अलिकडे वनशेतीच्या संदर्भात सुरू अर्थात कॅज्युरीना या वृक्षाचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. मूळच्या ऑस्ट्रेलियन खंडातील या वृक्षाचे नाव त्याची पाने कॅझॉवरी नावाच्या पक्षाच्या पंखासारखी नाजूक दिसत असल्यामुळे कॅज्युरीना पडले. या झाडाची पाने घोड्याच्या शेपटीच्या गुच्छाप्रमाणे दिसतात. म्हणून त्याला इक्विसीटी फोलिया असे म्हणतात. कॅज्युरीनासी कुळातील या वृक्षाचे कॅज्युरीना इक्विवसिटीफोलीया असे शास्त्रीय नाव आहे. हा वृक्ष शंखाकार वृक्षाच्या आकाराप्रमाणे (सूचीपर्णी) दिसत असला तरी तो सपुष्प वृक्षातील आहे. भारतात सुरूची नैसर्गिक जंगले नाहीत. रोपे लागवड करूनच रोपवने केलेली आहेत. किनारपट्टीच्या प्रदेशात सुरूची लागवड मोठ्या प्रमाणात केल्याचे दिसून येते. तसेच किनारपट्टीच्या प्रदेशातील ज्या वालुकामय जमिनी शेतीस उपयुक्त नाहीत, त्या जमिनीत सुरूची लागवड करता येते.
सुरू हे झाड सदाहरीत असून अत्यंत जलद व उंच वाढणारे आहे. सुरूच्या वाढीसाठी साधारण उष्ण व दमट तापमान चांगले असते. या झाडाची जोमाने वाढ होण्यासाठी 20 ते 35 अंश सेल्सिअस तापमानाची तसेच हवेत भरपूर आर्द्रतेची आवश्यकता असते. हा वृक्ष अत्यंत प्रखर सूर्यप्रकाशात चांगला वाढतो. कमी प्रकाशात किंवा सावलीच्या भागात ह्याची वाढ खुंटते. सोसाट्याच्या वार्यास हे झाड यशस्वीरित्या तोंड देते.
सुरूच्या लागवडीसाठी डोंगर उतारावरील जमीन, समुद्र किनार्यावरील वालुकामय जमीन, नदी, धरणे, कालवे, ओढे इत्यादी पाणथळ परंतु निचरा होणारी जमीन व चुनखडीयुक्त जमीन चालू शकते. साधारणत: हे झाड 350 ते 3200 मिमी पाऊस असलेल्या कोणत्याही प्रदेशात चांगले वाढते.
सुरूचे झाड सर्वसाधारणपणे दहा वर्षात 40 ते 60 फूट उंचीपर्यंत वाढू शकते. याचे खोड सरळ जलद वाढणारे असून साल तपकिरी रंगाची मोठ्या रेषा असलेली असते. हा वृक्ष पानझडी असून याची पाने सतत गळत असतात. सुरू झाडाची पाने अत्यंत लहान असून लहान लहान फांद्या साधारण 10 ते 50 जोड असणार्या खोडापासून फुटतात. त्या रंगाने हिरव्या असतात आणि पानांचे कार्य करतात. याची फुले तांबड्या रंगाची असतात. सुरूला वर्षांतून दोनदा फुलांचा बहार येतो. पहिला फुलांचा बहार फेब्रुवारी ते मार्च आणि दुसरा बहार सप्टेंबर ते ऑक्टोंबरच्या सुमारास येतो. फुले एकलिंगी व फळे गोल लांबट, काटेरी हिरव्या रंगाची असतात. हिरवी फळे पक्व झाल्यावर तपकिरी रंगाची होतात. फळे जून अथवा डिसेंबर महिन्यात पक्व होतात. पक्व फळांच्या पातळ पाकळ्या उमलताच त्यातून पातळ पापुद्रयासारखे लहान ‘बी’ बाहेर पडते.
रोपनिर्मिती तंत्रज्ञान : ‘बी’ जमा करण्यास फळे झाडावरून गोळा करावी लागतात. तीन ते चार दिवस उन्हात वाळविल्यानंतर त्यातील बिया फुटून आपोआप वेगळ्या होतात. पहिल्या सहा महिन्यापर्यंत बियांची उगवणक्षमता चांगली असते व त्यानंतर ती कमी होत जाते. सुरूच्या बिया खूप लहान असतात. एका किलोमध्ये आठ ते दहा लाख बिया असतात. त्यांची सरासरी उगवणक्षमता फक्त 50 टक्के आहे. ‘बी’ पेरणी अगोदर 10 ते 12 तास उन्हात वाळवावे किंवा काही एक तास गरम पाण्यात भिजत ठेवून काढाव्यात. मुंग्यापासून बियांचे रक्षण करण्यासाठी त्या राखेत मिसळून मातीच्या भांड्यात ठेवाव्यात.
सुरूची लागवड रोपवाटिका पद्धतीने किंवा रोपणी पद्धतीने करतात. रोपवाटिकेसाठी जागा निवडताना ती रस्त्याच्या जवळ, पाण्याची व्यवस्था असलेली तसेच प्रखर सूर्यप्रकाश व वादळापासून रोपांना सुरक्षित ठेवता येईल आणि जनावरांपासून संरक्षण मिळण्यासाठी कुंपण असणारी असावी. रोपवाटिकेसाठी निवडलेली जागा पाण्याचा निचरा होणारी कसदार व तणांचा त्रास न होणारी असावी. निवडलेली जमीन नांगरून भुसभुशीत करावी. जमिनीचा उतार पाहून काम करण्यास योग्य अशा प्रकारचे गादीवाफे तयार करावे व त्यावर शेणखत पसरवून मिसळावे. सुरूचे बी पेरल्यानंतर लालमुंग्या लागू नयेत म्हणून वाफ्यावर मोरचुदाचे विरळ द्रावण शिंपडावे किंवा मिथील पॅरॅथिऑनची पावडर टाकावी. तयार केलेली गादीवाफ्यावर नोव्हेंबर महिन्यात एक भाग ‘बी’ व तीन भाग बारीक वाळू एकत्र करुन पेरणी करावी. ‘बी’ हलके असल्याने व पाण्याने वाहून जाऊ नये म्हणून त्यावर हलकेच गवताच्या काड्या किंवा पेंढा पसरावा व त्यामुळे बियांच्या रूजण्यास ओलावा टिकतो. ‘बी’ रूजेपर्यंत रोज झारीने पाणी द्यावे. आठ ते दहा दिवसात ‘बी’ रूजण्यास सुरूवात होते. ‘बी’ रूजण्यास सुरूवात होताच गवत काढून टाकावे. रोपे तीन ते पाच सें.मी. उंच झाल्यावर गादी वाफ्यातून अलगद काढून पिशवीत रोपणी करावी. साधारणत: दोन ते तीन महिन्यात रोपे 30 ते 45 सें.मी. उंच झाल्यावर पुनर्लागवडीसाठी योग्य झाली असे समजावे. गादी वाफ्यावर बियाणे पेरण्याऐवजी सरळ पिशवीसुद्धा रोपे तयार करता येतात. पण या पद्धतीत अधिक बियाणे लागते.
लागवड : कोरडवाहू जमिनीत पावसाळ्याचे सुरूवातीस लागवड करणे आवश्यक आहे. समुद्रकिनारी रेताड जमिनीत लागवड करायची असेल तर दोन बाय दोन मीटर अंतरावर करावी. डोंगराळ भागात तीन बाय चार किंवा दोन बाय चार मीटर अंतरावर लागवड करावी. लागवडीआधी 30 बाय 30 बाय 30 सें.मी. आकाराचे खड्डे खोदून प्रत्येक खड्ड्यात शेणखत व मातीचे मिश्रण भरून घ्यावे. खड्डे भरताना मातीत 10 ते 15 ग्रॅम मिथील पॅरॅथिऑनची पावडर टाकावी. सुरूमध्ये पहिली दोन ते तीन वर्षे आंतरपिके घेता येतात. मात्र आंतरपिके घेण्यासाठी रोपातील अंतर अधिक ठेवावे.
पहिली दोन ते तीन वर्षे सिंचनाची व्यवस्था असल्यास रोपांची वाढ होण्यास मदत होते. उन्हाळ्यात मार्च महिन्यापासून पाऊस पडेपर्यंत पाणी देण्याची व्यवस्था करावी. त्यानंतर त्याची नैसर्गिकरीत्या वाढ होते. सुरू वृक्षाचे आयुष्यमान 25 ते 30 वर्षे ठरवण्यात आले आहे. लागवडीनंतर दोन ते तीन वर्षे वखरणी व भर दिल्यास झाडाच्या वाढीसाठी फायद्याची आहे. तसेच झाडाच्या सभोवती असलेले गवत व तण काढणेही आवश्यक आहे.
व्यवस्थापन : किनार्यालगतच्या प्रदेशात ही वनस्पती जोमाने वाढते. सुरू ही अत्यंत जलद वाढणारी वृक्ष जात आहे. लागवडीनंतर प्रतिवर्षी आठ ते दहा फूट वाढ होते. हे झाड 60 ते 90 फुटांपर्यंत वाढू शकते. सुरूवातीच्या चार ते पाच वर्षांपर्यंत सुरू वृक्षांची सरळ वाढ होण्यास जमिनीलगतच्या फांद्या तोडाव्यात. झाडांची गोलाई जास्त पाहिजे असल्यास विरळणी करणे गरजेचे आहे. पाच ते आठ वर्षांनंतर झाडाची विरळणी करता येते. प्रत्येक विरळणीत वासे मिळतात. हे वासे इमारत बांधकामाला वापरण्यास योग्य असतात.
उत्पन्न : घन लागवडीमध्ये जळाऊ लाकडाचे प्रतिवर्षी 10 ते 20 टन प्रति हेक्टर प्रमाणे उत्पादन मिळते. मुबलक प्रमाणात पाणी असणार्या जमिनीत प्रतिवर्षी 50 टन प्रतीहेक्टर पर्यंत उत्पादन मिळते.
हेही वाचा : सागाची जलद वाढ होण्यासाठी
फायद्याच्या बांबू शेतीचे लागवड तंत्र
उपयोग : सुरूचे लाकूड अत्यंत टणक, वजनदार व काम करावयास कठीण असते. लाकूड चिरटते म्हणून कापीव लाकूड वापरात आणले जात नाही. तथापि सुरूचे वासे घर बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात उपयोगात आणले जातात. वालुकामय जमिनीत व समुद्रकिनार्यावर वाहत्या वार्यापासून संरक्षण करण्यासाठी तसेच वाळूपासून होणारी धूप थांबवण्याच्या दृष्टीने सुरू लागवडीचा उपयोग अत्यंत महत्त्वाचा आहे. एक किलोग्रॅम लाकडापासून 4950 किलो कॅलरीज उष्णता मिळते. अर्धवट ओलसर लाकूडसुद्धा चांगले जळते. लाकडापासून चांगल्या प्रतीचा कोळसा तयार होतो. सुरूच्या सालीत चार ते एक टक्के टॅनिन आहे. त्यामुळे कातडी कमावण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. तसेच साल जाळी रंगविण्यासाठी वापरतात. साल व मुळांचा उपयोग पोटदुखीवर औषध म्हणून होतो. सुरूचे लहान वासे लगदा करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात वापरतात. सुरूच्या लगद्यापासून पुठ्ठा व हलक्या प्रतिचा कागद तयार करता येतो.
रोग व कीड व्यवस्थापन : रोपवाटिकेत बुरशीमुळे मुळे कुजून रोपे मरतात. त्यासाठी बावीस्टीन 0.2 टक्क्याचे द्रावण रोपांच्या मुळांशी ओतावे. किडींमध्ये वाळवी, नवीन फूट खाणारी अळी, नाकतोडे, उकरी इत्यादींचा प्रादुर्भाव होतो. वाळवीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस 0.5 मिली प्रतिलिटर प्रमाणे द्रावण मुळांजवळ ओतावे. नाकतोडे, नवीन फूट खाणारी अळी, उकरी इत्यादीसाठी डायक्लोरोवॉस 0.1 चे द्रावण वापरावे. मोठ्या झाडांना मुळे किंवा खोड पोखरणारी अळी, सागाची साल खाणारी अळी इत्यादी किटकांचा त्रास होऊ शकतो. त्यासाठी डायक्लोरोवॉसचा उपयोग करून बंदोबस्त करावा.
डॉ. संजय भावे वनशास्त्र विद्यालय, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा