दरातील चढउतार आणि औषध फवारणीसाठी वाढलेला खर्च यामुळे महाराष्ट्रील टोमॅटो उत्पादनात शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागलेला आहे. हवामानातील बदलाचा मोठा परिणाम टोमॅटो उत्पादनावर झाला आहे. सध्या टोमॅटोचे उत्पादन कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती निर्माण झाल्याने त्यातून मिळणारा फायदा मात्र कमी झालेला आहे. याचे मुख्या कारण आहे; ते टोमॅटोवर पडणारे विविध रोग ! या रोगाच्या यशस्वी नियंत्रणावर कसे करता येईल ? हा खरा प्रश्न आहे.
कमी खर्चात जास्त उत्पादन काढण्यासाठी टोमॅटोवरील कीड-रोगांचा वेळीच प्रादुर्भाव रोखल्यास ते शक्य आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित भाजीपाला सुधार प्रकल्पातील शास्त्रज्ञ एस. व्ही. कल्याणकर यांनी सांगितलेल्या काही टिप्स् दिल्या आहेत.
त्यांच्या मते, महाराष्ट्रात भाजीपाला पिकांचे उत्पादन हे मुळातच कमी प्रमाणात आहे. तसेच भाजीपाला पिकांचे उत्पादन घटण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव हेच आहे. त्यातही रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास त्याचे नियंत्रण करणे कठीण होते. परिणामी उत्पादनात त्याचे प्रमाणे मालाच्या गुणवत्तेतही फरक पडतो.
टोमॅटोवरील बुरशीजन्य रोग : या पिकावर प्रामुख्याने बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो. बुरशीजन्य रोगांमध्ये प्रामुख्याने कंबरमोड किंवा रोपे कोलमडणे किंवा मर किंवा ठिपक्याचा समावेश होतो. हा रोग जमिनीतील एक किंवा अनेक बुरशीमुळे होतो. वाफ्यात पाणी साचून राहिल्यास व रोपांची दाटी झाल्यास रोग झपाट्याने वाढतो. या रोगामुळे रोपांची मुळे कुजतात, सडतात व रोपे निस्तेज होऊन एका आठवड्याच्या आत मोठ्या प्रमाणावर कोलमडतात किंवा माना खाली टाकतात.
उपाययोजना : रोपे गादीवाफ्यावर तयार करावीत. वाफ्यात रोपांची दाटी होणार याची काळजी घ्यावी. वाफ्यात पाण्याचा योग्य निचरा, पेरणीपूर्वी बियाण्यास कॅप्टॉन किंवा थायरम किंवा बाविस्टिन आडीच ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. तसेच पेरणीपूर्वी एक आठवडा अगोदर गादी वाफ्यावर ट्रायकोडर्मा व्हिरिडी ही बुरशी प्रति चौरस मिटरला 200 ग्रॅम या प्रमाणात एक किलोग्रॅम कुजलेल्या शेणखतामध्ये ट्रायकोडर्माची भुकटी मिसळून वाफ्यात मिसळून द्यावे.
टोमॅटोवरील मर रोग : साधारणपणे ज्या जमिनीत हे पीक वारंवार घेतले जाते, त्या जमिनीत या रोगाचा प्रसार फार मोठ्या प्रमाणात होतो. या रोगामुळे झाडाच्या पानाच्या शिरा पिवळ्या पडून जमिनीलगतची पानेही पिवळी पडतात. पानाच्या कडा वरच्या बाजूने वाळतात. पुढे फांद्याही वाळतात. रोगग्रस्त झाडाचे खोड उभे चिरल्यास खोडाचा गाभा व मुळ्यांच्या आतील भाग काळसर तपकिरी रंगाचा दिसतो.
उपाययोजना : पिकांची फेरपालट करावी. रोगास प्रतिकारक जातीचा वापर करावा.
टोमॅटोवरील लवकर येणारे ठिपके (करपा) : हा रोग अल्टरनेरिया सोलानी या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव रोपे तयार करण्यापासून ते पीक तयार होण्याच्या कालावधीत अनुकूल हवामानात केव्हाही येऊ शकतो. या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्यास 70 ते 80 टक्के पर्यंत नुकसान होते. पानांच्या वरील बाजूस लहान मोठ्या अकाराचे तपकिरी, काळपट गोलाकार ठिपके पडतात. कालांतराने हे ठिपके आकाराने वाढून एकमेकात मिसळतात व पानावर अनियमीत आकाराचे ठिपके होऊन पाने करपल्यासारखी दिसतात. या ठिपक्याच्या मध्यभागी गोल वलयांकित रेषा आढळतात. जमिनीलगतच्या खोडावर देखील काळे चट्टे पडतात व संपूर्ण झाड रोगग्रस्त बनते. दमट उबदार हवामानात हा रोग बळावतो.
उपाययोजना : रोगट झाडापासून तयार झालेले बी वापरू नये, पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम किंवा बाविस्टिन किंवा कॅप्टॉन दोन ते तीन ग्रॅम प्रति किलोस प्रक्रिया करावी. पीक पाच ते सहा आठवड्याचे झाल्यावर डायथेन एम-45, 1500 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 1250 ग्रॅम 500 लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण पंधरा दिवसांच्या अंतराने फवारावे.
टोमॅटोवरील उशीरा येणारा करपा (ठिपके) : या रोगामुळे गर्द तपकिरी किंवा काळसर रंगाचे अनियमित आकाराचे ठिपके पानावर दिसतात. या रोगाचे प्रमाण सुरूवातीस खालील पानावर दिसतात. या रोगाचे प्रमाण सुरूवातीस खालील पानावर मोठ्या प्रमाणात आढळून येते. अशाच प्रकारचे ठिपके खोडावर तसेच फळावरही दिसतात. ठिपक्याचा तेवढाच भाग तांबूस होत नाही व बाकीचा टोमॅटो पिकतो. अशी फळे काही वेळेस आतून सडतात.
उपाययोजना : या रोगाच्या नियंत्रणासाठी झायनेब किंवा मॅकोझेब किंवा डायफोलॅटॉन या बुरशीनाशकाची प्रति हेक्टरी 1500 ग्रॅम 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
टोमॅटोचे फळे सडणे : जमिनीतील फायटोफथोरा बुरशीमुळे या रोगाची लागण जमिनीलगत असलेल्या फळावर खालच्या बाजूने होते. अशी फळे बीलबीलीत होऊन सडतात.
उपाययोजना : झाडांना आधार देऊन, फळे जमिनीस टेकणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच शेतात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी.
टोमॅटोवरील विषाणूजन्य रोग : पाने कुरळी होणे (लिफ कर्ल) : टोमॅटो पिकाचा हा एक अत्यंत महत्वाचा रोग असून जेथे-जेथे पीक घेतले जाते, त्या सर्व ठिकाणी कमी जास्त प्रमाणात हा घातक रोग उद्भवतो. हा रोग निकोटिनीया 16 व निकोटिनीया 10 या विषाणूमुळे होतो. शेतात सहजपणे दिसणारे लक्षण म्हणजे पाने कुरळी होणे, नवीन येणारी पाने आकाराने लहान होणे आणि त्यांच्या पृष्ठभागावर बारीक फोडासारख्या गाठी तयार होणे अशी लक्षणे दिसतात. बी उगवल्यानंतर आठवड्याच्या आत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास रोपाची वाढ खुंटते व फळधारणा कमी होते. पाने पिवळसर पडतात. फळे लहान राहतात. रोगाची तीव्रता वाढल्यास पाने कुरळी होऊन चुरगळल्या सारखी दिसतात.
उपाययोजना : रोगप्रतिबंधक बियाणे व जमिनीची निवड करावी. रोगाचा फैलाव किटकामार्फत होत असल्यामुळे या किडींचे नियंत्रण करण्यासाठी गादीवाफा बी पेरताना फोरेट दाणेदार किटकनाशक वापरावे व नंतरच बियाणे पेरणी करावी. लागवडीच्यावेळी प्रती हेक्टरी दहा किलो दाणेदार फोरेट किटकनाशक वापरावे.
टोमॅटोवरील केवडा (टोमॅटो मोझॅक) : हा रोग विविध चार प्रकारच्या घातक लसी (विषाणू) पासून होऊ शकतो. सर्वसाधारणपणे पाने कमी अधिक प्रमाणात पिवळसर हिरवे, गडद हिरव्या रंगाचे भाग दिसतात. रोगट पाने आकसतात. आकाराने लहान राहतात. पानाच्या शिरा जाड होतात. या रोगाचा प्रसार किडीद्वारे होतो.
उपाययोजना : रोगट झाडे नष्ट करावीत. शेत तणविरहीत ठेवावे. किडीच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही किटकनाशके दर बारा ते पंधरा दिवसांनी पिकावर फवारावीत.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
यशस्वी मिरची उत्पादनासाठी या दोन रोगावर मिळणा नियंत्रण
जाणून घ्या टोमॅटो उत्पादन तंत्रज्ञान !
हेक्टरी ६० टन टोमॅटो उत्पादन तंत्रज्ञान
टोमॅटोवरील अणूजीवामुळे होणारा खैर्या रोग : हा रोग कोरीने बॅक्टेरियम मिचीगनेन्यास या अणुजीवामुळे होतो. रोगामुळे पानावर व फळांवर तपकिरी रंगाची खवले दिसतात. ते हाताला खडबडीत लागतात. फळाची प्रत बिघडते. बाजारात चांगली किंमत येत नाही. दमट, ओलसर हवामानात रोगाची वाढ झपाट्याने होते. पावसांच्या तुषाराद्वारे तसेच लीफ मायनर या किडीद्वारे या रोगाचा शेतात दुय्यम प्रसार होतो.
उपाययोजना : रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ताम्रयुक्त बुरशीनाशक 20 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पिकाची फेरपालट करावी. पिकाचे रोगट अवशेष गोळा करून नष्ट करावीत.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1