Bird-Flu बर्ड फ्लू रोग एव्हियन इनफ्लू्यंझा (AVN Influenza) नावाच्या विषाणूमुळे होतो. याच्या अ,ब,व क असे तीन उप-प्रजाती आहेत. यातील अ उपप्रकाराचे आणखी 16 एच् व 9 एन प्रकार आहेत. हा साथीचा रोग असून, यातील आतापर्यंत एच्-5 व एन्-1 प्रकारचे विषाणू मोठया प्रमाणात रोग फैलावण्यास तर एच्-3 काही प्रमाणात रोग फैलावण्यास कारणीभूत ठरले आहेत. सर्व प्रकारचे पक्षी, बदक, कोंबडया, पाणकोंबडी स्थलांतरीत जंगली पक्षी, लाव्ही, सस्तन प्राणी तसेच रोग (disease) वाहक म्हणून डुकरे या रोगास बळी पडतात. हा रोग प्रत्यक्ष संपर्काद्वारे अथवा अप्रत्यक्ष संपर्काद्वारे येतो यामध्ये बाधित पक्षाची विष्ठा, डोळयातील अश्रु्, नाकातील स्त्राव, खाद्य, पाणी, कपडे, भांडी, कीटक तसेच हवेतून इतर रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या पक्षांना होऊ शकतो.
मनुष्य प्राण्यास हा रोग (Bird-Flu disease) सहसा होत नाही. बाधित पक्षांच्या सतत संपर्कात असलेले व पक्षीघरात सतत काम करणाऱ्या व कमी रोग प्रतिकारक क्षमता असलेल्या व्यक्तींना हा रोग होऊ शकतो. तसेच संपर्कात येणारी लहान मुले यांनाही हा रोग होवू शकतो.

रोगाची लक्षणे : या विषाणूमुळे पक्षांमध्ये रोगबाधेचे प्रमाण 100 % तर मरतूकीचे प्रमाण काही टक्कयापासून 100 % पर्यंत आढळते. या रोगाची लक्षणे वेगवेगळया प्रकारची असतात. ही लक्षणे जात, वय, लिंग, रोगबाधेची तीव्रता, वातावरण यानुसार कमी-अधिक प्रमाणात वेगवेगळी असतात. रोगाची लक्षणे प्रामुख्याने श्वसनसंस्था, पचन संस्था, चेतना संस्था, पुनुरूत्पादन संस्था, पक्षांचा पंख नसलेला चेहऱ्याचा भाग यावर दिसून येतात. या रोगाने बाधित पक्षी खाद्य खाणे कमी करतात. पक्षाची पातल कवचाची अंडी उत्पादन टक्केवारी वाढते. अंडी उत्पादन घटते, विष्ठा हिरवी पातळ होते. बाधित पक्षांची संख्या वाढते श्वसन संस्थेवर सौम्य ते तिव्र स्वरूपाचा विपरीत परिणाम जाणवतो. पक्षांत खोकला, सर्दी होते, शिंका येतात. नाकातून चिकट, रक्तमिश्र्रीत स्त्राव वाहण्यास सुरूवात होते. श्वासोच्छवास घेताना स्त्रास होतो, घरघर आवाज येतो, पंख विस्कटलेली असतात. डोक्यावर, चेहऱ्यावर कातडीखाली द्राव साठल्याने चेहरा डोके सुजलेले दिसते. डोळे लाल होतात. डोळया भौवती विशिष्ट प्रकारची निळसर सुज येवून डोळे बंद होतात. पक्षी मलूल होऊन गुंगतात व अशक्त होतात. तुरा व गलोल भौवतीचा भागात रक्त साखाळते व तो काळसर किंवा जांभला पडतो. तोंडात चिकट स्त्राव दिसतो. अशा अवस्थेतील पक्षी काही तासात दगावतात, काही पक्षात चक्कर येणे, आंधळेपणा व लुळेपणा येणे, हागवण लागणे अशी लक्षणे दिसतात. पायावर, मांडीवर मांसल भागावर रक्ताळलेले डाग दिसतात. पहिले पोट व गिझार्ड च्या जोडावर लाल रक्तालले डाग असतात. श्वासनलिकेत चिकट द्राव असतो. श्वासनलिका आतुन पुर्णत: लालसर दिसते फुफुसावार असलेल्या हवेच्या पिशव्या पारदर्शक न राहता पांढरट पिवळट होतात त्यावर चिकट द्राव जमा होतो असे पक्षी दोन दिवसात मरतात.
रोग निदान : यासाठी एच.ए.एच.आय., ए.जी.पी.टी., इ.एल.आय.एस्.ए. प्रयोगशाळेत हे विषाणू वेगळे करून रोग निदान करता येते. प्रयोगशाळेत (एग् इनॉकुलेशन टेस्ट) उबवणूकीतील अंडयात घश्यातील स्त्राव, फुफुसातील स्त्राव टोचून या रोगाचे निदान करता येते.

प्रतिबंधक उपाय : आपल्या फार्मवर व्यवस्थापनाच्या दृष्टीने नियमितपणे खालील बाबीं प्रकर्षाने पाळल्या पाहिजेत.
1. पिल्ले चांगल्या हॅचरीतून घ्यावित ती निरोगी व सशक्त असावित.
2. बायोसिक्यूरीटी : पूर्वीच्या पक्षांचे उष्टे खाद्य वापरू नये, पूर्वी वापरलेली भांडी, शेड व इतर साहित्य निर्जतुक करून घ्यावे. बाहेरील पक्षी, माणसे, वाहणे, यांना प्रवेश बंदी करावी किंवा औषध फवारणी करून प्रवेश द्यावा.
3. शेडमध्ये वेळोवेळी निर्जतुकीकर औषधांचा फवारा करावा.
4. पक्षांवर ताण येऊ देऊ नये.
5. ताज्या, स्वच्छ व निर्जंतुक (Sterile) पाण्याचा पुरवठा करावा, शेड व परीसरात स्वच्छता ठेवावी.
6. उंदीर, मांजर कुत्री यांचा बंदोबस्त करावा.
7. वेळोवेळी लसीकरण (Vaccination) करावे.
8. मेलेल्या पक्षांची योग्य विल्हेवाट लावावी.
9. पक्षांच्या योग्य पोषणासाठी संतुलीत योग्य खाद्य द्यावे.
10. खाद्यातून व पाण्यातून योग्य वेळी योग्य ती औषधे वेळोवेळी प्रमाणात द्यावीत.
11. शेडमध्ये एकाच वयाचे पक्षी ठेवावेत.
12. शेडच्या चारही बाजू किमान 6 फूट लिटर काडी कचरा, गवत, कुजणारे पदार्थ, कोंबडयांची पंख यांचे पासून मुक्त व स्वच्छ असावे.
13. आपल्या परीसरात परसातील कोंबड्या, कावळे, घार, पोपट, पारवे व कबूतर मेलेले आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा.
उपचार : हा विषाणुजन्य रोग (Viral Disease) असल्यामुळे यावर उपचार नाहीत, तसेच पक्षी शेडच्या परिसरातील स्वच्छत: व निर्जतुकीकरण यावर भर द्यावा. पक्षांना रोग प्रतिकारक क्षमता कमी झालेने रोग होण्याची शक्यता असते, यासाठी औषधोपचार करावा. पक्षी सदृढ असल्यास व रोगप्रतिकारक क्षमता पुरेशी असल्यास इतर जीवाणूजन्य किंवा विषाणुजन्य रोग (Viral Disease) येणार नाहीत व एव्हीएन इन्फयुएंझा (बर्ड फ्लू) चा शिरकाव होणार नाही.
डॉ. प्रकाश वि. कदम, विषय विशेषज्ञ (पशुवैद्यक शास्त्र), कृषि विज्ञान केंद्र, सोलापूर.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇