दरातील चढउतार, उत्पादन वाढ आणि औषध फवारणीसाठी वाढलेला खर्च यामुळे मिरची सध्या चर्चेचा विषय झाली आहे. हवामानातील बदलाचा मोठा परिणाम मिरची उत्पादनावर झालेला दिसून येतो. सध्या मिरचीचे उत्पादन कमी आणि खर्च जास्त यामुळे मिरचीचे उत्पादन वाढलेले असले तरी त्यातून मिळणारा फायदा मात्र कमी झालेला आहे. याचे मुख्या कारण आहे; ते मिरचीवर पडणार्या फळकुजव्या आणि चुरडामुरडा हे दोन रोग ! या दोन्ही रोगाच्या यशस्वी नियंत्रणावर मिरची उत्पादनाचे गणित अवलंबून आहे.
यशस्वी मिरची उत्पादनात कमी खर्चात जास्त उत्पादन काढण्यासाठी मिरचीवरील कीड-रोगांचा वेळीच प्रादुर्भाव रोखल्यास ते शक्य आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित भाजीपाला सुधार प्रकल्पातील शास्त्रज्ञ डॉ. पी. ए. ठोंबरे यांनी मिरचीमधील फळ कुजव्या आणि चुरडा-मुरडा रोगाच्या नियंत्रणासंदर्भात काही टिप्स् दिल्या आहेत.
मिरचीवरील फळ कुजव्या : मिरची फळभाजी पिकावर फळ कुजव्या हा बुरशीजन्य रोग कोलेटोट्रायकम कॅपशीसी या बुरशीपासून होतो. प्रामुख्याने या रोगाची लक्षणे पक्व मिरचीच्या फळावर आढळून येतात. मिरचीच्या फळावर गोलाकार किंचीतसे खोलगट काळी कडा असलेले ठिपके सुरूवातीला दिसून येतात. अशा ठिपक्यांची संख्या वाढून संपूर्ण मिरची फळावर याचा प्रादुर्भाव होतो. परिणामी अशी फळे पूर्ण पक्व होण्याअगोदरच गळून पडतात. त्यामुळे उत्पादनात घट येते. विशेषत: काहीवेळा खोडावर देखील रोगाचे व्रण आढळतात. रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट बियाणाद्वारे व दुय्यम प्रसार हवेद्वारे होतो.
हे वाचा : आंध्र प्रदेशानंतर महाराष्ट्रातील मिरची उत्पादक चिंतेत
यावर प्रभावी उपाय म्हणून पेरणीपूर्वी बियाण्यास बाविस्टीन किंवा थायरम किंवा कॅप्टॉन या बुरशीनाशकाची आडीच ते तीन ग्रॅम प्रती किलो प्रक्रिया करावी. शेतात रोगाचा प्रादुर्भाव दिसताच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून झायनेब किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड 20 ते 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी व नंतरची फवारणी रोगाच्या तीव्रतेनुसार 12 ते 14 दिवसांनी करावी. वेळीच नियंत्रण केल्यास या रोगाचे यशस्वी नियंत्रण करणे शक्य होते.
हेही वाचा : नक्कीच फायद्याचे ठरेल हे मिरची लागवड तंत्र
मिरचीवरील चुरडा-मुरडा : मिरची फळभाजी पिकावर चुरडा-मुरडा (बोकड्या) हा रोग बोकड्या रोग म्हणून ओळखला जातो. हा रोग विषाणूजन्य असून, रोगामुळे पानाची टोके आणि कडा सुरूवातीस वरच्या बाजूस वाळतात. म्हणजे पाने कुरूळी होतात. नवीन येणारी पाने आकाराने लहान राहतात आणि त्यांच्या पृष्ठभागावर बारीक फुगवटे-गाठी तयार होतात. रोगट झाडाच्या पानावरील शिरा निरोगी झाडापेक्षा फुगीर-जाड होतात. झाडांची वाढ खुंटते. रोगट झाडास क्वचितच फुले लागतात. फळ धारणा कमी होते. रोगाची तीव्रता वाढल्यास झाडावरील सर्व पाने कुरूळी होऊन चुरगळल्या-मुरडल्यासारखी वाटतात. रोगाचा प्रसार पांढरी माशी व मावा या किडीद्वारे रोगट झाडावरून निरोगी झाडावर होतो. तसेच फुलकिडीच्या उपद्रवामुळे देखील रोगाचा प्रसार होऊ शकतो.
हे नक्की वाचा : टोमॅटोचे दर घसरल्याने टोमॅटो उत्पादक अडचणीत
यावर उपाय म्हणून रोग प्रसारक किडींचा बंदोबस्त करून रोग आटोक्यात ठेवण्यासाठी पेरणीपूर्वी दाणेदार फोरेट दहा किलो प्रती हेक्टरी जमिनीत टाकावे. पीक उगवल्यानंतर 15 दिवसांनी फॉस्फॉमिडॉन किंवा नुवाक्रॉन किंवा रोगर यापैकी एका कीटकनाशकाची आलटून पालटून फवारणी करावी. गरजेनुसार पुढील फवारण्या 15 ते 20 दिवसांच्या अंतराने कराव्यात.
(संदर्भ : शेतीमित्र मासिक)
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1