महाराष्ट्रातील २०२०-२१ चा १४० दिवसांचा ऊस गाळप हंगाम संपला असून, राज्यातील एकूण १८९ साखर कारखान्याद्वारे १०१२ लाख टन यावर्षी गाळप झाले आहे. राज्याची गाळप क्षमता ७६ हजार टनानं वाढली आहे. मागील वर्षी महाराष्ट्रात ३६ लाख टन शिल्लक होती. यावर्षी १०६ लाख साखरेचे उत्पन्न झाले असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत दिली.
इथेनॉल निर्मितीत महाराष्ट्रचा देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगून, गायकवाड म्हणाले, राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ९३ टक्के एफआरपी पेमेंट करण्यात आले आहे. राज्यातील १९ साखर कारखान्यांनी तैवानला ऑक्सिजन प्लॅन्टची ऑर्डर दिली आहे, लवकरच ते बसवले जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
गेल्या पाच वर्षात इथोनॉलच उत्पन्न झाले नाही तेवढे उत्पन्न यावर्षी झाले असल्याचे सांगून, गायकवाड यांनी इथेनॉल निर्मितीमध्ये महाराष्ट्र पहिल्या स्थानावर असल्याची संगितले. तसेच महाराष्ट्रातील एकूण २९ कारखान्यांवर थकित एफआरपी प्रकरणी कारवाई केली आहे. तर, दुसरीकडे थकीत एफआरपीप्रकरणी अजून १० कारखान्यावर लवकरच कारवाई केली जाणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यंदा सर्वाधिक गाळप कोल्हापूर विभागात झाले असून साखरेच्या सरासरी उताऱ्याचे प्रमाण १२ टक्के इतके आहे. तर, पुणे विभाग ऊस गाळपात दुसऱ्या क्रमांकावर असून सरासरी साखर उतारा १०.९७ टक्के इतका आहे. तर सर्वात कमी उतारा नागपूर विभागात राहिला आहे. २०२०-२१ चा गाळप हंगाम हा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरु झाला. राज्यातील शेतकऱ्यांची मेहनत, साखर कारखान्यांची यंत्रणा याद्वारे राज्यामध्ये कोरोनाचं संकट असतानाही विक्रमी गाळप झाले. महाराष्ट्र हे साखर उत्पादनातील अग्रेसर राज्य बनले असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असल्याचे त्यांनी यावेळी संगितले.