भारतातील गीर गोवंश वाढवून ब्राझीलने धवल क्रांती घडवून आणली. याच धर्तीवर महाराष्ट्रात १२ लीटर दूध देणारी सानेन शेळी आणून त्यावर संशोधन करुन धवल क्रांतीची क्रांतिकारी वाटचाल करण्याचा मानस आहे, अशी माहीत राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात दिली.
ते म्हणाले, शेळ्यांचे दुध आरोग्यासाठी लाभदायक असले तरी शेळी मात्र अर्धा लिटरपेक्षा कमीच दूध देते. त्यामुळे व्यावसायिक पातळीवर शेळीच्या दुधाची विक्री आणि शेळी पाळण्याचा खर्च मेळ खात नाही. असे असले तरीही शेळीच्या दुधाला बाजारात चांगलीच मागणी आहे. परंतु आपल्याकडे तेवढे दूध पुरविण्याची क्षमता नाही. देशातील शेळ्यांच्या दुधाच्या उत्पादनात राज्याचा वाटा केवळ ४.०६ टक्के आहे. शेळीच्या दुधाची एक लिटर किंमत ७०० रुपयांपेक्षा अधिक असल्याचे केदार यांनी सांगितले.
दूध उत्पादनात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. आणखी उत्पादन वाढविण्यासाठी शासन नवनवीन प्रयोग करत आहे. यासाठी शेळी संवर्धनावर भर देण्यात येत आहे. कॅनडामध्ये सानेन नावाच्या शेळीची एक नवीन जात विकसीत आहे. ही शेळी दिवसाला १२ लिटर दूध देते. यामुळे राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना ही शेळी फायद्याची ठरणार आहे.
रोममधील जागतिक अन्न आणि शेती संस्थेच्या अहवालानुसार जगातील ४९ टक्के लोक शेळीचं दूध पितात. शेळीचं दूध औषधी आहे. शिवाय ८० टक्के भारतीय शेतकऱ्यांचं उपन्न कमी असल्यानं त्यांच्या आहारातच दूध नसतं. अशा शेतकऱ्यांनी जर शेळीपालन केलं तर त्यांच्या मुलांना दूध मिळू शकतं. शेळीपासून पैदास होणाऱ्या बोकडविक्रीच्या हेतूनं शेळीपालन हे फायदेशीर ठरताना दिसतं. त्यातच सानेन या जातीची शेळी जर घेतली, तर गावठी शेळ्यांच्या तुलनेत या शेळ्या अधिक दूध देतात. २६० दिवसांत या सानेन जातीची संकरीत शेळी ३२० लिटर दूध देते. शिवाय तिचा भाकड काळ हा केवळ १०५ दिवसांचा आहे.
सानेन जातीची शेळी दिवसाला ५ ते १२ लिटर दूध देते. शेळीच्या दुधापासून दुग्धजन्य पदार्थ तयार करून शेतकऱ्यांच्या आर्थिक कमाईत भर टाकण्याचा राज्य सरकारचा विचार असून, युरोपमधून या शेळ्या खरेदी केल्या जाणार आहेत. पशु, दुग्ध व मत्स्य विभागांतर्गत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळातर्फे हा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. सानेन जातीच्या शेळ्यांचे मूळ स्वित्झर्लंड असले तरी आता युरोप, अमेरिकेपासून अफगाणिस्तानातही शेतकरी या शेळ्या मोठ्या प्रमाणात पाळतात. महामंडळामार्फत २० शेळा आणि दोन बोकड खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे.
राज्यात पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा विभागाच्या संशोधनासाठी या शेळ्या ठेवल्या जाणार आहेत. वेगवेगळ्या हवामानात त्या कशा जुळवून घेतात, या विषयीचा अभ्यास करून काही काळानंतर त्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या शेळीची किंमत दीड लाखापासून सहा लाखापर्यंत आहे. दरम्यान, यासंदर्भात पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केंद्रीय बकरी अनुसंधान संस्थान, मथुरा येथे भेट देवून राज्य सरकार सानेन जातीच्या शेळ्या तसेच त्यांच्यासंदर्भात सुरू असलेल्या विविध प्रयोगाची माहिती घेतली आहे.
रेन संस्थेकडून ‘सानेन’चा प्रसार
पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील रेन या संस्थेने ‘सानेन’ जातीच्या शेळीचा मोठ्या प्रमाणात प्रसार केला. या अशासकीय संस्थेनं दुर्बल घटकांतील शेतकऱ्यांचा विकास हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करण्यास सुरुवात केली. राज्यात शेळीपालन मोठ्या प्रमाणात केलं जाते. कमीत कमी खर्चात, कमी जागेत आणि कमी कष्टात होणारे शेळीपालन हे आजही अनेक शेतकरी कुटुंबांचा आधार आहे. गावठी शेळ्या अगदी कमी प्रमाणात दूध देत असल्यानं रेन संस्थेनं इंग्लंडमधल्या सानेन जातीच्या शेळ्या १९७५ साली आणल्या आणि दुर्बल घटकांतील शेतकऱ्यांना दिल्या. याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना झाला असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदतीचा हात देण्याकरिता ‘सानेन’ जातीची शेळी वरदान ठरली आहे.
सानेन जातीच्या शेळीची चारा-पाण्याची गरज ही गाईच्या तुलनेत एक पंचमांश एवढी आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे गाईंचा गोठा असेल, तर या गाईंच्या उरलेल्या चाऱ्यावरही शेळीपालन सहज शक्य आहे. त्यासाठी वेगळा पगारी माणूस ठेवण्याची गरज नाही. शिवाय अधिक जागा लागत नाही. शेळी प्रकृतीने काटक असल्याने कोणत्याही हवामानात राहू शकते. रोगराईचे प्रमाण कमी आहे. शिवाय शेळी ही खुराकाचे जास्तीत जास्त दुधात रूपांतर करते.
सानेन जातीच्या शेळीचा गाभण काळ फक्त पाच महिन्यांचा असतो. त्यामुळे पाच ते सहा वेते सहज मिळू शकतात. शेळीपासून एका वेतात कधी दोन, तर कधी तीन करडे मिळतात. तीन वेतात पाच करडे मिळू शकतात. इतर गावठी शेळ्यांच्या तुलनेत गाभण राहण्याचे या जातीचे प्रमाणही अधिक आहे. या जातीच्या बोकडाच्या मांसाची मागणीही अधिक आहे.