गवार हे उष्ण हवामानातील पीक असून, सरासरी १८ ते ३० अंश सेल्सिअस तापमानास हे पीक उत्तम येते. गवारीची लागवड खरीप आणि उन्हाळी अशी दोन्ही हंगामात केली जाते. उन्हाळी पीक शेंग भाजीसाठी घेतात. दक्षिण महाराष्ट्रातील ज्या ठिकाणी तापमान ४० डिग्री सेल्सिअस पेक्षा अधिक आहे; अशा ठिकाणी गवार ‘बी’ उत्पादनात भरपूर वाव आहे.
गवारीच्या शेंगामध्ये फॉस्फरस, चुना, लोह इत्यादी खनिजे आणि ‘अ’, ‘ब’, ‘क’ जीवनसत्वे बर्याच प्रमाणात असतात. त्यामुळे आहारदृष्ट्या गवार अतिशय लोकप्रिय भाजी आहे. त्यामुळे बाजारात गवारीच्या शेंगांना चांगलीच मागणी असते.

हवामान व जमीन : पाण्याचा निचरा उत्तम असलेली पोयट्याची जमीन गवारीला चांगली मानवते. हलक्या जमिनीत गवारीचे पीक खुरटे राहते. शेंग लवकर लागताच व उत्पन्नही चांगले मिळते. भारी जमिनीत गवार हमखास चांगली येते. जमिनीचा सामू ७.५ ते ८ च्या दरम्यान असल्यास पिकाची वाढ उत्तम होते.
अंतरमशागत : गवारीच्या लागवडीपूर्वी लोखंडी नांगराने जमीन १५ ते २० सें. मी. खोल नांगरून प्रति हेक्टर १२ ते १३ टन कुजलेले शेणखत टाकूण ते जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. कुळवाच्या आडव्या उभ्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी. काडीकचरा, धसकटे वगैरे वेचून घेऊन जमीन साफ करून पिकाची लागवड सर्या वरंब्यावर करावी.
लागवडीचा हंगाम : आपल्या हवामानात गवारीची लागवड जवळजवळ वर्षभर (हिवाळ्याचे एक ते दोन महिने सोडून) करता येते. उन्हाळी पिकांची लागवड जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात दोन ते तीन हप्त्यात करतात. गवारीची लागवड ‘बी’ टोकून किंवा पेरून करतात. उगवण चांगली होण्यासाठी बियाणे पेरणीपूर्वी दोन तास भिजवून सावलीत सुकवून नंतर पेरावे.
लागवडीचे अंतर : जमिनीची प्रत व हवामानानुसार दोन ओळीतील अंतर ४५ ते ६० सें. मी. ठेवावे आणि झाडातील अंतर २० ते ३० सें. मी. ठेवावे. काही शेतकरी ४५ सें. मी. पाभारणे ‘बी’ पेरून नंतर सारा यंत्राने सारे पडतात. किंवा ४५ X ६० सें. मी. अंतरावर सर्या पडून सरीच्या दोन्ही बाजून दोन झाडातील अंतर १५ ते २० सें. मी. राहील या अंतरावर दोन बिया टाकतात.
बियांचे प्रमाण व बिजप्रक्रिया : हेक्टरी १४ ते २४ किलो ‘बी’ लागवडीस पुरेसे होते. पेरणीपूर्वी १० ते १५ किलो बियाण्यास २५० ग्रॅम रायझोबियम चोळावे. त्यामुळे मुळांवरील नत्र ग्रंथीची वाढ होऊन पिकास व जमिनीस उपयुक्त ठरते.

सुधारित वाण : महाराष्ट्रात देशी (सु. १.८ मीटर उंच) सोटीया (सु. २.४ मीटर) व विदेशी (सु. १.३-१.५ मीटर) असे तीन प्रकार मानण्यात येतात. विदेशी प्रकार शेंगाकरिता, सोटीया हिरवळीच्या खतासाठी व शेंगांसाठी आणि देशी मुख्यत्वे बियांसाठी कोरडवाहू पीक म्हणून लावतात.
गवारीचे विविध वाण
पुसा सदाबहार : ही सरळ व उंच वाढणारी जात असून, उन्हाळी व खरीप हंगामासाठी शिफारस केलेली आहे. या जातीच्या शेंगा 12 ते १५ सें. मी. लांब असून, शेंगा हिरव्या रंगाच्या असतात. शेंगाची काढणी ४५ ते ५५ दिवसांनी सुरू होते.
पुसा नवबहार : ही जात उन्हाळी व खरीप या दोन्ही हंगामात चांगले उत्पादन देते. शेंगा १५ सें. मी. लांब कोवळ्या हिरव्या रंगाच्या असतात. झाडांची सरळ वाढ होते. पानाच्या बोचक्यात शेंगाचा घोस असतो.
सुरती गवार : झाडास फांद्या अधिक असतात. ऑक्टोबरनंतर व उन्हाळ्यात घेतली जात असून तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चालते. शेंगा जास्त पातळ, लांब, जाडसर व फताडी असून अधिक गुळचट व उभी लव असते. गुच्छ लागत नाहीत.
देशी (गावरान ) गवार : पुसा जातीचे शोध लागण्या अगोदर ४० वर्षापूर्वी गावोगाव देशी गवारीचे ‘बी’ प्रचलित होते. ही गवार आखूड, निबर, बीजयुक्त, केसाळ खाजविणारी परंतु चविष्ट असून, खेडेगावांमध्ये चवीने खाल्ली जाते. सोलापूरसारख्या जिल्ह्यामधील खेड्यात व शहरात या गवारीला खूप मागणी आहे.
नंदिनी (एनसीबी 12) : ही संकरीत जात असून, निर्मल सिडस् कंपनीची गावारण गवारीसारखी जात आहे. याच्या शेंगा आखूड व कोवळ्या, मऊ असतात. विशेषत: याची चव चांगली असल्याने याला बाजारात चांगलीच मागणी असते. झाड लहान असल्यापासून पानाच्या बोचक्यात भरपूर शेंगा येतात. ही जात रोगप्रतिकारक्षम असल्याने व्यापारी लागवडीसाठी फायद्याची ठरते.
खते व पाणी व्यवस्थापन : गवार हे कोरडवाहू पीक घेतल्यास खताची फारशी गरज भासत नाही. या पिकाला हेक्टरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश द्यावे. लागवडीच्या वेळी नत्राची अर्धी मात्रा आणि स्फुरद व पालाशाची संपूर्ण मात्रा द्यावी. नत्राचा राहिलेला अर्धा हप्ता पेरणीनंतर तीन आठवड्यांनी द्यावा. पावसाळी पिकाला पाणी देण्याची गरज पडत नाही. उन्हाळी पिकाला लागवड केल्याबरोबर पाणी देऊन नंतर पुढे आठ ते दहा दिवसांच्या अंतराने एकूण १२ ते १४ पाण्याचा पाळ्या द्याव्या लागतात.
गवरीवरील कीड व रोग
मावा व तुडतुडे : या किडीच्या नियंत्रणासाठी पिकावर डायमेथोएट ३० ईसीक १.५ मिली किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ डब्ल्यूसी किंवा मिथिलडिमेटॉन २५ ईसी दोन मिली प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे.
भुरी : हा बुरशीजन्य रोग असून, पानाच्या दोन्ही बाजूवर कळपात डागांनी होऊन नंतर संपूर्ण पान पांढरे होते. हा रोग खोड आणि शेंगावरही पसरतो. याच्या नियंत्रणासाठी ५० % ताम्रयुक्त औषध कॉपर ऑक्झीक्लोराईड २५ ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळून आठ ते दहा दिवसांच्या अंतराने तीन ते चार फवारण्या कराव्यात.
मर : हा बुरशीजन्य रोग असून, या रोगाची लागण झालेले झाड कोलमडून जाते. प्रथमत: झाड पिवळे पडते व बुंध्याजवळ अशक्त बनते. याच्या नियंत्रणासाठी बियाणास प्रति किलो चार ग्रॅम थायरम चोळावे. रोगट झाडाभोवती बांगडी पद्धतीने तम्ब्रयुक्त औषधाचे द्रावण आठ ते दहा सें.मी. खोल माती भिजेल असे ओतावे.
काढणी व उत्पादन : लागवडी पासून दोन महिन्यांनी शेंगा काढण्यास सुरूवात होऊन आठवड्यातून दोनदा गवार तोडणीस येते. गुच्छ लागणार्या शेंगामध्ये बारीक शेंगाचे प्रमाण अधिक येते. सर्व शेंगा एकाच वेळी तोडणीस येत नाहीत. तयार शेंगांचीच तोडणी करावी लागते. हे काम पुढे आठ ते दहा आठवडे चालू राहते. या अवधीत एकूण १६ ते २० तोंडे मिळतात. सर्व साधारणपणे हिरव्या शेंगांचे हेक्टरी उत्पन्न ६० ते ७५ क्विंटलपर्यंत येते.
बी. बी. तांबोळकर कृषी महाविद्यालय, लातूर.
ए. एस. लोहकरे उद्यान उद्या, कृषी महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यालय परभणी.