कृषी संजीवनी मोहीम आजपासून (दि. 25 जून) राज्यभर ठरल्यानुसारच सुरू झाली आहे. या मोहिमेत मंत्री, आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी सामील करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. राज्यात राजकीय घडामोडी होत असल्या तरी त्याचा परिणाम कृषी संजीवनी मोहिमेवर होऊ देऊ नका. खरिपात शेतकऱ्यांना कृषिविषयक सल्ला व माहितीची गरज आहे. त्यामुळे मोहीम यशस्वी करावी, राजकीय पदाधिकाऱ्यांचा सहभाग असो अथवा नसो; मोहीम यशस्वी करण्यासाठी कृषी अधिकारी, कर्मचारी, कृषी शास्त्रज्ञांनी चिकाटीने काम करावे, अशा सूचना कृषी विभागाच्या सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

मोहिमेच्या नियोजनाचा आढावा कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी गुरुवारी, दि. 23 जून रोजी घेतला. राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना तसेच पीक सल्लाविषयक माहिती शेतकऱ्यांच्या बांधावर नेण्यासाठी चांगले नियोजन करावे. शेतीशाळा, चर्चासत्रे, प्रात्यक्षिके तसेच शिवारफेरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्तम मार्गदर्शन केले जावे, अशा सूचना त्यांनी या बैठकीत सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिल्या.
मान्सून अपडेट : मान्सून रेंगाळला : सर्वदूर जोरदार पावसाची प्रतीक्षा
कृषी संजीवनी सप्ताहाच्या कालावधीत राज्याचे प्रधान सचिव (कृषी) एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार तसेच सर्व कृषी संचालक, सहसंचालक विविध भागांमध्ये शेतकऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. ‘एसएओ’, ‘एडीओ’ आणि ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालकाने कृषी सप्ताहात रोज एका गावाला, तर उपविभागीय कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकाऱ्याने किमान दोन गावांच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे बंधन टाकण्यात आलेले आहे.

आज दि. 25 जून रोजी विविध पिकांचा तंत्रज्ञान प्रसार, मूल्यसाखळी बळकटीकरण दिन, कापूस, सोयाबीनसाठी उत्पादकता वाढ, मूल्यसाखळी विकास योजनेसाठी समूह तयार करणे, भात व कडधान्य लागवड तंत्रज्ञानाचा प्रसार, बीजप्रक्रिया, वाण निवड, अतिघन कापूस लागवड प्रात्यक्षिके, ‘बीबीएफ’ची प्रात्यक्षिके, कीड व रोग नियंत्रण जागृती करण्यात येणार आहे.
उद्या दि. 26 जून रोजी पौष्टिक तृणधान्य दिन : ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई लागवड तंत्रज्ञान, आहारातील महत्त्व, पौष्टिक तृणधान्यासाठी प्रक्रिया, मूल्यवर्धन, प्रक्रिया केंद्रांना भेटी आदीचे आयोजन करण्यात येणार आहे.
सोमवारी, दि. 27 जून रोजी महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण दिन : महिला शेतकऱ्यांसाठी चर्चासत्रे, परिसंवाद, व्याख्यानमाला, कौशल्य विकास आधारित प्रशिक्षण, यंत्रसामग्रीची माहिती, प्रक्रिया व सेंद्रिय शेतीवर व्याख्याने होणार आहेत.

मंगळवार, दि. 28 जून रोजी खत बचत दिन : जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापरासाठी जागृती, विविध सरळ खते, सूक्ष्म मुलद्रवे, विद्राव्य खतांचा वापरासाठी जागृती व खताच्या अतिवापराचे दुष्परिणामांच्या माहितीचा प्रसार करण्यात येणार आहे.
बुधवार, दि. 29 जून रोजी प्रगतिशील शेतकरी संवाद दिवस : प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी ज्ञान स्रोत बॅंकेतील अभ्यासू शेतकऱ्याला निमंत्रण व त्याच्यामार्फत शेतकऱ्यांना माहिती देणे, क्षेत्रीय भेटी, समूह माध्यमातून यशोगाथांची माहिती देणे व यशोगाथा कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे.
गुरुवार, दि. 30 जून रोजी शेतीपूरक व्यवसाय तंत्रज्ञान दिन : पारंपरिक शेतीला उत्तम जोडधंदा म्हणून फलोत्पादन, संरक्षित शेती, भाजीपाला व फुलशेती, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, रेशीम, मधुमक्षिकापालन, सहकार, खादी या विषयांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
बुधवार, दि. 1 जुलै रोजी कृषी दिन : कृषी संजीवनी सप्ताहाची सांगता होणार आहे.
महत्त्वाचा सल्ला : शेतकऱ्यांनी लगेच पेरणी करू नये ; कृषी आयुक्तांचा सल्ला

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1