कृषीमंत्र्यांचा नुकसानग्रस्त पाहाणी दौरा अंधारात ?

0
337

राज्यात गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. काही जिल्ह्यात तोंडाला आलेली पिके वाया गेली आहेत. सरकारकडून तातडीने मदत मिळण्याची चिन्ह दिसत नसल्याने ऐन गुढी पाडव्याच्या दिवशी शेतकरी वर्गात निराशेचे वातावरण आहे. अशातच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नाशिक जिल्ह्यात अंधारातच उरकलेला नुकसानग्रस्त भागाचा दौरा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

हे वाचा : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची धाकधूक वाढली

राज्यात वादळी पाऊस आणि गारपीटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सरकारकडून तातडीने मदत मिळण्याची चिन्ह दिसत नसल्याने शेतकरी वर्गात निराशेचे वातावरण पसरले आहे. त्यात काल कृषीमंत्री सत्तार यांच्या नाशिक जिल्ह्यातील नुकसानगस्तांच्या पहाणी दौऱ्यावेळी शेतकऱ्यांना मदतीचे ठोस अश्‍वासन दिले नाही. यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना मुख्यमंत्र्याशी बोलून यावर निर्णय घेऊ असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना सारवासारवीची उत्तरे देत त्यांनी निफाड दौऱ्यातून काढता पाय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी काहीच न मिळाल्याची भावना निर्माण झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने द्राक्ष, कांदा, गहू, भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले आहे. सरकारी कर्मचारी संपावर गेल्याने पंचनामे रखडले होते. काल मंगळवारी पंचनाम्यांना सुरुवात झाली. आपली गाऱ्हाणी ऐकण्यासाठी खुद्द राज्याचे कृषीमंत्री येणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. मात्र, दुपारी येणारे कृषीमंत्री निफाड तालुक्यात येता-येता अंधार पडला. त्यानंतर लगबगीने कृषीमंत्र्यांनी कुंभारी गावात पाच मिनिटांत एका द्राक्ष बागेची पाहाणी केली. तेथे फोटो सेशन केले. मिडियाशी बोलले करून दौऱ्याची औपचारिकता आटोपती घेतली. कृषीमंत्री अवघ्या काही मिनिटांत पाहणी करून चहा पिऊन निघून गेल्याने उलट सुलट चर्चा होऊ लागली आहे.

ब्रेकिंग : कृषिमंत्र्यांनी केला मोबाइल नंबर जाहीर

नाशिक जिल्ह्यात चार महिन्यांपूर्वी सोयाबीनची झालेली नुकसान भरपाई अजून मिळाली नसल्याने शेतकरी संतापलेले होते. त्यात आज पुन्हा कृषीमंत्र्यांचा दुपारचा दौरा हा तब्बल तीन तास उशिरा झाला त्यामुळे ताटकळत बसलेले शेतकरी अधिकच आक्रमक झाले. त्यामुळे निफाड येथील शेतकऱ्यांनी कृषीमंत्र्यांना प्रश्न विचारून त्यांची चांगलीच कोंडी केली. त्यात निफाड तालुक्यातील एकाच गावाला भेट दिल्याने शेतकरी चांगलेच संतापले.

दरम्यान, कृषीमंत्री धुळे जिल्ह्यात जाण्यासाठी निघाले असताना नाशिकच्या निफाड, चांदवड तालुक्यातील द्राक्ष, कांदा पिकांच्या नुकसानीची पाहणी करतील, असे नियोजन करण्यात आले होते. मात्र तसे काही झाले नसल्याने हा दौरा म्हणजे केवळ एक औपचारिकताच असल्याची भावना सध्या शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

मोठी बातमी : शेतकरी लाँग मार्च अखेर स्थगित : लाल वादळ माघारी

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here