व्यवस्थितपणे मधमाशी पालन केले तर एक एकर शेतात ठेवलेल्या मधमाशांच्या पेट्यातून वर्षाकाठी सरासरी १ लाख रुपयांचा मध जमा होऊ शकतो. यापेक्षाही अधिक मध जमा करणारे लोकही आहेत. मधाचा वापर सध्या वाढत चालला आहे. सुधारलेल्या देशांमध्ये मधाचा वापर दरसाल दरडोई अडीच किलो एवढा आहे. भारतात मात्र हे प्रमाण दरसाल दरडोई केवळ ८ ग्रॅम एवढे आहे. त्यामुळे मधमाशी पालन व्यवसायाला चांगलाच वाव आहे. येत्या दहा वर्षात आयुर्वेदाचा प्रचार खूप झाला तर भारतातला आत्ताचा मधाचा वापर कमीत कमी दहापट तरी नक्कीच वाढू शकतो. असा जानकरांचा अंदाज असून, शेतकर्यांना मालामाल होण्याची ही संधी आहे.
मधमाशी पालन व्यवसायाला ५० % अनुदान : गेल्या काही वर्षांपासून राज्यातील शेतकरी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक शेती करण्यावर भर देत आहेत. शेतीमध्ये विविध प्रयोग करत आहेत. आधी शेतीसह जोडव्यवसाय म्हणून शेतकरी फक्त पशुपालनाचा व्यवसाय करत असायचा आता मात्र पशुव्यवसायासह मत्स्य पालन आणि आता, मधमाशी पालन या शेती पुरक व्यवसाय करत आहेत. यासाठी खादी ग्रामोद्योग मंडळाने मधमाशाच्या व्यवसायाला गती देण्याचा आणि त्यातून शेतकर्यांना स्वावलंबी करण्याचा चांगलाच प्रयत्न केलेला असून, राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रमांतर्गत ही योजना लघुउद्योग श्रेणीत असून मधमाशी पालन व्यवसाय करण्यासाठी शासनकडून शेतकऱ्यांना ५० ट्क्के अनुदानही दिले जाते.
मधमाशी पालनाचे फायदे : मध हे एक अत्यंत शक्तीदायक व पौष्टीक अन्न व औषध आहे. मधमाशा मेण देतात हे सौदर्य प्रसाधने, औद्योगिक उत्पादनाचा घटक आहे. शिवाय यापासून मेणबत्ती तयार करतात. मधमाशा पासून मिळणारे राजान्न (रॉयल जेली, दंश, विष, व्हिनम) पराग (पोलन) रोंगणे (प्रो पॉलीस) पदार्थांना उच्चप्रतीचे औषधमुल्य आहे. परागी भवनाव्दारे शेती, पिके, फळबागायती पिकांच्या उत्पादनात भरीव वाढीस मदत होते. या व्यवसायासाठी सरकारच्या विविध प्रोत्साहन योजना आहेत. आपल्याला मध शेती करायची असेल तर आपल्याला मोठ्या व मोकळ्या जागेची गरज असते. जर तुम्हाला २००-२५० पेट्या ठेवायच्या असतील तर साधारण ४५०० स्केअर फूट जागेची गरज लागेल. आपण आपल्या शेतात ही जागे जागेवर या मध पेट्या ठेवू शकतो.
मधमाश्यांच्या प्रजाती : भारतामध्ये मधमाश्यांच्या चार प्रजाती आहेत. दगडी माशी अपीस डोरसाटा या माशा उत्तम प्रकारे मध गोळा करतात आणि त्यांच्या प्रत्येक वसाहतीमागे सरासरी मध उत्पादन ५०-८० किलो असते. लहान माशी अपीस फ्लोरिआ या माशा कमी मध गोळा करतात आणि त्यांच्या प्रत्येक वसाहतीमागे अंदाजे २००-९०० ग्रॅम मध मिळतो. भारतीय मधमाशी अपीस सेराना इंडीका या मधमाशांद्वारे होणारं मध उत्पादन दर वर्षी प्रति वसाहत ६-८ किलो असते. युरोपिअन मधमाशी इटालिअन मधमाशी अपीस मेल्लीफेरा यांच दर वसाहतीमागे सरासरी मध उत्पादन २५-४० किलो असते.
मधमाश्यांच्या पेट्यांची काळजी : मधमाशी पालनासाठी मधमाशी बरोबर पेटीची आवश्यकता असते. एका पेटीची किंमत ही सुमारे ३५०० असते. या पेटीत एकूण दहा फ्रेम असतात. तर एका फ्रेम मध्ये २५० ते ३०० माशा राहतात. माशीची निवड केल्यानंतर पेट्या योग्य ठिकाणी ठेवाव्यात. कालांतराने माशा मध पेटीत साठवण्यास सुरुवात करतील. मधाचे पोळे मधाने भरल्यानंतर ते योग्य पद्धतीने चाकूने कापून घ्यावे. त्यानंतर कापून घेतलेला भाग यंत्रात टाकावा. यंत्र सुरू झाल्यावर मध बाजूला होऊन नको असलेला भाग वेगळा होईल.
एका फ्रेम मधून साधारण २०० ग्रॅम एवढा मध मिळतो, म्हणजे एका पेटीतून २ किलो मध मिळतो. तर एका पेटीतून आपण महिन्याला ४ किलो मध मिळू शकतो. हा मध जनरल सटोअर्स आणि किराणा स्टोअर मध्ये विकता येतो. तसेच मध उत्पादन करणाऱ्या कपन्यांशी संलग्न राहून आपण त्यांनाही मध विकू शकतो. याला सरासरी १०० रुपये किलो इतका भाव मिळाल्यास एका महिन्याला १,१५,००० रुपये किंमतीचे मध मिळू शकतो.
मधाचे औषधीगुणधर्म : मध हे ऊर्जा देणारे एक उत्तम नैसर्गिक अन्नघटक असून, एक चांगले अॅन्टीबायोटिक आणि अॅन्टीसेप्टीक आहे. मध हे स्नायूंना बळकटी देते. खोकला, कफ, दमा या विकारांवर मध उपयुक्त असून, यकृत व पोटाच्या आजारावर उपयुक्त व वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. मध हे जलद थकवा घालवून कार्यशक्ती वाढवते. शिवाय विविध प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनामध्येही याचा वापर होत असतो.
विशेष म्हणजे काही पिकांनाही मधमाशांचा फायदा होतो. कापूस, मोहरी, तीळ, कराळ, सुर्यफूल, वांगी, भेंडी, मिरची, काकडी, भोपळा, टोमॉटो, दुधी भोपळा, कारले, सफरचंद, लिंबू, संत्री, मोसंबी, पेरू, लिची तूर, मूग, उडीद या पिकांकया उत्पादनात चांगलीच वाढ होते.
मधमाशी पालन करताना घ्यावयाची काळजी : मध शेती करताना पेट्या या खुल्या जागेत ठेवाव्यात. त्यामुळे माशांची संख्या कमी होऊन उत्पादनात घट येऊ शकते. तसेच मधमाश्यांना त्रास दिल्यास त्या चावतात त्यामुळे त्यांनी चावा घेतल्यास योग्य उपचार घेणे गरजेचे आहे. पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत मध उत्पादन केंद्र उभारावे. फळबागांच्या जवळ मकरंद, परागकण आणि भरपूर पाणी असलेल्या ठिकाणी उभारणी करावी. पोळ्याचे तापमान आवश्यक तितके राहण्यासाठी सूर्यप्रकाशापासून मधमाशांचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. मधमाशा पेटीत ठेवतांना चारही पायाखाली पाण्याने भरलेली वाटी अॅन्टवेल्स ठेवावी, जेणेकरून पेटीत मुंग्या जाणार नाहीत. वसाहतींना पाळीव जनावर, अन्य प्राणी, गर्दीचे रस्ते, इलेक्ट्रीक पोल पासून दूर ठेवावे.
मधमाशी पालन योजनेची माहिती : जिल्हा वार्षिक योजनेतून मधमाशी पालनासाठी फायदे मिळवून देण्यात येणार आहेत. या संदर्भात शेतक-यांनी त्याचे शेतीशी जोडधंदा म्हणून उद्योग करावयाचे ठरविल्यास त्यास मधपाळाचे 10 दिवसाचे प्रशिक्षण मधसंचालनालय महाबळेश्वर येथे दिले जाते. त्यानंतर त्यास मध उद्योगासाठी आवश्यक असलेली साहित्य मधपेट्या (वसाहतीसह) मधयंत्र व अन्य साहित्य रु 42700/- पुरविण्यात येते. यात प्रशिक्षण विनामूल्य तसेच साहित्य खरेदीवर 10,000/- पर्यन्तचे अनुदान पश्चिमघाट विकास योजना/ जिल्हा वार्षिक योजना यांचे माध्यमातून दिले जाते. शिवाय शेतक-यास मधासाठी हमी भाव रु. 120/- प्रति किलो निर्धारीत केला असून मंडळाकडून मध खरेदी केला जातो.
मधमाशा पालन प्रशिक्षण : मधमाशी पालनासाठी प्रशिक्षण जर घ्याचे असेल तर भारत सरकारच्या सेंट्रल बी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये जाऊ शकता तसेच http://nbb.gov.in या संकेस्थळावरील माहिती पाहू शकता. शिवाय महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे खादी ग्रामोद्योग मंडळाने या संबंधातील संशोधन करणारे संस्था स्थापन केलेली आहे आणि या संस्थेतून मधमाशा आणि मध उत्पादन या संबंधात माहिती दिली जाते. जिज्ञासूंनी महासंचालक, मधुमक्षिका पालन केंद्र, महाबळेश्वर, जि. सातारा. फोन ०२१६८-२६०२६४ या क्रमांकावर संपर्क साधावा. या संस्थेमार्फत मधाच्या विक्रीबाबतही मार्गदर्शन केले जाते. सरकार मधाची खरेदी सुद्धा करते. सध्या १०० रुपये किलो असा सरकारी खरेदीचा भाव आहे. त्याशिवाय अनेक खाजगी संस्था मध विक्रीचा व्यवसाय करत असतात. त्यांनाही शेतकरी मध विकू शकतात.
संदर्भ : शेतीमित्र मासिक
शेतीमित्र मासिक आता.. प्रत्येकाच्या मोबाईलवर ! शेतीविषयक आधुनिक माहिती वेळोवेळी मिळविण्यासाठी #shetimitra magazine चे फेसबुक पेज लाईक करा 👇👇