ठरताच माल घालवण्याच्या दृष्टीने व्यापाऱ्यांना बागा दिल्याचे समजते.
यंदाचा अवकाळी, अतिवृष्टी, धुके, कोरोना संकट, निर्यातीवरील अनुदान कपात, सध्या कोरोनाची रुग्ण संख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि प्रशासनाकडून लॉकडाउनची दाखवली जाणारी भीती द्राक्ष उत्पादकांच्या मुळावर आली. सांगली जिल्ह्यातील सुमारे ३२ हजार हेक्टरवर द्राक्ष बागांची लागण आहे. सद्य:स्थितीत ५० टक्के बागांची विक्री झाली आहे, तर यापूर्वी नैसर्गिक आपत्तीमुळे २५ टक्के माल खराब झाला आहे. उर्वरित पंचवीस टक्के क्षेत्रातील बागा शिल्लक आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे नादात, उत्पादन खर्च दुप्पट तर झाला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, असे सरकारने सांगितले. पण प्रत्यक्षात त्याचा उत्पादन खर्च दुप्पट करून जे होते ते उत्पन्नदेखील हातातून जात आहे.
नाशिक, सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांची स्थितीही अशीच असून दर्जेदार द्राक्ष उत्पादन करून किमान दर मिळणेही मुश्किल झाले आहे. दर स्थिर राहील याची खात्री नसल्याने द्राक्ष बागायतदारांची चिंता वरचेवर वाढत आहे.