मराठवाड्यात यंदाही सोयाबीन आणि कापसाच्या पिकावर गोगलगायीचा प्रदूर्भाव झाला आहे.
याबाबत शेतकऱ्यांकडून तक्रारी आल्याने राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काल स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.
मागील वर्षीप्रमाणे यंदाही मराठवाड्यातील परळी वैजनाथ,केज, अंबाजोगाई या भागात तसेच मराठवाड्यातील आणखी काही जिल्ह्यांत प्रमुख्याने सोयाबीन आणि कापसाच्या पिकाला गोगलगायीचा प्रादुर्भाव झाला आहे. गोगलगायी पीक नष्ट करत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून होत आहेत. त्यामुळे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.

कृषीमंत्री मुंडे यांनी जिल्हाधिकारी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत परळी तालुक्यातील बेलंबा, वाघबेट या परिसरातील सोयाबीन, कपाशी आदी गोगलगायीनी प्रभावित झालेल्या क्षेत्राची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. काही गावांमध्ये पाहणी केली असता गोगलगायींचा प्रादुर्भाव झाला असल्याचे वास्तव समोर आले आहे. याबाबत त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला. यावेळी त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून गोगलगायींना नष्ट करण्याच्या विविध औषधी आणि उपाययोजनांबाबतही माहिती घेतली.
गोगलगायींच्या प्रादुर्भावाचा शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नावर जर परिणाम होणार असेल तर या पिकांचे महसूल आणि कृषी विभागामार्फत पंचनामे केले जावेत, असे आदेश कृषीमंत्रांनी यावेळी दिले. दरम्यान, त्यांनी उत्पादनाच्या प्रमाणात शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करता यावे, यासाठी मदत आणि पुनर्वसन विभागाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.
दरम्यान, त्यांनी गोगलगायींना नष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरणारे मेटाडेल हे औषध बाजारात सहजरित्या उपलब्ध असून त्याची किंमतही फार जास्त नाही. तेव्हा जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून कृषी विभागाला राखीव ठेवण्यात येणाऱ्या निधीमधून या औषधाची खरेदी कृषी विभागाला करता येईल का? याबाबत चाचपणी करून तातडीने निर्णय घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनाही निर्देश दिले.
यंदा कमी पावसाने पेरण्यांचे प्रमाण कमी आहे, तसेच पाऊस आणखी लांबल्यास दुबार पेरणीचे संकटही येऊ शकते, मात्र अशा परिस्थितीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी राहील, असा विश्वास माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.