महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या प्रयत्नामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात चालेल असा द्राक्षाचा नवीन वाण विसकित करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी लक्षात घेवून गेल्या तीन ते चार वर्षापासून पुण्यातील मांजरी फार्मवरील प्रयोगशाळेत या वाणाच्या संशोधनाचे काम सुरू होते. लाल रंग, मधुर व सुवासिक चव, चांगले वजन आणि मजबूत आवरण असे या नवीन वाणाची वैशिष्ट्ये आहेत.
हे वाचा : कणेरी मठ येथे सोमवारपासून पंचमहाभूत लोकोत्सव
राज्यातील विविध भागात, वेगवेगळ्या भौगोलिक आणि वातावरण परिस्थितीत या वाणाची चाचणी व्हावी, या उद्देशाने मांजरी फार्म येथील प्रयोगशाळेसोबतच बागाईतदार संघातील प्रयोगशील शेतकरी भारत शिंदे (अध्यक्ष, पुणे विभाग), अभिषेक कांचन (उरुळी कांचन) आणि अशोक गायकवाड (नाशिक) यांना चाचणी आणि अभ्यासासाठी नव्या वाणाची काही रोपे देण्यात आली होती. सध्याच्या चालू हंगामात या नव्या वाणाच्या बागा काढणीला आल्या आहेत. विशेष म्हणजे, त्याच्याकडून या वाणाबाबत समाधानकारक अभिप्राय प्राप्त झाले आहेत. या चाचणी दरम्यान प्राप्त झालेल्या अभिप्राय आणि सूचनांचा अभ्यास करून या वाणात अजून काही सुधारणांची शक्यता तपासली जाणार आहे.
देशात द्राक्ष निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक असून, आकर्षक रंग आणि मधुर चवीच्या द्राक्षांना युरोप, चीन, मध्य-पूर्व आशियासह जगभरात मोठी मागणी असते. भारतातील एकूण द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा 98 टक्के आहे. या सुधारित वाणांच्या लागवडीनंतर महाराष्ट्रातील निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात भरघोस वाढ होईल, असा विश्वास महाराष्ट्र द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पवार यांनी व्यक्त केला आहे.
ब्रेकिंग : स्वाभिमानीचे 22 पासून राज्यभर चक्का जाम !
महाराष्ट्र द्राक्ष बागाईतदार संघ सातत्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक हितासाठी नवनवीन संशोधनांना पाठबळ देत आहे. तसेच अधिकाधिक सक्षम, निरोगी आणि उत्पादनक्षम द्राक्ष वाणांच्या विकासनासाठी जागरूकपणे कार्य करत आहे. आता नव्याने विकसित करण्यात आलेले वाण हे सध्याच्या क्रिमसन जातीपेक्षाही सुधारित आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक बाजारपेठेत या नव्या सुगंधी वाणाला चांगला दर मिळणार असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
या नवीन सुगंधी द्राक्ष वाणाचे नामकरण करुन लवकरच हा द्राक्ष वाण बागाईतदारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात मोठी वाढ होणार असून, त्यातून द्राक्ष बागाईतदारांना मोठा आर्थिक लाभ होणार असल्याचे मध्यवर्ती विज्ञान समिती महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत लांडगे यांनी सांगितले.
मोठी बातमी : कलिंगडाच्या दरात मोठी घसरण
प्रयोगशील शेतकरी अभिषेक कांचन या नव्या वाणाबाबत बोलताना म्हणाले, गेल्या चार वर्षांपासून या वाणाची काही रोपे आमच्या प्लॉटवर चाचणीसाठी आणली होती. आता झाडांची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्याला चांगली फळधारणा झाली आहे. या नव्या वाणाची जनुकीय चाचणी केली असता ती क्रीमसन वाणाशी काही अंशी साधर्म्य साधणारी आहे. द्राक्षांचा आकार, वजन आणि रंग इतर वाणापेक्षा सरस असून फळ अधिक मधुर आणि सुवासिक (अरोमॅटिक) आहे. द्राक्षाचे आवरण मजबूत असून अवकाळी पावसाचा मारा सहजपणे सहन करू शकते. सदर झाडांना वाढीसाठी आवश्यक हार्मोन्सची गरज अत्यंत मर्यादित असून, महाराष्ट्राच्या सर्व भागांत या वाणाचे उत्पादन घेता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
हे नक्की वाचा : PM किसान योजनेच्या रकमेत वाढ होणार का ?
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1