पर्यटनामध्ये नव्या संकल्पना यशस्वी ठरल्या असून, आता पर्यटनामध्ये धार्मिक, सांस्कृतिक, जंगल, वनौषधी, गिर्यारोहन, साहसी, निसर्गोपचार अशा अनेक संकल्पनांचा समावेश होत आहे. याच प्रमाणे नव्या संकल्पनेतून आलेला व ग्रामीण संस्कृतीला आधार देणारा ‘कृषी पर्यटन’ हा व्यवसाय नक्कीच उद्या भारतीय अर्थव्यवस्थेला हातभार लावणार आहे; यात शंका नाही ! यातूनच समृद्ध ग्रामीण भारत साकारण्याचे स्वप्न नक्कीच साक्षात उतरणारेल ! मात्र यासाठी गरज आहे ती, फक्त योग्य बोध घेण्याची…! नाविन्य शोधाची…! आणि सकारात्मक कृतीचे एक पाऊल पुढे टाकण्याची…!
16 मे जागतिक कृषी पर्यटन दिन ! संयुक्त राष्ट्राच्या ‘जागतिक पर्यटन संघटने’कडून मान्यता मिळाल्याने 2009 पासून हा दिवस जागतिक कृषी पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कृषी पर्यटन व्यवसाय चालू करण्यासाठी खूप मोठी संधी आहे. कारण प्रत्येक गावांची एक वेगळी अशी अंगभूत ओळख असते. स्थळानुसार प्रत्येक ठिकाणचे नैसर्गिक वातावरणात बदल होत असतो. तसेच ठिकाणानुसार व हवामानानुसार पिकाची विविधताही बदलत असते. प्रत्येक ठिकाणचा विविध क्षेत्रातील पर्यटन वारसा, सांस्कृतिक सण, उत्सव अशा प्रकारच्या विविध जमेच्या बाजू कृषी पर्यटन व्यवसायासाठी पोषक आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत जवळपास 45 टक्क्याहून अधिक असणार्या शहरवासीयांना ग्रामीण व कृषी उद्योजकांना पर्यटन व्यवसाय चालू करण्याची नामी संधी प्राप्त झालेली आहे.
कृषी पर्यटन व्यवसायाबाबतची सखोल माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाचे कृषी खाते, कृषी विद्यापीठे, कृषी सलग्न शासकीय व बिगर शासकीय संस्था यासाठी चांगली मदत करू शकतात. या बरोबरच शासनाचे पर्यटन महामंडळ, एम.टी.डी.सी. यासारख्या संस्थांची भूमिकाही महत्त्वाची आहे. शासनाचे उदात्त धोरण व बँकांची सहानुभूती निश्चितच या व्यवसायाच्या भरभराटीस कारणीभूत ठरणार आहे.
‘पर्यटन’ हा काही देशांचा मुख्य व्यवसायच झालेला आहे. या व्यवसायाने त्या देशानी आपली अर्थव्यवस्थाच बळकट केली आहे; असे नाही तर कुशल, अकुशल व बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला आहे. कारण आता पारंपरिक पर्यटनाची संकल्पना बदलून पर्यटनला व्यवसायीय स्वरूप येत आहे. पर्यटनामध्ये नव्या संकल्पना यशस्वी ठरल्या असून, आता पर्यटनामध्ये धार्मिक, सांस्कृतिक, जंगल, वनौषधी, गिर्यारोहन, साहसी, निसर्गोपचार अशा अनेक संकल्पनांचा समावेश होत आहे. याच प्रमाणे नव्या संकल्पनेतून आलेला व ग्रामीण संस्कृतीला आधार देणारा ‘कृषी पर्यटन’ हा व्यवसाय नक्कीच उद्या भारतीय अर्थव्यवस्थेला हातभार लावणार आहे; यात शंका नाही !
खेड्याकडे चला : शहरी लोकांना ग्रामीण संस्कृतीच्या पडलेला विसर पडला असून, त्यांना वेळीच सावध करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा लोकांना सावध करण्याचे कामच कृषी पर्यटन करणार असून, आपल्या पूर्वजांनी जमलेल्या ग्रामीण कृषी संस्कृतीचे दर्शन यांना या माध्यमातून करून देणार आहे. खऱ्या अर्थाने अशा जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठीच कृषी पर्यटनाची गरज वाटते. अशाच काहीशा अर्थाने खेड्याकडे चला… हा सल्ला राष्ट्रपीता महात्मा गांधी यांनी दिला नसेल ?
आदर्श कृषी पर्यटनचे सूत्र : आदर्श कृषी पर्यटन स्थळावर राहण्याची उत्तम व्यवस्था असावी. कृषी पर्यटन स्थळावरील फार्महाऊस निटनेटके असावा विशेषत: तो आरामदायी असावा. राहण्यायोग्य कमीत कमी सुविधा असाव्यात. पाण्याची पुरेसी सोय असावी. कृषी पर्यटन स्थळावर झाडांची लागवड मोठ्या प्रमाणावर असावी. तेथील वातावरण नैसर्गिक असावे. स्वयंपाकाची सुविधा असावी. कृषी पर्यटन स्थळावर प्रथमोपचाराची सुविधा असावी. कृषी पर्यटन स्थळावर विहीर, पोहण्याचा तलाव अथवा तळे असावे. त्यामध्ये मत्स्यपालन केलेले असावे. कृषी पर्यटन स्थळावर बैलगाडी, जनावरे, त्यांचे गोठे इत्यादी सुविधा असाव्यात. शेळी फार्म, इमूपालन, रेशीमउत्पादन, हरीतगृह यांसारख्या सुविधा असाव्यात. जेवणासाठी महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण असावे. त्यामध्ये सकाळी नाष्टा दुपारी जेवण व रात्रीचे जेवण यांचा समावेश असावा. कृषी पर्यटन स्थळावर अशाप्रकारच्या सेवासुविधा असाव्यात की, जेणेकरून पर्यटक त्या पाहतील व त्यामध्ये सहभागी होऊन त्याचा आनंदही लुटतील.
कृषी पर्यटन स्थळावर ग्रामीण खेळांची सुविधा असावी. आलेल्या पर्यटकांना ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देण्यात यावी. यामध्ये ग्रामीण वेशभुषा, कला, हस्तकला, सण, उत्सव, ग्रामीण रूढी, परंपरा यांचे दर्शन घडून द्यावे. त्यांना यामध्ये प्रत्यक्ष सहभागी करून घ्यावे. त्याची थोडीशी सवय त्यांना करून दाखवावी. पर्यटकांसाठी बैलगाडीतून सफर घडून आणावी. घोड्यावरून फेरफटका मारण्याची सुविधा असावी. पाण्यामध्ये मासेमारी करण्याची संधी त्यांना प्राप्त करून द्यावी. शेतावर फेरफटका मारत असताना शेतावरील फळे, मक्याची कणसे, भुईमूगाच्या शेंगा, ऊस आणि इतर खूपकाही रानमेवा त्यांना शेतावर उपलब्ध करून द्यावा. त्यांना ग्रामीण भागातील प्राण्यांची पक्षांची, ओळख करून द्यावी. पाण्याचे झरे, धबधबे अशा नैसर्गिक गोष्टी त्यांना पाहण्यासाठी उपलब्ध करून द्याव्यात. पर्यटकांना तेथे सुरक्षीतता वाटेल असे नैसर्गिक वातावरण निर्माण करावे. जवळच दवाखान्याची सुविधा असावी. सायंकाळी जेवणानंतर मनोरंजनाचे कार्यक्रम असावेत. त्यामध्ये शेकोटी डान्स, भजन, कीर्तन, लेझीमपथक, धनगरी ओव्या यांचा समावेश असावा. अशा कार्यक्रमातून पर्यटकांना लोककलेची ओळख होईल अशा कार्यक्रमाचे आयोजन करावे. पर्यटकांना जाताना आठवण म्हणून कृषी पर्यटन स्थळावर खरेदी करण्यासाठी विविध स्टॅाल असावेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील स्थानिक कलावंतानी तयार केलेल्या विविध वस्तू विक्रीसाठी ठेवता येतील. या मुळे कृषी पर्यटनाजवळील स्थानिक लोकांना काहीतरी उद्योग निर्माण होईल; त्यातून त्यांचे अर्थाजन चालेल. याचाही विचार करावा.
कृषी पर्यटन स्थळावर फळझाडांची मोठ्याप्रमाणावर लागवड असावी. जेणेकरून आलेल्या पर्यटकांना विशेषत: लहान मुलांना त्यातून अभ्यासाचे अनेक धडे शिकता येतील. शेतावर तयार झालेली फळे ग्राहकांपर्यंत कशाप्रकारे पोहचविली जातात, याची जाणीव त्यांना होईल. कृषी पर्यटन स्थळावर जनावरांचा एखादा गोठा असावा. त्यातून आलेल्या पर्यटकांना दुग्ध उत्पादनापासून त्यांचे विविध पदार्थ कसे तयार होतात, ते ग्राहकांपर्यंत कसे पोहचतात, दरम्यान त्यावर कशाप्रकारे प्रक्रिया केली जाते याची माहिती सांगणारे पोस्टर्स तेथे लावावीत. की ज्यामधून त्यांना दुग्धव्यावसायाचे ज्ञान प्राप्त होईल. गायीप्रमाणे कृषी पर्यटन स्थळावर शेळ्या, मेंढ्या यांचेही गोठे असावेत. रेशीम उत्पादनासाठी तुतीच्या किड्यांच्या संगोपन करून तुतीच्या झाडाची लागवड करावी व त्याचे प्रात्यक्षिक येणार्या पर्यटकांना दाखवावे. शेतावर एखाद्या ठिकाणी वनऔषधी वनस्पतीची लागवड करून त्या संग्रहित कराव्यात व आयुर्वेदातील त्याचे उपयोग पर्यटकांना सांगावेत. शेतावर विविध फळे, भाजीपाला यांची लागवड करावी व त्या अंतर्गत पीक उत्पादनाचे विविध प्रयोग पर्यटकांना दाखवावे. सिंचनाच्या विविध पद्धतीचा वापर करून त्यामध्ये ठिबक, तुषार व धुके तयार करणार्या नवतंत्राचा अथवा फॉगर्सचा वापर करावा व त्याचे प्रात्यक्षिक पर्यटकांना करून दाखवावे. विविध जातींच्या मातृवृक्षापासून तयार केलेल्या रोपांची एखादी रोपवाटिका तयार करून चांगल्या प्रतिची रोपे कशी तयार करतात याचे ज्ञान पर्यटकांना करून द्यावे. ऊसाच्या शेताजवळ एखादी रसवंती उभारून ताजा रस पर्यटकांना उपलब्ध करून द्यावा. अथवा ऊसाचे तुकडे करून खाण्यास द्यावेत. यातून पर्यटकांना खरा आनंद प्राप्त होतो. शेतावर विविध ग्रामीण खेळांचे आयोजन करावे. त्यामध्ये विटीदांडू, गोट्या, भवरा, बैलगाडी, टॅक्ट्रर यांची सफर यांसारख्या असंख्य गोष्टींचा समावेश कृषी पर्यटन स्थळावर करावा. मधुमक्षीका पालनाचे प्रात्यक्षिक पर्यटकांना दाखवावे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा शेतावर उपलब्ध असाव्यात. शेतावर विजेच्या वापरशिवाय, सोलार, वायुविजन, बायोगॅस यांचा समावेश असावा. शेतावर उभारलेल्या विविध स्टॉलमधून पर्यटकांना हस्तकलेचे विविध नमुने, चिखलापासून बनविलेल्या विविध वस्तू, लोणची, पापड, दुग्धजन्य पदार्थ, गुळ, काकवी, फळे, फुले, भाजीपाला व अन्नधान्याचे विविध प्रकार, रोपवाटिकेत तयार केलेली विविध रूपे यांचा समावेश असावा. यातून त्यांना खरेदीचा मनमुराद आनंद घेता येईल.
यामध्ये शेतावर चालणार्या दैनंदिन कार्यक्रमाचे दर्शन पर्यटकांना घडून द्यावे. शेतावर असणार्या विविध जनावरांना चारा घालणे, पाणी पाजणे. शेतावर शिवार फेरी घेऊन विविध फळझाडे, फुले, भाजीपाला लागवडीची माहिती मुलांना करून देणे. शेतावर तयार झालेल्या विविध फळभाज्या, पालेभाज्या, फळे, फुले यांची काढणी करणे व या कामात प्रत्यक्ष पर्यटकांना समाविष्ट करून घेणे. ग्रामीण भागातील जत्रा, मेळावे, उत्सव यामध्ये त्यांना समाविष्ट करून घेणे. यासाठी आठवडे बाजारचाही मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकतो. शेतकरी बाजार किंवा तालुक्याच्या ठिकाणी असणारा बाजार यातून एखादा फेरफटका मारून त्यांना विविध गोष्टींची खरेदी करण्याची संधी प्राप्त करून द्यावी. ग्रामीण भागात असणार्या विविध मंदिरांचे दर्शन त्यांना घडून द्यावे. त्यातून त्यांचे मनोरंजन तर होईलच परंतु त्यांना अनेक गोष्टींचे शिक्षणही मिळते.
संदर्भ : शेतीमित्र मासिक (कृषी पर्यटन विशेषांक)
शेतीमित्र मासिक आता.. शेतकऱ्यांच्या मोबाईलवर ! #शेतीविषयक आधुनिक माहिती वेळोवेळी मिळविण्यासाठी #shetimitramagazine चे फेसबुक पेज लाईक करा !