कोणत्याही हंगामातील पेरणी ही शेतकऱ्यांसाठी महत्वाची वेळ असते. शुद्ध प्रतीचे व दर्जेदार बियाणे मिळवण्यासाठी प्रत्येक शेतकरी प्रयत्नशील असतो. पेरणीवेळी शेतकर्यांना बियाणांची उपलब्धता आणि बोगस बियाणे यांसारख्या संकटाला सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भारतीय बियाणे कायदा 1966 लागू करण्यात आला. या कायद्यानुसार अधिसूचित जातींचे उत्पादन व विक्री केली जाते. बियाणे अधिनियमांतर्गत विविध राज्यांमध्ये बिजप्रमाणिकरण यंत्रणा स्थापन करण्यात आल्या आहेत. बिजप्रमाणिकरण यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली बिजोत्पादन घेतले जाते. बियाणे उत्पादक कंपनी अधिसूचित व अधिसूचित नसलेल्या वाणांचे बिजोत्पादन करू शकते. अशाप्रकारे बाजारात प्रमाणित बियाणे व सत्यातादर्शक बियाणे विक्रीस असते.
बियाणांची निवड करण्यापूर्वी संलग्न कृषी विभागाशी संपर्क साधून नवीन सुधारित व संकरीत वाणांची माहिती घ्यावी. परवानाधारक विक्रेत्यांकडूनच बियाणांची खरेदी करावी. खरेदी करताना बीज प्रमाणिकरण यंत्रणेकडून प्रमाणित केलेल्या बियाणास प्राधान्य द्यावे. शक्यतो कृषी विद्यापीठे किंवा विद्यापीठाचे संशोधन केंद्राकडे बियाणे उपलब्ध असेल तर तेथूनच ते खरेदी करावे.
बियाण्याच्या पिशवीला बियाणे गुणवत्ता दर्शवणारी खुणचिठ्ठी (tag) लावलेली असते, ती नीट तपासून घ्यावी. या खूणचिठ्ठीवर बियाणांचा कमीत कमी मूल्याचा दर्जा दाखवणारी माहिती असते. बियाणाच्या प्रकारानुसार खुणचिठ्ठी चा रंगही वेगवेगळा असतो. पायाभूत बियाणांसाठी पांढऱ्या, मुलभूत बियाणांसाठी पिवळ्या, प्रमाणित बियाणांसाठी निळ्या तर सत्यप्रत बियाणांसाठी हिरव्या रंगाची खुणाचीठ्ठी असते. त्यावर पिकाचे नाव, जात आणि प्रकार, गट क्रमांक बीज परीक्षणाची तारीख उगवणशक्ती (%), शुद्धतेचे प्रमाण, बियाण्याचे एकूण वजन, विक्रेत्याचे नाव व पत्ता, बियाणे प्रमाणित करणाऱ्या अधिकार्याची सही आणि हुद्दा नमूद केलेला असतो. बियाण्याच्या पिशवीवर माहिती छापलेली असते ती वाचून व तपासून घ्यावी. बियाणाचे लेबलही तपासून घ्यावे. बियाणाची वैधता तपासणी दिनांकापासून नऊ महिने असते तर नुतनीकरण केलेल्या बियाणाची वैधता सहा महिन्यांपर्यंत असते.
बियाणे खरेदी करताना खरेदीची पक्की पावती घ्यावी. त्यावर शेतकऱ्याचे पूर्ण नाव, पिकाचे नाव, प्रकार, जात, प्लॉट नंबर त्याच बरोबर उत्पादकाचे नाव व विक्रेत्याची सही इत्यादींची नोंद करून घ्यावी. पावतीवर छापील पावती क्रमांक असल्याची खात्री करून घ्यावी. पावतीवर विक्रेत्याची व शेतकऱ्यांची सही वा अंगठा असल्याशिवाय पावती स्वीकारू नये. बियाणे पिशवीवर असलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने खरेदी करू नये. पिशवीवर किंमत छापणे कायद्याने बंधनकारक आहे. बियाणे पिशवीवर किमत छापलेली नसल्यास किंवा विक्रेता जास्त दराने विकत असल्यास, जिल्हा व तालुका स्तरावर कार्यरत असणाऱ्या वजनमाप निराक्षकाच्या निदर्शनास ही बाब आणून द्यावी.
बियाणाची पिशवी तिन्ही बाजूनी शिवलेली असावी तसेच वरील बाजूस प्रमाणपत्रासह शिवलेली असावी. पिशवी फोडताना ती खालील बाजूने फोडावी जेणेकरून पिशवीस असणारे लेबल व प्रमाणिकरण यंत्रणेची खुणचिठ्ठी व्यवस्थित राहील. पिशवी फोडल्यानंतर त्यात काही बियाणे नमुना स्वरुपात शिल्लक ठेवावे. सोबत खरेदीची पावती तसेच लेबल व खुणचिठ्ठी जपून ठेवावी. पेरणीनंतर खुणचिठ्ठीवरील प्रमाणापेक्षा उगवणक्षमता कमी आढळल्यास किंवा बियाण्यात भेसळ आढळल्यास बियाणे निरीक्षकाकडे लेखी तक्रार करावी. प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक नियुक्त केले असतात. तसेच शेतकरी तालुका कृषी अधिकारी कार्यालय , पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद कृषी विभागाकडे लेखी तक्रार करू शकतात. संबंधित विक्रेता व बियाणे उत्पादन कंपनी दोषी आढळल्यास बियाणे कायदा १९६६ मधील कलम १० नुसार कायदेशीर कार्यवाही होऊ शकते.
डॉ. अंबालिका चौधरी, डॉ. हिराकांत काळपांडे, डॉ. अंबिका मोरे कृषी वनस्पतीशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विदयापीठ, परभणी. Mo. 9834665965
👇 शेतीमित्र मासिकाचे फेसबुक पेज लाईक करा 👇
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 शेतीमित्र मासिकाचे इन्ट्राग्राम पेज जॉईन करा 👇
https://www.instagram.com/shetimitra03/
👇 शेतीमित्रच्या टेलीग्राम ग्रुपमध्ये सहभागी व्हा ! 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा
👇 👇 👇