कांद्याचे सरासरी उत्पादन इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. याची अनेक कारणे आहेत; त्यापैकी महत्त्वाचे कारण म्हणजे कांदा या पिकावर पडणारे रोग हे आहे. विशेषत: कांद्यावरील काही रोगाचा परिणाम त्याच्या साठवणीवर होतो. त्यामुळे नुकसान वाढते. मात्र रोगाचे वेळीच नियंत्रण केल्यास कांदा उत्पादनात चांगलचा फरक पडतो.
कांदा पीकावर प्रामुख्याने मर, काळा करपा, पांढरी सड, मूळकूज, सूत्रकृमी, तपकिरी करपा, केवडा, मानकूज, काळी बुरशी, निळी बुरशी, विटकरी सड, काजळी आदी रोग पडतात.
मररोग : हा रोग स्क्लेरोशियम रॉल्फसी नावाच्या बुरशीमुळे होतो. यामुळे रोपे पिवळी पडतात. जमिनीलगतच्या रोपांचा भाग मऊ पडतो आणि रोपे कोलमडतात व नंतर सुकतात. या रोगामुळे रोपांचे 10 ते 90 टक्के नुकसान होते. लागवडीनंतर हा रोग कांद्याच्या शेतातदेखील मोठ्या प्रमाणात पसरतो. खरीप हंगामातील हवामान या रोगास अनुकूल असते. अधिक आर्द्रता व 24 ते 30 अंश सें. तापमान या रोगाच्या बुरशीच्या वाढीस उपयुक्त ठरते.
उपाय : पेरणीपूर्वी बियांना डायथिथोकार्बामेट किंवा कार्बोक्सिन हे औषध दोन ते तीन ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात चोळावे. रोपे नेहमी गादी वाफ्यावर तयार करावीत. रोपवाटिकेची जागा प्रत्येक वेळी बदलावी. एवढे करून रोगाचा प्रादुर्भाव दिसलाच तर दोन रोपांच्या ओळीत कॅप्टन किंवा कार्बोक्सिनचे द्रावण ओतावे, 20 ग्रॅम औषध 10 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे.

काळा करपा : महाराष्ट्रात खरीप हंगामात या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. हा रोग कोलिटोट्रायकम ग्लेओस्पोराईडस् नावाच्या बुरशीमुळे होतो. सुरूवातीला पानाच्या बाहेरील बाजूंवर व बुडख्याजवळील भागावर राखाडी रंगाचे ठिपके दिसतात. त्यावर बारीक गोलाकार आणि उठावदार ठिपके वाढू लागतात. ठिपक्यांचे प्रमाण वाढल्यामुळे पाने वाळतात. एकापाठोपाठ पाने वाळत गेल्यामुळे कांद्याची वाढ होत नाही. खरीपातील दमट आणि उबदार हवामानात या रोगाच्या बुरशीची वाढ झपाट्याने होते. पाण्याचा निचरा न होणे, ढगाळ वातावरण आणि सतत झिमझिम पडणारा पाऊस यामुळे रोगाचे प्रमाण वाढते व माना लांब होतात. या रोगाची सुरूवात फुलकिड्याने पातीवर केलेल्या जखमेमुळे होते. म्हणून या फुलकिड्यांचे नियंत्रण केल्यास हा रोग लवकर आटोक्यात येतो.
उपाय : मॅन्कोझेब (0.3 टक्के) 30 ग्रॅम किंवा कार्बेन्डॅझिम (0.2 टक्के) 20 ग्रॅम औषध 10 लिटर पाण्यात मिसळून दर 12 ते 15 दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारावे. पुर्नलागण करताना रोपे कार्बेन्डॅझिम किंवा क्लोरोथॅलोनिल (कवच) या औषधाच्या 0.2 टक्के द्रावणात बुडवून घ्यावीत. रोपे गादीवाफ्यावर तयार करावीत. बी पातळ पेरावे. रोपातील गवताची खुरपणी त्वरीत करावी. लागवड सरीवरंब्यावर करावी. वरंब्यावर रोपे दोन्ही बाजूवर एकाच ओळीत लावावीत. बाजूवर दोन व वरंब्याच्या माथ्यावर एक अशी लागवड करू नये त्यामुळे रोपांची दाटी वाढते व रोगाचे प्रमाणदेखील वाढते.

पांढरी सड : हा रोग स्क्लोरोशियम रॉल्फसी या बुरशीमुळे होतो. ही बुरशी पुर्नलागण केलेल्या रोपांच्या मुळावर वाढते. रोपांची किंवा झाडांची पाने जमिनीलगत सडतात. पानांचा वरचा भाग पिवळा पडतो. वाढणार्या कांद्याला मुळे राहत नाहीत. कांद्यावर कापसाप्रमाणे बुरशी वाढते. त्यावर पांढरे दाणे तयार होतात. कांदा सडतो. पांढर्या सडीचा प्रादुर्भाव पुर्नलागवडीनंतर लगेच झाला तर कांदा पोसत नाही. कांदा तयार झाला असेल तेव्हा कांदा सडतो. खरीप तसेच रब्बी हंगामातही या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. पाण्याचा निचरा चांगला न होणार्या शेतात या रोगाची तीव्रता अधिक असते. या रोगामुळे 50 ते 60 नुकसान होऊ शकते. या रोगाची बुरशी जमिनीत बरीच वर्षे राहू शकते.
उपाय : रोपाच्या माध्यमातून तसेच पूर्व हंगामातील कांदा पिकामधून या बुरशीचा प्रसार होतो. मररोग होऊ नये म्हणून जे उपाय केले जातात, त्यामुळे हा रोग टाळता येतो. एकाच शेतात वर्षानुवर्षे कांद्याची लागवड करू नये. कांद्याची तृणधान्यासोबत फेरपालट करावी. खरीपातील लागवड नेहमी पाण्याचा चांगला निचरा होणार्या जमिनीत करावी. रोपांची मुळे लागवडीपूर्वी कार्बेन्डॅझिम द्रावणात एक ते दोन मिनीटे बुडवून घ्यावीत. त्यासाठी 20 ग्रॅम कार्बेन्डॅझिम 10 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे.
मूळकुज : हा रोग बहुतेक कांदा उत्पादक भागात आढळतो. विशेषत: अधिक तापमान आणि आर्द्रता असणार्या भागात या रोगाची तीव्रता अधिक असते. हा रोग फ्युजेरियम ऑक्सिस्पोरम या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे कांद्याची पाने पिवळी पडतात व पिवळेपणा बुडख्याकडे वाढत जातो. नंतर पाने सुकून कुजतात. महाराष्ट्रात खरीप हंगामात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात या रोगाची तीव्रता सर्वाधिक असते.
उपाय : या रोगाची बुरशी जमिनीत राहते. त्यामुळे पिकाची फेरपालटकरणे महत्त्वाचे ठरते. जमिनीची खोल नांगरट करून उन्हाळ्यात तापू द्यावी. थायरम हे बुरशीनाशक चोळून बी पेरणे. (एक किलो बियांसाठी दोन ग्रॅम थायरम हे प्रमाण वापरावे.)
तळकुजव्या (बेसल रॉट) : फ्युजेरियम ऑक्सिस्पोरम या जमिनीत राहणार्या बुरशीमुळे होतो. जमिनीत अधिक ओलावा, कांदे काढणीचे वेळ पाऊस प्रसार होतो. बिजोत्पादनक्षेत्रातही या रोगाचा प्रादुर्भाव होतो. या रोगाची सुरूवात पाती पिवळी पडून होते. रोपांची वाढ थांबून पात हळूहळू सुकू लागते आणि सडण्याची क्रिया सुरू होऊन नंतर जमिनीखालील भाग सडून पूर्ण रोप मरून जाते.
उपाय : एक वर्षासाठी पिकाची फेरपालट करावी. ट्रायकोर्डमा विरिडी जैविक बुरशी 1250 ग्रॅम प्रति 125 किलो शेणखतात मिसळून कांदा लावण्याच्या अगोदर शेतात मिसळावी. कार्बेन्डॅझिम प्रतिलिटर एक ग्रॅम या प्रमाणात द्रावण तयार करून त्यामध्ये बिजोत्पादनासाठी लावावयाचे कांदे दहा मिनीटे बुडवून नंतर लावावे. कार्बेन्डॅझिम किंवा बेनलेट एक ग्रॅमप्रमाणे किंवा कॅप्टान दोन ग्रॅम प्रतिलिटर प्रमाणे कांदे काढणीच्या 20 आणि 10 दिवस अगोदर पिकामध्ये फवारणी केल्यास साठवणीत या रोगाचा प्रसार होत नाही.
कंद व खोड कुजविणारे सूत्रकृमी : डिटीलिंकस डिपसॅसी या नावाच्या सूत्रकृमीमुळे कंद किंवा खोड कुजते. झाडाच्या कोणत्याही अवस्थेत सूत्रकृमींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. सूत्रकृमींचा प्रसार कांद्याचे बी, कांद्याच्या पाती, सडके कांदे यामार्फत होतो. कृमींचा प्रादुर्भाव झाला तर कंदाच्या वरच्या भागाजवळील म्हणजे मानेजवळील पेशी मऊ होतात. हळूहळू कृमी कांद्यामध्ये शिरतात. त्यामुळे पेशी मऊ होऊन सडतात व कांद्याला एक प्रकारचा घाण वास येतो. महाराष्ट्रात खरीप हंगामात पाण्याचा निचरा न होणार्या जमिनीत नुकसान जास्त होते.
उपाय : तृणधान्यासोबत पिकाची फेरपालट करावी. खरीपात निचरा होणार्या हलक्या जमिनीत कांद्याची लागवड करावी.
जांभळा करपा : हा रोग अल्टरनेरिया पोराय या बुरशीमुळे होतो. हा रोग पिकांच्या कोणत्याही अवस्थेत येतो. पानावर सुरूवातीस खोलगट, लांबट, पांढुरके चट्टे पडतात. चट्ट्यांचा मधला भाग सुरूवातीस जांभळट व नंतर काळपट होतो, असे अनेक चट्टे पाने किंवा फुलांच्या दांड्यावर पडतात. अनेक चट्टे एकमेकांत मिसळून पाने करपतात, वाळतात. झाडाच्या माना मऊ पडतात. जांभळा करप्याचे प्रमाण खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात असते. रांगडा हंगामातील कांद्यावरही या रोगाचा प्रादुर्भाव होतो.
उपाय : मॅन्कोझेब (0.3 टक्के) 30 ग्रॅम किंवा कार्बेन्डॅझिम (0.2 टक्के) किंवा क्लोरोथॅलोनिल (0.2 टक्के) 20 ग्रॅम औषध 10 लिटर पाण्यात मिसळून दर 12 ते 15 दिवसांच्या अंतराने फवारावे. थायरमसोबत बिजप्रक्रिया करावी. फवारणीसोबत चिकटद्रव्याचा वापर करावा. नत्रयुक्त खतांचा जास्त आणि उशीरा वापर करू नये. पिकांची फेरपालट करावी.

करपा : अल्टरनेरिया पोराई या नावाच्यामुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव आर्द्र हवामान, तापमान 28 ते 30 अंश सें. आणि आर्द्रता 80 ते 90 टक्के असल्यास मोठ्या प्रमाणात होते. एकसारखा पाऊस किंवा ढगाळ वातावरण असल्यास रोगाचा प्रसार झपाट्याने होतो. हा रोग कांद्याची पात तसेच फुलांच्या दांड्यांवर येतो. या रोगाची तीव्रता खरीप हंगामात अधिक राहते. दोन ते तीन वर्षासाठी फेरपालट करावी.
उपाय : मॅन्कोझेब बुरशीनाशक अडीच ग्रॅम प्रतिलिटर किंवा कवच किंवा रोवराल दोन ग्रॅम प्रतिलिटर याप्रमाणे द्रावण तयार करून 10 दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारणी करावी. द्रावणात चिकट पदार्थ जसे इंडट्रान किंवा सॅडोविट सहा मिली प्रति 10 लिटर या प्रमाणात अवश्य मिसळावे, ज्यामुळे रोगांपासून अधिक चांगले नियंत्रण मिळेल.
तपकिरी करपा : हा रोग स्टेम्फिलियम व्हॅसिकॅरियम या नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव कांदा पिकावर तसेच बियाण्याच्या पिकावर मोठ्या प्रमाणात होतो. पिवळसर, तपकिरी रंगाचे लांबट चट्टे पानाच्या बाहेरील भागावर दिसू लागतात. चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात. फुलांच्या दांड्यावर हा रोग आल्यास फुलांचे दांडे मऊ होतात व त्या जागी वाकून मोडतात. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने रब्बी हंगामात होतो.
उपाय : वातावरण उपयुक्त ठरत असल्यामुळे बुरशीनाशके प्रभावीपणे काम करू शकत नाहीत. तरीही पिकांची फेरपालट, बिजप्रक्रिया, रोपे लावताना कार्बेन्डॅझिमच्या द्रावणाचा वापर इत्यादी बाबींमुळे रोगाची तीव्रता कमी करता येते. दर 12 ते 15 दिवसांच्या अंतराने 0.2 टक्के कार्बेन्डॅझिमची फवारणी करावी. फवारणीमध्ये चिकट द्रावाचा वापर अवश्य करावा.
हेही वाचा :
उत्तमप्रतिच्या कांदा बियाण्यासाठी हे वापरा कांदा बिजोत्पादन तंत्रज्ञान
कांद्याच्या जाती आणि किड रोग व्यवस्थापन
लसूण पीक उत्पादनाचे तंत्रज्ञान
केवडा : परनोस्पोरा डिस्ट्रक्टर या नावाच्या बुरशीमुळे केवडा रोग होतो. सर्वप्रथम झाडाच्या पानांवर किंवा फुलांच्या दांड्यावर पाच ते सहा इंच लांबीचा भुरीा पिवळसर पांढरट डाग दिसतो. सकाळच्या दवामध्ये डाग चटकन उठून दिसतो. पाने नंतर पिवळसर होतात. चट्टे किंवा डाग पडलेल्या भागापासून पाने किंवा फुलांचे दांडे वाकतात. कांद्याची वाढ नीट होत नाही.
उपाय : कॅराथेन (0.1 टक्के) 10 ग्रॅम किंवा बेलेटानॅट्रायडेमार्क (0.1 टक्के) 10 ग्रॅम औषध 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. पिकांची फेरपालट करावी.
संदर्भ : शेतीमित्र मासिक (कांदा विशेषांक)

https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा