असे करा भातावरील किडीचे प्रभावी व्यवस्थापन

0
1205

महाराष्ट्रात भात हे दुसरे प्रमुख पीक असून कोकणपट्टी, मावळ, चंद्रपूर, भंडारा, नागपूर व कोल्हापूर या भागात टन प्रती हेक्टर आहे. भात पिकावर येणार्‍या वेगवेगळ्या किडींमुळे देशात जवळ जवळ 600 किडींची नोंद झाली आहे. तथापि, काही मोजक्यात किडी महत्त्वाच्या असून त्यांच्यामुळे उत्पन्नात 30 टक्के घट होते. त्यामध्ये पिवळा खोडकिडा, पाने गुंडाळणारी अळी, सुरळीतील अळी, लष्करी अळी, गादमाशी, तपकिरी तुडतुडे आणि निळे भुंगेरे या महत्त्वाच्या किडी आहेत. या किडींची सविस्तर माहिती या लेखात देण्यात आलेली आहे.

पिवळा खोडकिडा (स्किरपोफॅगा इन्सरट्यूलस वॉकर) : या किडींचा पतंग पिवळसर व नारंगी रंगाचा असतो. पतंगाची लांबी 13 ते 16 मिमी तर पंखाचा विस्तार 22 ते 30 मिमी असतो. मादी पतंगाच्या पुढील पंखावर प्रत्येकी एक काळा ठिपका असतो. मादी पतंग सकाळच्या कोवळ्या उन्हात किंवा सायंकाळी भाताच्या रोपांवर, पातीच्या टोकाकडे बसलेलं दिसून येतात. नर पतंग वाळलेल्या गवताप्रमाणे करड्या रंगाचे असून मादी पतंगापेक्षा आकाराने लहान आणि बारीक असतात. नराचे डोळे टपोरे, काळ्या रंगाचे असून त्यांच्यापुढील पंखांवर काळे ठिपके नसतात.

जीवनक्रम : मादी पतंग सर्वसाधारपणे काळोख पडू लागताच अंडी घालते. मादी भाताच्या पातीच्या पृष्ठभागावर टोकाकडे, पुंजक्याने दोन ते तीन दिवसात 80 ते 195 अंडी घालते. अंडी पुंजहे फिकट-तपकिरी रंगाच्या केसांनी झाकलेले असतात. अंडी पाच ते सहा दिवसात उबतात. अंड्यातून नुकतीच जन्माला आलेली अळी फिकट पांढर्‍या रंगाची असून ती काही काळ (1 ते 2तास ) पानांच्या टोकावर राहते आणि पानाचा पृष्ठभाग खरवडते. साधारणपणे एक ते दोन तासाने ती आपल्या लाळेपासून एक चिकट धागा बाहेर टाकते आणि त्याला लोंबकळत राहते. वार्‍यामुळे अशा अळ्या सर्व शेतभर पसरतात. तिची योग्य वाढ झाल्यावर ती खोडाकडे सरकते आणि खोडाला बारीक छिद्र पाडून आत प्रवेश करते. अळी अवस्था 34 ते 41 दिवस असते. अळी 25 मिमी लांब तीन मिमी रूंदीची असते व ती खोडातच कोषावस्थेत जाते. की अवस्था सात ते दहा दिवस राहते. यात तिची वाढ चार ते सात अवस्थांमध्ये पूर्ण होते. किडीच्या सर्वसाधारण तीन ते पाच पिढ्या या दक्षिण भारतात पूर्ण होतात. कारण त्या ठिकाणी भात पीक दुबार घेतले जाते. महाराष्ट्रात चंद्रपूर, भंडारा आणि रायगड या जिल्ह्यात ही किड दिसून येते. या ठिकाणी देखील भातपीक दुबार घेतले जाते आणि येथेही चार पिढ्या पूर्ण होतात. मात्र फक्त पावसाळी एकच पीक जेथे असते तेथे या किडीची एकच पिढी पूर्ण होऊ शकते.

नुकसानीची पद्धत : या किडीचा प्रादुर्भाव पिकांवर मुख्यत्वे करून तीन अवस्थांमध्ये दिसून येतो. रोपावस्था, फुटव्यांची अवस्था, पोटरी अवस्था, या किडीचा प्रादुर्भाव तसा रोपवाटिकेपासूनच दिसून येतो आणि तेथून पुढे वाढत जातो. रोपवाटिकेतील रोपे अळीच्या बाहेर पोखरण्यामुळे तेथेच मरतात. परिणामी रोपवाटिकेत रोपांची संख्या घटते. पुढे असे रोप पुनर्लागवडीसाठी वापरले तर हा प्रादुर्भाव सर्व दूर पसरतो.

दुसरा प्रादुर्भाव हा फुटव्यांच्या अवस्थेत दिसून येतो. या वेळी शेतात कीड प्रादुर्भावामुळे फुटव्यांचा वाढणारा कोंब (गाभा) सुकून जातो. यालाच गाभामर म्हणतात. असे अनेक फुटवे मेल्यामुळे पुढे लोंब्यांच्या संस्थेवर विपरीत परिणाम होतो आणि उत्पादन घटते असे मेलेले फुटवे हाताने सहज उपटून काढता येतात.

तिसरा प्रादुर्भाव हा पीक पोटरीच्या अवस्थेत असताना होतो हा मात्र तीव्र नुकसान करण्यास कारणीभूत होतो. यामध्ये वरील गाभामर प्रमाणे कोवळ्या पोटरी अवस्थेतील लोंब्या, मुळांवाटे अन्न आणि पाणी न मिळाल्यामुळे भरू शकत नाहीत. परिणामी रिकाम्याच बाहेर येतात. यालाच शेतकरी पळींज किंवा पांढरी पिशी म्हणतात. शेतात अशा लोंब्या स्पष्ट दिसतात. कारण त्यात दाणे भरलेले नसतात आणि त्या सरळ उभ्या राहतात. वाळलेल्या फुटवयंप्रमाणे हे देखील सहज उपटता येतात.

किडींचे अंडीपुंज वेळोवेळी गोळा करून नष्ट करावेत. किडग्रस्त फुटवे आणि पळींज उपटून नष्ट करावेत. नर पतंग आकर्षित करण्यासाठी लिंगप्रलोभन सापळ्यांचा प्रती हेक्टर 20 सापळे या प्रमाणात वापर करावा. नैसर्गिक शत्रू उदा. बेडूक, चतुर अशांचे भात खाचरात संवर्धन करावे.

जैविक नियंत्रणासाठी लावणीनंतर 30 दिवसांपासून ट्रायकोग्रामा जापोनिकमची हेक्टरी 50,000 अंडी तीन ते चार वेळा 10 दिवसांच्या अंतराने शेतात सोडावीत.

किटकनाशकांचा वापर : रोपवाटिकेत दाणेदार किटकनाशके खाली दिलेल्या प्रमाणात वापरावीत. पेरणीनंतर रोपवाटिकेमध्ये 15 दिवसांनी एक पतंग किंवा एक अंडीपुंज प्रती चौरस मीटर किंवा पाच टक्के किडग्रस्त रोपे आढळल्यास दाणेदार 10 टक्के फोरेट 10 किलो किंवा पाच टक्के क्विनॉलफॉस 15 किलो किंवा तीन टक्के कार्बोफ्युरॉन 16.5 किलो प्रती हेक्टरी करावे. लागवडीनंतर व क्विनॉलफॉस 25 टक्के प्रवाही 1600 मिली किंवा कारटॅप हायड्रोक्लोराईड 50 टक्के 600 ग्रॅम किंवा ट्रायझोफॉस 40 टक्के 1350 मिली प्रती हेक्टरी 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

पाने गुंडाळणारी अळी (नॅफॅलोक्रोकिस मेडीनॅलिस) : या किडीचे पतंग सोनेरी फिकट पिवळसर रंगाचे असतात. त्यांच्या पंखांवर काळी नागमोडी नक्षी असते. पंखाच्या कडा काळसर असतात. अंड्यातून नुकतीच बाहेर पडलेली अळी पांढरट हिरव्या रंगाची असते . व पूर्ण वाढलेली अळी पिवळसर हिरवट असते. डोके मात्र काळसर असते. पूर्ण वाढलेली अळीची लांबी 15 ते 16 मिमी असते. तर रूंदी दोन मिमी असते. अळी नेहमी पानांना गुंडाळीत राहते.

जीवनक्रम : मादी दोन ते तीन दिवसांत सुमारे 60 ते 180 अंडी घालते. अंडी पानांच्या पृष्ठभागावर मुख्य शिरेजवळ ओळीत घातली जातात. अंडी षट्कोनी पारदर्शक असतात. साधारणपणे तीन ते चार दिवसांनी अंड्यातून अळी बाहेर येते. अंडी 1.5 मिमी लांब व 0.3 मिमी रूंद असतात. अळीच्या पाच अवस्था असतात. अळी अवस्था 15 ते 17 दिवस टिकते. कोष पानाच्या गुंडाळीत तयार करते. कोष तांबड्या रंगाचा साधारणत: आठ ते दहा मिमी लांब व दोन मिमी रूंद असतो आणि सहा ते सात दिवसांनी त्यातून पतंग बाहेर पडतो. नर पतंग तीन ते चार दिवस जगतो. तर मादी पतंग चार ते दहा दिवस जगते. किडीची एक पिढी पूर्ण होण्यास नरास 33 ते 48 दिवस लागतात तर मादीस 36 ते 52 दिवस लागतात.

नुकसानीची पद्धत : अळी दोन्ही कडा एकत्र चिकटवून पानाची गुंडाळी करते व त्यात राहते आणि आतील पृष्ठभागातील हरितद्रव्य खाते. त्यामुळे गुंडाळीच्या बाह्य पृष्ठथभागावर पांढरट चट्टा पडतो. नुकसान जास्त असेल तर पीक निस्तेज पडते. पिकाची जोमदार वाढ, भरपूर पाऊस, अधून मधून उघडीप व हवेतील गारठा अशा प्रकारचे हवामान या किडीच्या वाढीस अत्यंत पोषक असते.

एकात्मिक व्यवस्थापन : बांधावरील गवत काढून बांध स्वच्छ ठेवावेत. ट्रायकोग्रामा जापोनिकम किंवा ट्रायकोग्रामा चिलोनीस या परोपजिवी किटकाची 50, 000 अंडी प्रती हेक्टरी पिकामध्ये सोडावीत. प्रत्येक चुडात एक ते दोन नवीन किडग्रस्त पाने दिसलयस प्रती हेक्टरी डायक्लोरोव्हास 76 टक्के 625 मिली किंवा अ‍ॅसिफेट 75 टक्के 660 ग्रॅम किंवा कारटॅप हायड्राक्लोराइड 50 टक्के 1000 ग्रॅम किंवा क्लोरापायरीफॉस 20 टक्के 1875 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 इसी 1000 मिली 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

सुरळीतील अळी (निमयुला डिपंक्च्यालिस) : पतंग लहान नाजुक व दुधाळ पांढरा असून त्यांच्या पंखाचा विस्तार 8 ते 11 मिमी असतो. त्यांच्या पंखावर फिक्कट काळ्या रंगाचे लहान-लहान ठिपके असतात, अळी पारदर्शक फिक्कट हिरवट, पांढरट रंगाची असते. पूर्ण वाढलेल्या अळीची लांबी 20 मिमी असते.

जीवक्रम : एक मादी रोपाच्या पानांवर सुमारे 60 ते 150 अंडी घालते व त्यातून चार ते पाच दिवसांनी छोट्याशा पारदर्शक हिरवट रंगाच्या अळ्या बाहेर येतात. अळी पानाचा छोटासा तुकडा कापून त्याची सुरळी करते आणि त्यात राहते. दिवसा अळी सुरळीमध्ये राहते. अशा सुरळ्या शेतामध्ये पाण्यावर तरंगताना आढळून येतात. अळी अवस्था 14 ते 20 दिवस टिकते. सुरळीतच कोष तयार होतो आणि कोषातून चार ते सात दिवसांनी पतंग बाहेर येतो. या किडीची एक पिढी पूर्ण होण्यास 19 ते 37 दिवस लागतात.

नुकसानीचा प्रकार : अळी कोवळे पान कापून त्याचे लहान तुकडे करते व त्याची सुरळी करून त्यात राहते. रात्रीच्या वेळेस अळी सुरळीतील हिरवा पापुद्रा खाते आणि फक्त बाहेरील पापुद्रा शिल्लक ठेवते. अशा सुरळ्या पानाच्या एका कडेस लटकत किंवा पाण्यावर तरंगत असलेल्या दिसतात.

एकात्मिक व्यवस्थापन : शेतात पाणी अडवून ठेवावे व नंतर किडग्रस्त पिकांवरती एक दोर आडवा धरून ओढत. त्यामुळे सुरळ्या पाण्यात पडतात. नंतर शेतातील पाणी बाहेर काढावे. म्हणजे पाण्याबरोबर खाली पडलेल्या सुरळ्या वाहून जातात. त्या गोळा करून नष्ट कराव्यात. गरज भासल्यास कार्बारील 10 टक्के धुरळणीची भुकटी 25 किलो प्रती हेक्टरी धुरळावी.

लष्करी अळी (मायथिमना सेपॅराटा) : पतंग तपकिरी रंगाचा व मजबूत बांध्याचा असतो. सुरवातीस अळी हिरवट रंगाची असते व तिच्या दोन्ही बाजूस पांढरा पिवळसर पट्टा असतो. नंतर ती क्विचित करड्या रंगाची होते. पूर्ण वाढलेली अळी 30 ते 37 मिमी असते. तर पतंगाचा विस्तार 35 ते 40 मिमी असतो.

जीवनक्रम : मादी 1500 ते 2000 अंडी सहा पुंजक्यात गवताच्या किंवा भात रोपाच्या पानावर घालते. एका पुंजक्यात 150 ते 200 अंडी असतात. अंड्यातून पाच ते नऊ दिवसांनी बाहेर पडतात. अळीची वाढ 18 ते 22 दिवसात पूर्ण होते व ती जमिनीत जाऊन कोष तयार करते. कोषातून 10 ते 14 दिवसांनी पतंग बाहेर येतो आणि 20 ते 30 दिवसांत एक पिढी पूर्ण होते.

नुकसानीची पद्धत : या किडी दिवसा जमिनीत किंवा चुडामध्ये लपतात व रात्रीच्यावेळी बाहेर येतात आणि पाने खातात. पाने कडेपासून मध्ये शिरेपर्यंत खाल्ली जातात. अशा प्रकारच्या नुकसानीवरून किडीचे शेतातील अस्तित्व चटकन ओळखता येते. रोपवाटिकेत हल्ला झाल्यास जमिनीलगत रोपे कापून खाल्ली जातात आणि एकही रोप शिल्लक राहत नाही. रोपवाटिकेत सर्वत्र अळ्यांच्या विष्ठेच्या पांढरट, हिरवट साबुदाण्यासारख्या गोळ्यांचा सडा पडल्याचे दिसून येते.

लोंबीत दाणे भरल्यानंतरही या किडीचा उपद्रव होतो. रात्रीच्या वेळी अळ्या लोंब्यावर चढतात आणि लोंब्या कुरतडून खातात. अळ्या अतिशय खादाड असल्यामुळे लोंब्यांवर अधाशासारख्या तुटून पडतात. दाणे खाण्यापेक्षा लोंब्या कुरतडून टाकून त्या अतोनात नुकसान करतात. अळ्यांना लष्करासारखी सामुहिक हल्ला करण्याची सवय आहे म्हणून या किडीस लष्करी अळी असे म्हटले जाते.

एकात्मिक व्यवस्थापन : भाताची कापणी केल्यानंतर ताबडतोब शेताची नांगरट करावी. अळीचे स्थलांतर रोखण्यासाठी रोपवाटिकेभोवती किंवा शेताभोवती दोन फूट खोल चर काढून ती पाण्याने भरावी. हंगामाच्या सुरवातीस शेताच्या बांधावरील गवत काढून बांध स्वच्छ ठेवावेत.

किडींचे अंडीपुंज गोळा करून त्यांचा नायनाट करावा. भाताची लागण केलेल्या शेतात पाणी अडवून ठेवावे. त्यामुळे अळ्यांना लपायला जागा राहत नाही आणि अळ्या रोपांवरती चढतात व पुढे त्या पक्ष्यांच्या भक्षस्थानी पडतात. बेडकांचे शेतात संवर्धन व संरक्षण करावे. कारण बेडूक या किडीच्या अळया प्रती चौरस मीटर आढळल्यास सायंकाळच्या सुमारास मिथील पॅराथिऑन दोन टक्के भुकटी 25 किलो प्रती हेक्टरी धुरळावी किंवा प्रती हेक्टरी डायक्लोरोव्हॉस 76 टक्के 650 मिली/500 लिटर पाण्यातून फवारणी करावी. पीक तयार झाल्यावर कापणी ताबडतोब करावी. अन्यथा ते किडीच्या हल्ल्यास बळी पडते.

गादमाशी (ओरसिओलिया ओरायझिद्ध) : गादमाशीला लांब पाय असून ती आकाराने डासारखी असते. मादी तांबूस रंगाची असते, तर नर पिवळट करड्या रंगाचा असतो. अळी पाय विरहीत व गडद तांबूस रंगाची असते.

जीवनक्रम : मादी जवळपास 100 अंडी पानाच्या खालच्या पृष्ठभागावर घालते. अंडी 0.55 मिमी लांबीची लांबट आकाराची असतात. अंड्यातून तीन ते चार दिवसांनी अळी बाहेर पडते. ती खोडात वाढणार्‍या अंकुराजवळ पोहचते आणि कुरतडून खाते. हा अंकुर अळीभोवती नळीसारधा वाढतो. आणि नळीतच तिची 15 ते 20 दिवसांत पूर्ण वाढ होते. फुटव्याऐवजी चंदेरी पोंगे तयार झाल्यामुळे त्यास लोंबी येत नाही. पूर्ण वाढलेली अळी नळीच्या वरच्या टोकाजवळ येऊन टोकाच्या थोड्याशा खालील भागात एक लहान छिद्र पाडते व नळीतच ती कोष करते. कोषातून पाच ते आठ दिवसांनी माशी बाहेर येते व ती अळीने पाडलेल्या छिद्रातून नळीच्या बाहेर पडते. माशी एक ते तीन दिवस जगते. एक पिढी तयार होण्यास साधारणत: 19 ते 21 दिवस लागतात.

नुकसानीची पद्धत : अंड्यातून बाहेर पडलेली अळी रोपाच्या खोडात शिरून त्यामध्ये वाढणार्‍या कोवळ्या अंकुराजवळ पोहचते व अंकुर कुरतडून खाते. खातेवेळी तिच्या तोंडातून लाळ बाहेर पडते. त्या लाळेत सिसिडोजन नावाचे द्रव्य असते. सिसिडोजनची कुरतडलेल्या अंकुरावर प्रक्रिया होते. त्यामुळे अळीच्या भोवतालचा अंकुराचा भाग फुगतो व त्याची कांद्याच्या पातीसारखी नळी तयार होते. की नळी पिवळसर पांढरट किंवा चंदेरी रंगाची असते. त्यालाच नळ किंवा गाद किंवा पोंगा असे म्हटले जाते आणि त्याला लोंबी येत नाही.

एकात्मिक व्यवस्थापन : शक्यतो लागवड एकाच वेळी करावी. खतांचा संतुलित वापर करावा. बिगर हंगामात शेतात वाढणार्‍या देवधानाचा व इतर तणांचा जाळून नाश करावा. कारण या गवतावरही किड वाढते. लागवडीनंतर 20 दिवसांनी किंवा एक चंदेरी पोंगा प्रती चौरस मीटर आढळल्यास तीन टक्के दाणेदार कार्बोफ्युरॉन 16.5 किलो किंवा क्लोरोपायरीफॉस 10 टक्के दाणेदार 10 किलो किंवा 0.3 टक्के दाणेदार फिप्रोनील 25 किलो प्रती हेक्टरी जमिनीत टाकावे. किडग्रस्त रोपे किंवा चंदेरी पोंगे उपटून जाळावीत. लागवडीपूर्वी रोपाची मुळे क्लोरोपायरीफॉस (20 टक्के प्रवाही प्रती लिटर एक मिली) च्या द्रावणात 12 तास बुडवावीत किंवा वरील द्रावणात एक टक्का मिसळल्यास रोपांची मुळे तीन तास बुडवावीत.

तपकिरी तुडतुडे (निलपर्वता ल्युजियन्स) : हे तुडतुडे तपकिरी रंगाचे व त्रिकोणी पाचरीच्या आकाराचे आकाराने लहान असतात. तुडतुडे व त्यांची पिल्ले नेहमी तिरकस व भरभर चालतात आणि खोडावर ते मोठ्या संख्येने दिसून येतात.

जीवनक्रम : मादी पानाचा खालचा पृष्ठभाग खरवडून पर्णकोषात किंवा मध्य शिरेमध्ये 100 ते 200 अंडी घालते. अंडी पांढरट अथवा पारदर्शक असतात. अंड्यातून सात ते नऊ दिवसांनी लहान लहान पिल्ले बाहेर पडतात आणि खोडातील रस शोषून घेण्यास सुरवात करतात. पिलांची वाढ 10 ते 18 दिवसांत पूर्ण होते. नुकतीच जन्मलेली पिल्ले पांढरट रंगाची सर्वसाधारण 0.6 मिमी लांबीची असतात. नंतर त्याचा रंग हळूहळू तपकिरी होतो. जीवनक्रम कालावधी 16 ते 23 दिवस असतो. नर तुडतुडे 14 ते 21 तर मादी तुडतुडे 14 ते 30 दिवस जगतात.

नुकसानीची पद्धत : तुडतुडे व त्यांची पिल्ले सतत खोडातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे रोपांची पाने पिवळी पडतात. उपद्रव मोठ्या प्रमाणावर असेल तर रोपे वाळतात व जळाल्यासारखी दिसतात. शेतात ठिकठिकाणी तुडतुड्यांमुळे करपून गेलेले गोलाकार भाताच्या पिकाचे दळे दिसतात. यालाच हॉपर बर्न असे म्हणतात. अशा रोपांना लोंब्या येत नाहीत आणि आल्याच तर दाणे न भरता पोचट राहतात.

एकात्मिक व्यवस्थापन : लावणी दाट करू नये. दोन ओळीतील अंतर 20 सें.मी. आणि दोन चुडातील अंतर 15 सें.मी. ठेवावे तसेच रोपांची पट्टा पद्धतीने लागण करावी. नेहमी प्रादुर्भाव होणार्‍या शेतात नत्र खातची मात्रा वाजवी प्रमाणात द्यावी.

शेतातील पाण्याचा निचरा नियमित करावा. पाणी बदलावे. प्रत्येक चुडात पाच ते दहा तुडतुडे आढळल्यास हेक्टरी 500 लिटर पाण्यात अ‍ॅसिफेट 75 टक्के 660 ग्रॅम किंवा कार्बारिल 50 टक्के 2000 ग्रॅम किंवा डायक्लोराव्हास 76 टक्के 470 मि.ली. किंवा फिप्रोनील पाच टक्के 1000 मिली किंवा इमिडाक्लोप्रीड 17.8 टक्के 100 मिली या प्रमाणात फवारणी करावी. फवारणी करताना किटकनाशक फुटव्याच्या बुंध्यावर पडेल याची दक्षता घ्यावी. आठवड्यानंतर परत प्रादुर्भाव आढळल्यास दोन ते तीन फवारण्या द्याव्यात. किटकनाशके बदलून वापरावीत.

निळे भुंगेरे (लेप्टीस्पा पिगमिया) : प्रौढ भुंगा निमुळता, नळीसारखा लांबट व गर्द निळा असतो. एरीरावर हिरव्या रंगाची चमकणारी छटा असतो. अळी भुरकट रंगाची असते.

नुकसान : प्रौढ भुंगेरे पानाच्या वरच्या पृष्ठभागातील हरितद्रव्य खातात. अळ्या पान पोखरून आतील हरित भाग खातात. त्यामुळे पानावरती समांतर पांढर्‍या रेषा उमटतात. अनेक रेषा एकमेकांत मिसळतात व त्या ठिकाणी पांढरा चट्टा तयार होतो. किडींचा उपद्रव पीक फुटव्याच्या अवस्थेत व पसवण्यापूर्वी होतो.

सुधारित उपाय : बांधावरील तण नष्ट करावे. प्रादुर्भाव नियमित होतो. अशा ठिकाणी शेतात जास्त दिवस पाणी साचून देऊ नये. नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस 25 टक्के प्रवाही दोन लिटर किंवा ट्रायझोफॉस 40 टक्के प्रवाही 625मिली किंवा लॅमडासायहेलोथ्रिन पाच टक्के प्रवाही 250 मिली. 500 लिटर/हेक्टर करावे.

डॉ. एस. के. गोडसे, डॉ. ए. एल. नरंगलकर कृषी किटकशास्त्र विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, मोबा. 9423804578

Click to rate this post!
[Total: 3 Average: 3.3]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here