कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन दुधात्पादक शेतकऱ्यांच्या दुधाचे भाव पाडल्याने राज्यभरातील दूध संघाच्या विरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केलेल्या आंदोलनाला राज्यभरातून जोरदार प्रतिसाद मिळाला.
तब्बल २१ जिल्ह्यांमध्ये दूध व इतर शेतकरी प्रश्नांसाठी आंदोलन करण्यात आले. तर आंदोलन जवळजवळ १५ जिल्ह्यांमध्ये संबंधित तहसील कार्यालयावर मोर्चा काढून व निवेदन देण्यात आले.
या बाबतीत दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या काळात मागणी घटल्याचा उगीच बाऊ करत, ज्या खासगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर पाडले त्या सर्व दूध संघांचे ऑडिट करावे, प्रत्यक्षात दुधाची मागणी किती घटली होती व त्या प्रमाणात किती दर कमी देण्यात आले, याबाबत संपूर्ण चौकशी करावी या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांची लूटमार करणाऱ्या खाजगी व सहकारी दूध संघावर कठोरातील कठोर कारवाई करावी व केलेली लूटमार वसूल करून ती शेतकऱ्यांना परत करावी. तसेच लॉकडाउनच्या अगोदर बसलेला प्रति लिटर ३५ रुपये दर तातडीने सुरु करावा. आगामी काळात दूध उत्पादकांची लूटमार करता येणार नाही, यासाठी खाजगी व सहकारी दूध संघांना लागू होईल असा ‘लूटमार विरोधी कायदा’ करावा. साखर व्यवसायाप्रमाणे दूध व्यवसायाला किमान आधार भावासाठी एफआरपी व शिल्लक मिळकतीत हक्काचा वाट यासाठी रेव्हेन्यू शेअरींग असे कायदेशीर दुहेरी संरक्षण लागू करावे. अनिष्ट ‘ब्रँडवार’ रोखण्यासाठी ‘एक राज्य एक ब्रँड’ धोरण स्वीकारावे. दूध भेसळ बंद करावी. भेसळ विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करून ग्राहकांना शुद्ध दूध रास्त दरात उपलब्ध होईल याची कायदेशीर हमी द्यावी, आदी प्रमुख मागण्या या आंदोलना प्रसंगी करण्यात आल्या.
अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, पुणे, ठाणे, बीड, वर्धा, यवतमाळ, नासिक, बुलढाणा, सोलापूर, नांदेड, औरंगाबादसह राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अंबड व कोतुळ परिसरातील शेतकऱ्यांनी दूध संकलन केंद्रावर तीव्र निदर्शने करत सरकारला दुधाचा अभिषेक घातला.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा