काय आहेत गुणवैशिष्ट्ये ? किती आहे किंमत ? कधी होणार बाजारात उपलब्ध ?
शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. इंडियन फार्मर्स फर्टिलाईजर को-ऑपरेटिव्ह लि. म्हणजेच ‘इफको’ने युरीया पर्याय म्हणून ‘नॅनो युरिया द्रावण’ नुकतेच लॉन्च केले आहे. विशेष म्हणजे ५०० मिली बाटलीतील हे द्रावण चक्क युरीयाच्या एका गोणी प्रमाणे काम करणार आहे.
‘इफको’ची ५० वी वार्षीक सर्वसाधारण महासभा नुकतीच पार पडली. ही महासभा ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. या महासभेला ‘इफको’चे अधिकारी, पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी ‘इफको’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. यू. एस. अवस्थी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘युरियाचा वापर कमी करण्यात यावा’ या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘इफको’चे हे ‘नॅनो युरिया द्रावण’ लॅन्च केले. ‘इफको’च्या या नॅनो युरिया द्रावणामुळे शेतकरी युरियाच्या बाबतीत नक्कीच आत्मनिर्भर बनेल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या ‘नॅनो युरिया द्रावणा’चे उत्पादन ‘स्वावलंबी भारत’ आणि ‘स्वावलंबी शेती’ या दिशेने अर्थपूर्ण पाऊल आहे. असे ‘इफको’ने आपल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच ‘नॅनो यूरिया द्रावण’ वनस्पतींच्या पोषणासाठी प्रभावी असल्याचे आढळले आहे. या वापरामुळे पिकांचे उत्पादन वाढते आणि पोषक द्रव्यांची गुणवत्ता सुधारते. हवामान बदलांवर आणि शाश्वत उत्पादनावर सकारात्मक परिणाम होत असताना ‘नॅनो यूरिया द्रावण’ भूगर्भातील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यात आणि जागतिक तापमानवाढ कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असेही निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नॅनो यूरिया द्रावण वापरल्यास वनस्पतींना संतुलित पोषकद्रव्ये मिळतील आणि जमिनीत युरियाचा होणारा अती वापर कमी होईल. ‘नॅनो यूरिया द्रावण’ पिकांना मजबूत आणि निरोगी बनवते. हे ‘नॅनो यूरिया द्रावण’ शेतकर्यांसाठी स्वस्त तर आहेच, शिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास मदत करणारे आहे.
या ‘नॅनो युरिया द्रावणा’ची ५०० मिलीची एक बाटली सामान्य युरियेच्या एका गोणीप्रमाणे काम करते. याच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होणार आहे. विशेषत: नॅनो युरिया द्रव्याचा द्रावणाची बाटलीचा आकार लहान असल्याने याला शेतकरी खिश्यातही ठेवू शकतात. यामुळे साठवणूक आणि वाहतुकीचा खर्च देखील कमी होणार आहे.
‘इफको’च्या वैज्ञानिक आणि अभियंत्यांनी ‘कलोल’ येथील नॅनो बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरमध्ये स्वदेशी आणि प्रोप्रायरी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे ‘नॅनो यूरिया द्रावण’ तयार केले असून, याच्या अर्धा लिटर नॅनो युरिया द्रावणाच्या बाटलीची किंमत फक्त २४० रुपये निश्चित करण्यात आली आहे. जी युरियाच्या गोणीपेक्षा १० टक्क्यांनी कमी आहे.
राष्ट्रीय कृषी संशोधन यंत्रणे (एनएआरएस) अंतर्गत २० आयसीएआर संस्था, कृषी विद्यापीठे आणि कृषी विज्ञान केंद्रांवर ४३ पिकांवर विविध भागात याच्या चाचण्या करण्यात आल्या असून, त्यानंतर ‘इफको’ने नॅनो यूरिया द्रावणाचा ‘उर्वरक नियंत्रण ऑर्डर’ (एफसीओ, 1985) मध्ये समावेश करण्यात आला आहे. नॅनो युरिया द्रावणाचे परीक्षण भारतातील ११ हजार कृषी भागात ९४ टक्क्यांपेक्षा अधिक पिकांवर करण्यात आले आहे. दरम्यान, ९४ पिकांवर करण्यात आलेल्या चाचण्यानुसार, पिकांच्या उत्पन्नात ८ टक्के वाढ झाल्याचे निदर्शनात आले आहे. ‘इफको’चे नॅनो यूरिया द्रावणाची रचना सामान्य युरियाचा वापर कमीतकमी ५० टक्क्यांनी कमी करण्यासाठी केला गेला आहे. एका बाटलीमध्ये ४० हजार पीपीम नायट्रोजन आहे. हेच प्रमाण युरियाच्या एका गोणमध्ये असते. दरम्यान नॅनो युरियाचे उत्पादन जून २०२१ पासून सुरू करण्यात आले असून, हे नॅनो यूरिया द्रावण लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा