कोरफड ही बहुवर्षीक वनस्पती आहे. पाने जाड मांसल असून पानामध्ये पाणी गराच्या रूपात साठवलेले असते. पाने लांबट असून खोडाभोवती गोलाकार वाढतात. पानांची लांबी 45 ते 60 सें.मी. असून रूंदी पाच ते सात सें.मी. असते. पानाच्या कडांना काटे असतात. झाडाच्या मध्यातून एक लालसर उभा दांडा निघतो व त्यावर केशरी रंगाची फुले घोसाने येतात. कोरफडीस शास्त्रीय परिभाषेत Aloe barbadensis असे म्हणतात. ही वनस्पती Liliaceae या कुळातील असून याचे उत्पत्तीस्थान आफ्रिका, अरबस्थान व भारतात आहे.
उपयोग : कोरफडीमध्ये अॅलोईन (20 ते 22 टक्के) बार्बोलीन (4 ते 5 टक्के) तसेच शर्करा, एन्झाईम व इतर औषधी रसायने असतात. कोरफड ही शीतल, कडू, मधुर, पुष्टीकर, बलकर व विशेष गुणधार्माची आहे. हिचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. कोरफडीच्या रसापासून कुमारी आसव बनवितात. हे शारिरीक अशक्तपणा, खोकला, दमा, क्षय यासारखे आजार बरे करण्यासाठी उपयोगी आहे. कोरफडीपासून बनविण्यात येणारे तेल केसांसाठी फार उपयुक्त आहे. या तेलाचा उपयोग केशवृद्धीसाठी, कोंडा कमी करण्यासाठी व केसांना चकाकी आणण्यासाठी करतात. त्वचेचा दाह होत असल्यास कोरफडीचा गर लावतात. हा गर पोटदुखी, अपचन, पित्तविकार यावर सुद्धा उपयोगी आहे. डोळ्यांच्या विकारावर तसेच भाजल्यामुळे झालेल्या जखमेवर कोरफडीचा गर उपयोगी आहे. सौंदर्यवृद्धीसाठी कोरफडीच्या गराचा उपयोग करतात. कोरफडीच्या रसात जिवाणू प्रतिकारक शक्ती असते. कोरफडीच्या पानात एलोइन व बार्बालाईन ही मुख्य ग्लुकोसाइडस् असतात.
जमीन व हवामान : कोरफडीच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आवश्यक असते. कोरफडीच्या उष्ण व कोरडे हवामान अनुकूल असते. कमी पाण्यावर वाढणारी ही वनस्पती असल्यामुळे कमी पावसाच्या प्रदेशात याची लागवड करता येते.
लागवड : जमीन चांगली नांगरूण, वखरून भुसभुशीत करावी. काडीकचरा वेचल्यानंतर हेक्टरी 10 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. त्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. नंतर जमीन सपाट करून सरी वरंबे पाडावेत. कोरफडीची लागवड फुटव्यापासूनच केली जाते लागवड करतांना दोन ओळीत 60 सें.मी. व दोन झाडात 45 सें.मी. अंतर ठेवावे. लागवड जुलै महिन्यात करावी. ओलितांची सोय असल्यास लागवड केव्हाही करता येते.
ओलीत : पावसाळ्यात व हिवाळ्यात कोरफडीस पाण्याची जास्त आवश्यकता नसते. परंतु उन्हाळ्यात 15 दिवसातून एकवेळ पाणी द्यावे लागते.
आंतरमशागत : वेळोवेळी निंदण करून वाफे तणरहीत करावे. बुंध्याजवळील माती भुसभुशीत ठेवल्याने झाडाची वाढ चांगली होते.
रोग किडी व्यवस्थापन : या झाडावर विशेष किडी व रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला नाही. पानावरील काळे ठिपके या रोगाच्या नियंत्रणासाठी 0.25 टक्के डायथेन एम-45 व 0.10 टक्के कार्बेन्डाझीम यांचे मिश्रण तीन ते चार वेळा 15 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
काढणी आणि उत्पादन : पानाचे टोक किंवा पानाचा रंग पिवळसर झाल्यावर साधारणत: कोरफड 14 ते 16 महिन्यांची झाल्यावर पाने औषधोत्पादनांसाठी काढावीत. पाने काढतांना मुख्य झाडाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. काढणीपूर्वी झाडास ओलीत केल्यास पानातील पाण्याचे प्रमाण वाढते. पिकाची चांगली काळजी घेतल्यास हेक्टरी 15 ते 20 टन ओली पाने मिळतात.
संदर्भ : शेतीमित्र मासिक (औषधी वनस्पती विशेषांक)
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास हा लेख आवडला असल्यासखालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇