भारतात प्राचीन काळपासून शतावरी हि एक औषधी वनस्पती म्हणून वापरतात. शतावरी लीलीएसी (Liliaceae) या कुळाशी संबंधित आहे. आयुर्वदामध्ये शतावरी वनस्पतीस अत्यंतमहत्त्वपूर्ण स्थान आहे,ती शत गुणांवर प्रभावी असल्यामुळे’शतावरी’ हे नाव देण्यात आले. शत गुणांची शतावरी औषधीरित्या उपयुक्त असूनही नामशेष होत चालली आहे. हा ऱ्हास रोखण्यासाठी लागवड अत्यावश्यक ठरते व त्यामध्ये शेतकरी बांधवांचा सहभाग अत्यंतमोलाचा ठरतो. शतावरी हे नवीन व अधिक अर्थप्राप्ती करून देणारे पीक म्हणून पुढे येत आहे. जास्त खर्चिक पिकासाठी शतावरी उत्तम पर्याय ठरू शकतो.
वनस्पती परिचय : शतावरीच्या एकूण विविध २२ प्रजाती आहेत ज्यातऔषधी शतावरी, भाजीची शतावरी, शोभेची शतावरी, महाशतावरी इत्यादींचा समावेश होतो. ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे जिचा वेलडोंगरउतारावर काटेरी झुडपांचा आधार घेऊन वाढते. शतावरीची मुळे मांसल स्वरुपात असून जमिनीखाली खोडाच्या बुंध्याजवळ सभोवार वाढतात. ती दंडाकृती दोन्हीकडे निमुळती व रंगाने पांढरी असतातव औषधीरीत्या अत्यंत उपयुक्त आहेत. पावसाळ्यात वेलीची वाढ झपाट्याने होते व वसंत ऋतूत वेलीवर बारीक व झुपकेदार फुले येतात.फुले हिसाधी, मंजिरीची, पांढऱ्या/गुलाबी रंगाची वलांबट आकाराची असतात. उन्हाळ्यात शतावरी सुप्त अवस्थेत जातेव एक -दोन पावसानंतर सुप्त गड्ड्यांना नवीन कोंब फुटतात.
जमीन व हवामान : उत्तम निचऱ्याची वाळूमिश्रित पोयटा व सेंद्रिय खताचे जास्त प्रमाण असणारी जमीन शतावरी लागवडीसाठी उत्तम समजली जाते. मुळे जास्त खोल जातनसल्याने २० -३० से. मी. मातीचा थर असला तरीहि त्यात वाढ उत्तम होते. तसेच हलक्या, मध्यम डोंगरउतारावरील माळाच्या पडीक जमिनीतही शतावरी लागवड करता येते. उष्ण-कटिबंधीय प्रदेशापासून ते सौम्य हवामानाच्या प्रदेशापर्यंतच्या हवामानात शातावरी लागवड करता येते. तरी समशीतोष्ण व उष्ण हवामान या पिकास चांगले मानवते. महाराष्ट्रात सर्व विभागात शतावरीची लागवड करता येते. पावसाचे प्रमाण चांगले असणाऱ्या भागात कोरडवाहू पीक म्हणून शतावरीची लागवड करता येऊ शकते.
पूर्वमशागत : लागवडीचे क्षेत्र तयार करण्यासाठी उन्हळ्यात नांगरट करून कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत व सपाट करावी. त्यांनतर हेक्टरी २० ते २५ टन चांगले कुजलेले शेणखत/कंपोस्ट खत मिसळावे. शतावरीची मुळे मांसल असल्याने जमिनीत पोकळपणा अत्यावश्यक आहे.
लावणी : शतावरी लागवडीसाठी बिया किंवा गड्याच्या फुटव्यांचा उपयोग केल्या जातो. व्यापारी तत्वावरील लागवडीसाठी गाड्यांच्या फुटव्याना प्राधान्य दिले जाते. या पिकाची लागवड सरी -वरंबा पध्दतिने करतात. त्यासाठी ७५ ते ९० सें.मी. रुंद व १० मी. लांबीच्या सऱ्या व वरंबे तयार करावेत. या वरंब्यांवर चांगले वाढलेले गाड्यांचे फुटवे लाऊन घ्यावे. बियांपासून लागवडीकरिता, पावसाळ्या अगोदर रोपे तयार करून घ्यावीत. गादीवाफ्यावर किंवा प्लॅस्टीक पिशव्यांमध्ये बियांपासून रोपे तयार करावेत. गादी वाफ्यावर ५ – ७ से.मी. अंतरावर २ – ३ से.मी. खोलीवर ओळीने बी पेरून घ्यावे. ६ ते ७ आठवड्यांमध्ये रोपे लागवडीसाठी तयार होतात.
आधार : शतावरी वेल वर्गीय पिक असल्याकारणाने आधार देणे गरजेचे आहे. वेल चांगले वाढू लागल्यानंतर वेलीला ५ ते ६ फूट उंचीचे बांबू लावून आधार द्यावा. याशिवाय लोखंडी – अँगल्स व तारेचा वापर करून २ मी. उंचीच्या मंडपावरही शतावरीचे वेल वाढवता येतात.
आंतरमशागत : वाढीच्या सुरवातीच्या काळात वेळोवेळी तन नियंत्रण करणे गरजेचे असते. तन काढतेवेळी वाढणार्या अंकुरांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी. सुरवातीच्या काळात साधारण ५ ते ६ वेळा हाताने तन काढावे लागते. वाढ चंगली झाल्यावरहि वेलीच्या बुध्याजवळील तण काढावे. वेळोवेळी खुरपणी करून ताणाचे व्यवस्थापन करावे.
खते : जमिनीत सेंद्रिय खते योग्य प्रमाणात असल्यास रासायनिक खताची गरज भासत नाही. शक्यतो लागवडीअगोदर मृदचाचणी करूनच खतांच्या मात्रा निश्चित कराव्यात. चांगल्या व निकोप वाढीसाठी योग्य प्रमाणात खतांचा वापर करावा. लागवडीनंतर वेल चांगले वाढू लागल्यावर आळे पद्धतीने ५० ते १०० ग्रॅम कल्पतरू खताची मात्रा द्यावी.
काढणी व उत्पादन : शतावरी मुळांचीपहिली काढणी १८ ते २० महिन्यांनी करावी. शतावरीची मुळे काढण्याअगोदर शेताला हलके पाणी द्यावे व वाफसा आल्यानंतर मुळांची काढणी करावी. मुळे काढताना शतावरीचे मुख्य खोड तसेच ठेवून बाजूने जमीन कुदळीने खोदून झुपक्याने वाढलेली मांसल मुळे काळजीपूर्वक काढावीत.मुळे काढताना काही मुळे मुख्य खोडाशी ठेवावीत, जेणेकरून ती वनसंपत्ती समूळ नष्ट होणार नाही.पुढे १० ते १५ वर्षांपर्यंत मुळांचे उत्पादन घेता येते.काढलेली मुळे स्वच्छ करून लगेच मुळांवरची बारीक साल काढून १०-१५ सेंमी लांबीचे तुकडे करावेत. तसेच मुळामधील शीर ओढून काढावी म्हणजे वाळविण्याची प्रक्रिया लवकर होते. चांगली काळजी घेतल्यास प्रति वर्षी प्रति हेक्टर १२ ते १५ क्विंटलमुळांचेउत्पादन मिळते.
प्रक्रिया : शतावरी मुळांची प्रक्रिया पुढील प्रमाणे करातात
1) मुळेस्वच्छ करणे : यामध्ये कंदमुळे जमिनीतून खणून हळुवारपणे त्यांना इजा न होता धुवून घ्यावी.
2) सुकवणे : काढणी नंतर ही मुळे सावलीत सुकवावीत.सावलीत सुकवणे ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे या वनस्पतीत असणारी मूलद्रव्ये तसेच रंग कायम राखला जातो.
3) वर्गवारी करणे : मालाची स्वच्छता करून तो माल वाळवल्यानंतर त्या मालाची वर्गवारी करणे गरजेचे आहे.
4) प्रक्रिया करणे : उत्पादनानुसार प्रक्रिया करणे / पावडर करणे
औषधी गुणधर्म : शतावरीच्या कंदामध्ये सॅपोनिन, ग्लायकोसाइड्स, फॉस्फरस, रिबोफ्लेव्हिन, थायमाईन, पोटॅशियम, कॅल्शियम, झिंक, विटामिन सी व इतरही उपयुक्तरासायनिक द्रव्ये असतात.शतावरीच्या मुळ्या आणि अंकुर या भागांपासून औषधी रसायने मिळवतात. शतावरीकफ आणि पित्त यावर गुणकारी आहे.शतावरी स्नायूंची शक्ती वाढवण्यासाठी वापरली जाते.शतावरीचे तेल हे अर्धांगवायू व संधिवातासाठी उपयुक्त आहे. शतावरी कंदाचा उपयोग पित्तप्रदर, ज्वर, धातुवृद्धी, मुतखडा, अपस्मार व रक्तशुद्धीसाठी केला जातो. शतावरीपासून तयार केलेले तेल अर्धांगवायू व संधिवातावर गुणकारी आहे. तसेच ही स्मृतिवर्धक कार्य करते.रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास शतावरी उपयुक्त आहे. क्षय, मधुमेह, अतिसार या रोगांवर देखील शतावरीची मुळे उपयुक्त आहेत.शतावरीच्या मुळचा उपयोग स्तन्यवर्धक म्हणूनहि केला जातो.कंदाचा उपयोग जनावरांमध्ये विशेषतः गायी, म्हशींमध्ये जास्त दूध मिळण्यासाठी केला जातो. शतावरीचा औषधी उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
शतावरी उत्पादने : शतावरीपासून शतावरी चूर्ण, शतावरी घृत, तेल,शतावरी गोळ्या, शतावरी कल्प तसेच प्रमेह मिशतेल अशे विविध उत्पादने तयार केली जातात. .
बाजारपेठ : भारतातील सर्व फार्मसीमध्ये शतावरीच्या वाळलेल्यामुळ्या विकत घेतल्या जातात तसेच काही फार्म कंपन्या ओली मुळे हि विकत घेतात.केवळ आयुर्वेदिकच नव्हे, तर अॅलोपॅथिक आणि होमिओपॅथिक औषधनिर्मितीसाठीही शतावरीच्या मुळ्या लागतात. महाराष्ट्रात आणि परराज्यातील काही कंपन्याद्वारे करार शेती चा मार्गही उपलब्ध आहे. परदेशातून शतावरीची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. आपल्याकडे मागणी अधिक असल्याने आपल्या देशात अधिक उत्पादन घेतल्यास यातून आपल्याला नफा हि मिळतो. शतावरी व इतर औषधी वनस्पतीच्या लागवडीसाठी आयुष मंत्रालय, भारत सरकार तसेच एन.एम.पी.बि (National Meditional Plant Board) यांच्या कडून आर्थिक मदत हि मिळते. अधिक माहितीसाठी या (www.nmpb.nic.in) संकेतस्थळाला भेट द्यावी.
शतावरी पासून १० ते १५ वर्ष उत्पादन मिळते तर लागवडीचा खर्च हा सुरवातीच्या वर्षात येतो. तसेच शतावरी मध्ये आंतरपीक घेऊन दुप्पट नफा कमवू शकतो. शतावरी शेतीकरिता लागणारा पैसा हा पारंपरिक शेतीपेक्षा तुलनेने थोडासा कमी आहे, परंतु त्यातून मिळणारा नफा हा जास्त आहे त्यामुळे शतावरी हे अर्थप्राप्तीचे नवे साधन ठरू शकते.
डॉ. अंबालिका केशव चौधरी, डॉ. पुरुषोत्तम सुधाकरराव देशमुख
एम. जी. एम. नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली, औरंगाबाद मोबाईल ९८३४६६५९६५