भारतातील राज्याच्या कुक्कटपालनात महाराष्ट्राचा नंबर बराच वरचा असला तरी अजून वाढत्या लोकसंख्येच्या मागणीबरोबर अर्थिक उदारीकरणामुळे निर्यातसंधीचा फायदा घेण्यासाठी मोठे ध्येय साध्य करता येणार आहे. चांगल्या कुक्कट उत्पादनासाठी चांगल्या पक्ष्यांचा पुरवठा, पुरेसे भांडवल, प्रशिक्षण याचबरोबर सकस आणि चांगल्या प्रतीचे व कमी किंमतीचे कोंबडीखाद्य मुबलक उपलब्ध असणे आणि अंडी व मांस वितरणाची व्यवस्था असणे आवश्यक आहे.
कुक्कटपालन प्रशिक्षणाची व्यवस्था मध्यवर्ती अंडी उबवण केंद्र खडकी (पुणे), भारीय कुक्कटपालन प्रशिक्षण संस्था, खामगाव टेक, उरळीकांचन, कोल्हापूर, बारामती आणि सधन कुक्कुटविकास गट तासगाव (सांगली), पेण (रायगड), सातारा पालघर (ठाणे), चिपळूण (रत्नागिरी), नाशिक परभणी, कोपरगाव (अहमदनगर), अकोला, अमरावती, यवतमाळ या ठिकाणी उपलब्ध आहे. कुक्कटपालनासाठी एकूण खर्चात खाद्याचा वाटा 65 ते 70 टक्के असतो. म्हणून खाद्याच्या किमंतीवरच कुक्कटपालनाचा नफा व तोटा अवलंबून आहे. कमी खर्चाच्या खाद्याची निर्मीती करुन त्यांचा शासकीय किंवा सहकारी यंत्रणेमार्फत पुरवठा होणे गरजेचे आहे.
कुक्कट पक्ष्यांच्या जाती : कोंबड्यांचे दोन गट पडतात. एक देशी गावडी कोंबडी व दुसरी परदेशी सुधारलेली कोंबडी.
देशी जाती : भारतातील सर्व कोंबड्यांच्या जाती देशी या नावाने ओळखल्या जातात. निरनिराळ्या प्रदेशातील गुणवैशष्टयानुसार कोंबड्यांना नावे दिली आहेत.
असील : शुध्द असील पक्षी मोठा, ताठर, करारी व रूबाबदार असतो. त्याच्या चोचीपासून तळव्यापर्यंतची उंची 28 इंच असते. डोके रूंद असून त्यावर लहान वाटाण्यासारखा लालभडक तुरा असतो. चेहरा थोडा लांबट व सडपातळ असून त्यावर पिसे असतात. डोके भरीव व तीक्ष्ण असते. गलोल फारच लहान असतो. मान लांब व जाड असते. पाठ जमिनीकडी उतरणी असते. पाय मजबूत व सरळ असून दोन पायांतील अंतर पुष्कळ असते. पिसारा शरीरालगतअसतो. पिसे बळकट असून तोडण्यास कठिण असतात. हे पक्षी लढाऊ असल्याने कोंबड्यांच्या झुंजी लावण्यासाठी वापरतात, सध्या असील जात दुर्मिळ होऊ लागली आहे.
अंकलेश्वर : अंकलेश्वर येथून त्याच गावाचे नाव धारण करून कोंबडी प्रसिध्द झाली. अंगाने मध्यम असणारी ही कोंबडी अनिष्ट वातावरणास चांगली टक्कर देते, जडण-घडण चांगली अंडी देणार्या कोंबडीसारखीच आहे. अंडी देण्याचे प्रमाण कमी असून ती आकाराने लहान असतात. शुध्द अंकलेश्वर लोप पावली असून क्वचित ठिकाणी ही कोंबडी पहावयास मिळते.
चितगाव : ही कोंबडी भारताच्या पूर्व भागात आढळते. उंच व वजनदार असतो. चोचीपासून तळपयापर्यंत नराची उंच तर वजन साडेतीन चार किलो असते. तुरा वाटाण्यासारखा असून लालभडक असतो. डोके लांबट असनू चोच लांब व पिवळ्या रंगाची असते. अंगावरची पिसे शरीराला पखडून बसलेली असतात. त्यांचा रंग पांढरा, काळा, तपकिरी, राखी अशा वेगवेगळ्या प्रकारचा असतो.
बसरा : लहान व मध्यम आकाराची ही कोंबडी महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवभर आढळते. शरीराची जडणघडण चांगली अंडी देणार्या कोंबडीसारखी असून शरीर खोलगट आहे. पिसांचा रंग फिकट असून ते विविध रंगामध्ये आढळतात. अंडी देण्याचे प्रमाण कमी असते. ही कोंबडी आजाराला लवकर बळी पडते.
कडकनाथ : या जातीचे खरे नाव कालामाती म्हणजे काळी आतडी असणारी पक्षी असे आहे, परंतु कडकनाथ या नावाने प्रसिध्द आहे. मध्य प्रदेशातील मागासलेल्या भागात या जातीची मोठ्या प्रमाणात जोपासना केली जाते. ही कोंबडी फिकट असून तांबूस रंगाची आणि फारच कमी म्हणजे वार्षिक 80 अंडी घालते. हा पक्षी आकाराने लहान असून नराचे वजन दीड किलो तर मादीचे वजन एक किलो असते. यांच्या पिसांचा रंग पांढरा व सोनेरी असा मिश्र असतो. तर चामडी, चोच, पाय काळे असतात. ही कोंबडी आजाराला चांगली टक्कर देते.
काश्मिरी : ही कोंबडी काश्मिर प्रांतात मोठ्या प्रमाणावर आढळते. पिसांचा रंग तांबडा आणि काळा असून चोच व पाय पिवळे असतात. नराचा तुरा लहान असून तो ताठ असतो. गलोल लहान असते. मातीमध्ये तुर्याला बारीक-बारीक पिसे असतात. मादीची अंडे देण्याचे प्रमाण सर्वसाधारण असून तिचे वजन दोन किलो असते. नराचे वजन दोन ते अडीच किलो असते.
टेनिस नेकेड नेक : या कोंबडीच्या गळ्याभोवती पिसे नसतात, म्हणून हिला नेकेड नेक असे नाव पडले. ही कोंबडी महाराष्ट्रात सर्वत्र सापडते. हिच्या आकार व रंगामध्ये विविधता आढळते. या जातीच्या नराचे वजन दोन किलो व मादीचे वजन दीड किलो असते.
पंजाब ब्राऊन : ही कोंबडी मुख्यत्वेकरून पंजाब, हरियाना या राज्यात सापडते. पिसाचा रंग तपकिरी असतो तर चोच व पाय पिवळे असतात. या कोंडबीच मांस चविष्ट असल्यामुळे तिचा खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कोंबडीपासून मिळणारी अंडी मध्यम आकाराची असून त्याचा रंग तपकिरी असतो. नराचे वजन तीन ते चार किलो असते तर मादीचे वजन दोन ते आडीच किलो असते.
विदेशी जाती : परदेशातून आणलेल्या जातींना विदेशी म्हणतात. उदा. व्हाईट लेगहानर, र्होड आयर्लंड इत्यादि जाती मिशनरी व युरोपियन लोकांनी येथे आणल्या अशा विदेशी जातींचे वर्गीकरण हलकी जात, दुहेरी जात, भारी जात अशा तीन भागात केले आहे.
हलकी जात : या वजनाला हलक्या असतात. खाणे कमी व अंडी जास्त अशी यांची स्थिती आहे. या कोंबड्या खुराड्यात कधी बसत नाही. वर्षभर ठराविक अंडी देतात त्यामुळे अंडी उत्पादनासाठी उपयुक्त, याची अंडी पांढरीशुभ्र, आकाराने मोठी आणि वजनाला भारी असल्याने गिर्हाईकांना आवडतात.
व्हाईट लेगहार्न : इटली या देशातील लेगहार्न खेड्यातून सर्वत्र पसरली. खाणे कमी व भारी वजनाची पांढरीशुभ्र अंडी या गुणामुळे व्यावसायिकांची आवडती बनली. ही कोंबडी दिसायाला पांढरीशुभ्र व आकाराने डौलदार आहे. तुरा एकेरी असून लालभडक असतो, नरामध्ये तो सरळ उभा असतो. कानाची पाळी पांढरी असते, पाय पिवळे असतात. शरीर त्रिकोणीकृत असते. शेपूट भरगच्च असून ती 45 अंशाचा कोन करून मागे वळलेले असते. नराचे वजन 2 ते 2.20 किलो असते तर मादीचे वजन 1 ते 1.5 किलो. वार्षिक अंडी देण्याचे प्रमाण 200 ते 250 असते.
ब्राऊन लेगहार्न : या कोंबडीची ठेवण, वजन आणि गुण जवळजवळ व्हाईट लेगहानरप्रमाणेच असतात पण दिसायला ही कोंबडी फारच आकर्षक असते. हिच्या पिसांचा रंग तपकिरी असतो. नरांचे शेपूट काळ्या रंगाच्या मिश्रणाने बनलेले असते. छाती आणि पोटाखालची काही पिसे काळी चकचकीत असतात.
ब्लॅक लेगहार्न : मोठे अंडे देण्यात ही कोंबडी प्रसिध्द आहे. हिचे पाय, चोच व कातडी काळी असते. तुरा व गलोल मोठे असून अंड्यावरच्या कोंबडीमध्ये तुरा एका बाजूला कललेला असतो. तुरा व्हाईट लेगहार्नपेक्षा मोठा असून त्याला सहा टोके असतात.
ब्लॅक मिनोर्को : ही कोंबडी एके काळी पांढरे शुभ्र मोठे अंडे घालण्यासाठी प्रसिध्द होती पण इतर जातींचा संकर केल्यामुळे हा गुण नाहीसा झाला. शरीराने व्हाईट लेगहार्नपेक्षा लहान असून सर्व पिसे काळीभोर असतात. चोच काळी असते, तुरा तांबडा असतो, कानाची पाळी पांढरी असून इतर कोंबड्यांपेक्षा मोठी असते. पूर्ण वाढ झालेल्या नराचे वजन 2 किलो तर मादीचे दीड किलो असते.
अंकोना : ही जात इटलीतील अंकोना गावात लेगहार्न जातीपासून निर्माण झाली आहे. पिसाचा रंग राखी असून यावर पांढरे ठिपके असतात. नराची पिसे हिरवट चकचकीत काळी असतात. पायाचा रंग पिवळा असून त्यावर हिरव्या रंगाची छटा असते व चोच पिवळी असते.
दुहेरी जात : दुहेरी म्हणजे अंड्यासाठी व मांसासाठी उपयोगी पडणारी जात. अशी कोंबडी बर्याचपैकी अंडी देते आणि वजनाला भारी भरत असल्यामुळे मांसाचा धंदा करण्याससुध्दा उपयोगी पडते. या गटात येणार्या जाती म्हणजे र्होड आयर्लंड रेड व ब्लॅक आस्ट्रोलार्प या आहेत.
हेही वाचा :
पावसाळ्यात घ्या कोंबड्यांची निगा
र्होड आयर्लंड रेड : या कोंबडीचे र्होड आयर्लंड या बेटावरून त्यांच नाव ओळखले जाते. ती अंड्यासाठी लेगहार्नच्या खालोखाल प्रसिध्द आहे. शिवाय वजनाला भारी असल्याने हिचा उपयोग मांसाचा धंदा करण्यासाठी केला जातो. कणखर जात असल्याने पावसाळी भागात टिकाव धरते. या कोंबडीचा आकार लांबट चौकोनी असून शरीर रूंद असते. पाठ चपटी, छाती भरदार असून पुढे आलेली असते. तुरा तांबडा असून एकेरी व गुलाबी अशा दोन प्रकारचा असतो. चोच गर्द तपकिरी असते. पिसाचा रंग तांबडा असून सर्वत्र सारखा पसरलेला असतो. शेपूट आखूड पण भरदार असून नरामध्ये ती खाली पडल्यासारखी असते. अंड्याचे वार्षिक प्रमाण दीडशे ते दोनशे असते. नराचे वजन 3 किलो व मादीचे वजन 2 ते 2.5 किलो असते.
ब्लॅक आस्ट्रोलार्प : ही दुहेरी उपयोगाची जात ब्लॅक आरपिंगटन या पोटजातीपासून निर्माण झाली आहे. हिची वाढ लंब असून शरीर शेपटीकडे उतरत गेलेले असते पिसे थोडी अंगाला चिकटून बसलेली असतात. तुरा एकेरी असतो. चोच काळी असते, पाय शिशासारखे काळे असतात. पिसांचा रंग चकचकीत काळा असून त्यावर हिरव्या रंगाची झाक असते. पावसाळई भागात ही जात चांगलाच टिकाव धरू शकते.
डॉ. देविकांत देशमुख डोंगरगावकर, प्रा. अनिकेत देशपांडे, प्रा. माणिक कल्याणकर, कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी जि. नांदेड. (मो. 94233140598)
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा