यंदा वातारणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम फळबाग क्षेत्रावर झाला असून द्राक्ष व आंबा या फळबागांवर त्याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. वातावरणातील वाढलेले थंडीचे प्रमाण आणि सकाळी पडणारे दव यामुळे सध्या द्राक्ष बागांवर भुरी रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे.
यावर्षी सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे बागेत एकाच वेळी डाऊनी मिल्ड्यू प्रमाणेच भुरी रोगामुळे देखील द्राक्ष उत्पादनात मोठे नुकसान होते. अशा परिस्थितीमध्ये योग्य प्रकारे नियंत्रण मिळवण्यासाठी भुरी रोगाची लक्षणे अचूक ओळखता येणे आवश्यक आहे.
जाणून घ्या भुरी रोगाची लक्षणे : प्रतिकूल वातावरणामुळे इरिसिफे निकेटर या रोगकारक बुरशीचा प्रादुर्भाव द्राक्ष बागेवर होतो. या रोगाचा प्रादुर्भामुळे वेलीच्या सर्व हिरव्या भागावर होतो. मात्र बुरशीचे धागे प्रत्यक्ष वेलीच्या भागात प्रवेश न करता पृष्ठभागावरच वाढतात.
पानांच्या खालील बाजूस काळसर रंगाचे डाग दिसून येतात. सुरुवातीला पानावर पांढरट ठिपके व नंतर ते भुरकट होऊन संपूर्ण पान काळपट दिसते. वाढत्या प्रसारासोबत हे डाग मोठे व भुरकट रंगाचे होत जातात.
फुलोरा अवस्थेत रोगाची लागण झाल्यास फलधारणा होत नाही. फळ धारणेच्या वेळी प्रादुर्भाव असल्यास मणी लहान आकाराचे होतात. काही मणी अपरिपक्वच राहतात. पांढऱ्या रंगाच्या बुरशीचा थर मण्यांवर येऊन मणी तडकतात व फुटतात
पावसाळ्याच्या दिवसांत कमी पाऊस आणि ढगाळ वातावरणामध्ये वाऱ्यामार्फत भुरी रोगाचा प्रसार अधिक प्रमाणात होतो.
हेही वाचा :
द्राक्षावरील या खतरनाक रोगांचे असे करा नियंत्रण !
द्राक्षावरील मिलीबग्ज् (पिठ्या ढेकूण)चे असे करा नियंत्रण
थंडीत फळबागांची अशी घ्या काळजी
असे करा व्यवस्थापन : सद्यपरिस्थितीत टोपणगळ अवस्थेमध्ये असणाऱ्या व स्थानिक बाजारपेठेत जाणाऱ्या द्राक्ष बागेमध्ये भुरीच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही करशीनाशकांचा वापर करावा. अशा बागांमध्ये सायफ्लुफेनामाइड 0.5 मिलि प्रति लिटर पाणी किंवा फ्लुओपायरम टेब्यूकोनॅझोल संयुक्त करशीनाशक 0.563 मिलि प्रति लिटर पाणी किंवा फ्लुक्झापायरॉक्झाइड (75 ग्रॅम प्रति लिटर) अधिक डायफेनोकोनॅझोल (50 ग्रॅम प्रति लिटर) एससी (या फॉर्म्युलेशनचे संयुक्त बुरशीनाशक) 0.8 मिलि प्रति लिटर पाणी किंवा मेट्रॉफेनॉन 0.25 मिलि प्रति लिटर याप्रमाणे बुरशीनाशकांची फवारणी करावी.
बेदाणा उत्पादन घेणाऱ्या बागायतदार देखील भुरी नियंत्रणासाठी बुरशीनाशकांचा वापर करू शकतात. फळधारणा होत असलेल्या व निर्यातक्षम बागांमध्ये भुरीच्या नियंत्रणासाठी, सल्फर (40 एस. सी) 3 मिलि किंवा अम्पिलोमायसिस क्विसक्वॉलिस 5 मिलि प्रति लिटर याप्रमाणे वापर करावा लागणार आहे. भुरीचा प्रादुर्भाव अधिक असल्यास क्लोरीन डायऑक्साइड (50 पीपीएम) 2 मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी लागणार आहे.
फवारणी सर्व पाने आणि घडांवर एकसारखी होईल याची काळजी घ्यावी. जेणेकरून सर्व बुरशी नाहीशी होऊन पुढील प्रादुर्भाव टाळला जाईल. दर 15 दिवसांच्या अंतराने ट्रायकोडर्मा व बॅसिलस सबटिलिस डी आर – 39 ची 2 मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी व ड्रेचिंग करावे.
(संबंधित माहिती राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे येथील डॉ. सुजोय साहा यांच्या लेखातील आहे. कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसारच शेतकऱ्यांनी व्यवस्थापन करावे)
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा