बांबू लागवड करायच्या ठिकाणी उन्हाळ्यात 3 x 3 मीटर अंतरावर आखणी करून कंदांपासून लागवड करण्यासाठी 60 x 60 x 60 सें.मी आकाराचे खड्डे खोदून ठेवावेत. रोपांपासून लागवड करावयाची असल्यास 30 x 30 x 30 सें.मी. आकाराचे खड्डे खोदावेत. कंद लागवडीसाठी जर कंदाचा आकार मोठा असेल, तर त्यानुसार खड्ड्याचा आकार वाढवावा.
पावसाळ्याच्या सुरवातीस चांगली माती, शिफारशीत कीडनाशक भुकटी, 250 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेटही मातीमध्ये मिसळावे. अशा भरून घेतलेल्या खड्ड्यांमध्ये कंद, पॉलिथिन पिशवीत वाढलेली रोपे किंवा गादीवाफ्यावर वाढविलेली रोपे रोपांच्या मुळांना इजा होणार नाही, अशा तऱ्हेने मातीसह काढून लावावीत. बांबूस पाणथळ जमीन चालत नाही, त्यामुळे पावसाळ्यात खड्ड्यांत पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी.
बांबू रोपांची पावसाळ्यात लागवड झाल्यानंतर पहिल्या वर्षी डिसेंबर ते मे महिन्यात लागवडीस पाणी द्यावे. निंदणी व भर देण्याचे काम लागवडीपासून तीन वर्षांपर्यंत करावे. मोकाट जनावरे, वन्यप्राणी आणि आगीपासून संरक्षण करावे.
दर वर्षी पावसाळ्याच्या सुरवातीस प्रत्येक रोप/ कंदाला 100 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व 25 ग्रॅम युरिया याप्रमाणे खते द्यावीत. त्यानंतर दोन महिन्यांनी हीच मात्रा पुन्हा द्यावी. बांबू खतांना चांगला प्रतिसाद देतात, असे आढळून आलेले आहे. कंदांपासून लागवड केल्यास चार ते पाच वर्षांपासून उत्पादनास सुरवात होते.
बांबूची लागवड जर रोपांपासून केली, तर सहा ते आठ वर्षांनी उत्पादन मिळण्यास सुरवात होते. कोंबातून बाहेर पडणारा बांबू पूर्णपणे वाढून बेटातील अगोदरच्या बांबूच्या आकाराएवढा झाला असेल, तर जुना बांबू जमिनीपासून 30 सें. मी. उंचीवर कापावा. पहिल्या कापणीपासून प्रत्येकी दोन वर्षांच्या कालावधीने पुढील बांबूच्या कापण्या कराव्यात. एक वर्षाचा कोवळा बांबू कापू नये. जितके नवीन कोंब आले असतील, तितकेच जुने बांबू तोडावेत. पक्व बांबू ठेवून नवीन बांबू तोडू नयेत.
अधिक माहितीसाठी
वनशास्त्र महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी (02358/283655)
अखिल भारतीय समन्वित वनशेती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (02426/243252)
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा